Login

सोन्याचे मूल्य भाग १

सोन्याचे मूल्य भाग १

सोन्याचे मूल्य

भाग १

" आनंद, अरे ऐकतोस का ? किती वेळ झाला मी तुला हाक मारतेय, कुठे हरवलायस ? आज कपाळावरचे हे आठ्यांचे जाळे का जमले आहे?" मानसीने चहाचा कप टेबलावर ठेवत काळजीने विचारले.

आनंद शून्यात नजर हरवून बसला होता. मानसीचा आवाज ऐकून त्याने आपली नजर हळूच तिच्याकडे वळवली. त्याच्या डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे त्याची मानसिक अवस्था आरशासारखी दाखवत होती. त्याचा चेहरा प्रचंड थकलेला दिसत होता.

त्याने एक दीर्घ श्वास घेतला.तो म्हणाला,

"मानसी, मला काही सुचत नाहीये गं ! ही कापड बाजारात आलेली ही मंदी माझ्या गळ्याचा फास बनत चालली आहे. त्या मोठ्या डीलमधे अडकलेले पन्नास लाख रुपये आता बुडाल्या जमा आहेत. कर्जदारांचे फोनवर फोन येत आहेत. जर पुढच्या दोन दिवसांत मी वीस लाख रुपये उभे करू शकलो नाही, तर दुकानाला टाळे लागेल. आपली बाजारातली पत, इज्जत सगळं मातीत मिळेल गं!" आनंदचा आवाज बसला होता. त्यात पराभवाची गडद छटा होती.

" असं धीर सोडून कसं चालेल ? आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. घरात काही दागिने आहेत ना..."
मानसीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच आनंदने तिला मध्येच रोखले.

" दागिने? हो, आहेत. पण कोणाचे ? मानसी, माझ्या आईचे ते पिढीजात दागिने कपाटात आहेत. मला ठाऊक आहे. पण... पण माझी हिंमत होत नाहीये गं !
आईला ते मागायची. ज्या आईने आयुष्यभर कष्ट करून ते दागिने जपले, तिच्यासमोर जाऊन 'मला तुझे दागिने विकायला दे' असं म्हणायची माझी हिंमत नाही.
आईचे दागिने विचारणे म्हणजे माझ्या स्वाभिमानाचा सत्यानाश आहे.
तिची ती कडक शिस्त आणि तिचा तो अधिकार... मला भीती वाटते, मी तिच्या डोळ्यात डोळे घालून हे मागूच शकत नाही.
ती नकार देईल या भीतीने नाही, तर माझ्या अपयशामुळे तिच्या मनाला होणाऱ्या त्रासामुळे मी खचून जाईन"
आनंदने आपले डोके दोन्ही हातांत धरून हताशपणे सांगितले.

खोलीत काही काळ शांतता पसरली. आनंदची लाचारी आणि त्याचे आईबद्दलचे आदर मिश्रित भय मानसीला पूर्णपणे समजत होते. तिला माहीत होते की, सासूबाईंच्या दागिन्यांना हात लावण्याची हिंमत या घरात कोणाचीच नव्हती. तो एक न ओलांडता येणारा उंबरा होता.

मानसी काही क्षण शांत राहिली, तिने एक मोठा निर्णय घेतला. ती झटकन उठून बेडरूममध्ये गेली.पुढच्या दहा मिनिटांत हातात एक मखमली डबा घेऊन परत आली. तिने तो डबा आनंदच्या समोर उघडला. त्यात तिचे लग्नाचे जड सोन्याचे नेकलेस, पाटल्या, बांगड्या आणि अंगठ्या चमकत होत्या. ते तिचे हक्काचे स्त्रीधन होते.

"हे घ्या..."
मानसीने अत्यंत शांतपणे तो मखमली डबा समोर ठेवला. ती खंबीर आवाजात म्हणाली.

आनंद दचकून उभा राहिला. भीतीने आणि आश्चर्याने आधी दागिन्यांकडे आणि मग मानसीकडे बघू लागला.

"हे... हे काय करतेस मानसी? हे तुझे लग्नाचे दागिने आहेत. तुझ्या माहेरच्यांनी हौसेने केलेले."

"आनंद, हे दागिने घ्या आणि बाजारात विकून टाका." मानसी खंबीरपणे म्हणाली.

आनंदने अडखळत सुचवले,
" पण मानसी, विकण्यापेक्षा आपण हे कुठेतरी गहाण ठेवूया ना ? परिस्थिती सुधारली की मी पैसे भरून तुझे दागिने सोडवून आणेन. तुझे दागिने कायमचे जाणार नाहीत."

मानसीने नकारार्थी मान हलवली आणि समजूतदारपणाने म्हणाली,
"नको आनंद, गहाण ठेवण्याचा विचारही करू नका. आधीच बाजारात मंदी आहे, डोक्यावर पन्नास लाखांचे नुकसान सोसून तुम्ही पुन्हा नवीन कर्जाचे आणि व्याजाचे ओझे डोक्यावर घेणार का ?
गहाण ठेवून दर महिन्याला व्याज भरण्यात आणखी पैसा वाया जाईल. शिवाय मानसिक दडपण वेगळेच राहील. मला तुम्हाला आणखी एका कर्जाच्या दरीत लोटायचे नाहीये. हे दागिने कायमचे विकून टाका. सर्वात आधी त्या कर्जदारांचे पैसे पूर्णपणे फेडून टाका. तुमचे टेन्शन मिटले की व्यवसाय पुन्हा उभा राहील!

लग्नात जेव्हा मी तुमच्यासोबत सात पावले चालले, तेव्हाच मी माझे सुख-दुःख तुमच्या आयुष्याशी जोडले होते. आज जर तुमचा व्यवसाय धोक्यात असेल, तुमचे अस्तित्व धोक्यात असेल, तर या सोन्याच्या तुकड्यांना काय अर्थ आहे?
दागिने काय, आज गेले तर उद्या परत येतील. पण तुमची गेलेली पत आणि तुमची मानसिक शांतता एकदा गेली की पुन्हा कधीच परत येणार नाही."

आनंद मानसीकडे पाहतच राहिला. ज्या संकटाने त्याला पूर्णपणे तोडले होते, त्या संकटासमोर त्याची बायको एका भक्कम ढालीसारखी उभी होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मानसीला जवळ घेतले.

" मानसी, मला माफ कर... मी तुला सुख देण्याऐवजी तुझे दागिने विकायला निघालोय."

" अहो, रडता काय ? वाईट काळात नवरा-बायको एकमेकांना साथ नाही देणार तर कोण देणार ? मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही या संकटातून नक्की बाहेर पडाल. आज माझे दागिने जात आहेत, पण मला खात्री आहे, उद्या तुम्ही मला याच्या दुप्पट दागिने करून द्याल."

मानसीने हसत त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसले.
आनंदच्या मनावरचा प्रचंड मोठा दगड उतरला होता. मानसीने दिलेल्या त्या धैर्याच्या बळावर त्याने ते दागिने सोनाराकडे नेले. मानसीचे स्त्रीधन विकून जो पैसा आला, त्यातून आनंदने बाजारातील सर्व देणे चुकते केले.

काही महिन्यात व्यवसायाला लागलेले ग्रहण सुटले. आनंदने एका नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने पुन्हा एकदा व्यवसायात उडी घेतली. त्याच्या पाठीशी मानसीचा अतूट विश्वास आणि तिचा मोठा त्याग उभा होता. पण सगळ्यांच्या पचनी पडणार होतं का हे ?

क्रमशः...


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →