Login

साया -39

समीरचा मृत्यू झाला ! तो नेमका वाड्यात झाला की वाड्याच्या बाहेर? तो हॉस्पिटलच्या आवारात कसा पोहोचला त्याला कोणी मारले.

अचानक खोलीचं तापमान कमी झालं.

त्याच्या श्वासातून धुरासारखी वाफ बाहेर पडू लागली.

आणि समोरच्या भिंतीवर टॉर्चचा प्रकाश पडताच त्याला काहीतरी वेगळं दिसलं.

धुळीवर कोणीतरी नुकतंच बोट फिरवल्यासारख्या रेषा उमटल्या होत्या.

त्या रेषा हळूहळू एका चिन्हाचा आकार घेत होत्या.

एक डोळा.

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

समीरच्या हातातून टॉर्च जवळजवळ निसटली.

त्याने पुन्हा दार उघडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दार सहज उघडलं.

तो क्षणाचाही विलंब न करता बाहेर धावत आला.

कॉरिडॉरमध्ये येताच त्याने मागे वळून पाहिलं.

दार पूर्ण उघडं होतं.

आत मात्र पुन्हा शांतता होती.

जणू काहीच घडलं नव्हतं.

समीरने घाईघाईने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

तो मुख्य दरवाजाकडे चालू लागला.

पण त्याला अचानक जाणवलं,

ज्या दिशेने तो चालत होता, त्या दिशेने दरवाजा नव्हता.

तो थांबला.

पुन्हा मागे वळला. आणि

त्याच कॉरिडॉरमध्ये तो गोल गोल फिरत होता.

वाड्याचा मार्ग जणू बदलत होता.

त्याच क्षणी...

दूरवरून एक हलकीशी पावलांची चाहूल त्याच्या कानावर आली.

टक...

टक...

टक...

यावेळी ती चाहूल त्याच्या दिशेने येत होती.

समीरने परत निरागस प्रयत्न केला. टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकण्याचा.

याआधीप्रमाणे अंधाराशिवाय काहीच दिसलं नाही.

पण ती चाहूल थांबली नव्हती.

त्याचा श्वास वेगाने चालू लागला. आणि अचानक मुख्य द्वार हळूहळू .......


                               पुढे........


समोरचं मुख्य दार त्याच्या नजरेस दिसलं.

तो वेगाने धावत बाहेर आला.

वाड्याच्या अंगणात येताच त्याने परत मागे वळून पाहिलं.

मुख्य दरवाजा हळूहळू स्वतःहून बंद होत होता.

"कर्र..."

दार पूर्ण बंद झालं.

त्याच क्षणी वडाच्या झाडाची पानं जोरात सळसळू लागली.

पण आसपास वाऱ्याचा मागमूसही नव्हता.

समीर काही क्षण स्तब्ध उभा राहिला.

त्याच्या मनात आता एकच गोष्ट स्पष्ट झाली होती. कल्याणी सोबत जे काही झाले त्याचा संबंध या वाड्याशी आहे.

या वाड्यात काहीतरी असामान्य आहे.

काहीतरी अदृश्य...

जे त्याच्याकडे पाहत होतं.

आणि त्याच्यावर लक्ष ठेवून आहे....


पावसाच्या सरी आता मंदावल्या असल्या,

तरीही त्या जुन्या वाड्याभोवतीचं वातावरण क्षणोक्षणी अधिक भयाण होत होतं.

त्याच्या छातीत धडधड वाढली होती.

तो स्वतःशीच म्हणाला,

"नाही... इथून आता लगेच निघायलाच हवं."

त्याने झपाझप पावलं टाकत अंगण ओलांडायला सुरुवात केली.

वडाच्या झाडाजवळून जाताना मात्र त्याच्या पायांचा वेग आपोआप कमी झाला.

झाडाच्या पारंब्या हळूहळू हालत होत्या.

पण...

आजूबाजूला पाहिले असता वारा वाहत असल्याचे जाणवत नव्हते.

त्या पाल्याच्या सळसळमध्येही काही कुजबुज मिसळल्या सारखं वाटतं होतं.

समीरने कान देऊन ऐकलं.

"...जाऊ... नकोस... तुझी साथ आता मला हवी आहे. मी तुला जाऊ देणार नाही."

तो ती कुजबुज ऐकून दचकला.

त्याला मागे वळून पहायचे नव्हते पण तरीही नकळतपणे त्याने मागे वळून पाहिले नेहमीप्रमाणे त्याला कोणीही दिसले नाही . तो परत पुढे झपाझप चालू लागला.


अंगणाचं लोखंडी गेट आता अगदी काही पावलांवर होतं.

त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. आणि गेट ढकलण्यासाठी त्याने हात पुढे केला. गेट ही सहज उघडलं.

त्याने बाहेर पडण्यासाठी पुढे पाऊल उचलले.

पण...

क्षणभर त्याचवेळी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला.

तू स्वतःच्या चेहरा झटकू लागला चेहऱ्यावरून हात फिरू लागला. त्याने डोळे चोळले.

पुन्हा समोर पाहिलं.

आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.

तो अजूनही वाड्याच्या अंगणातच उभा होता. गेट पुन्हा त्याच्यासमोर काही अंतरावर होतं.

"हे... कसं शक्य आहे?"

"हे काय होत आहे माझ्यासोबत.."

त्याने पुन्हा धावत गेट गाठलं.

यावेळी तो पूर्ण ताकदीने बाहेर धावला.

पण पुन्हा...

तो त्याच जागी उभा होता.

त्याचा श्वास फुलू लागला.

घामाने त्याचा शर्ट पूर्ण भिजला.

त्याने स्वतःच्या गालावर दोन्ही हाताने मारायला सुरुवात केली.
"स्वप्न आहे हे, हे खरं असू शकत नाही." असे परत परत तो एकटाच बडबडू लागला. परत तो म्हणाला,

"हे स्वप्न नाही..." आणि

त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न केला.

यावेळी तो डोळे बंद करून धावत सुटला.

दहा...

वीस...

तीस पावलं तो चालला त्यानंतर.....

तो थांबला. थांबताच त्याने डोळे उघडले.

आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

तो पुन्हा त्याच वडाच्या झाडाखालीच उभा होता.

त्या झाडाच्या खोडावरून हळूहळू पाण्याचे थेंब खाली पडत होते.

पण...

ते पाणी नव्हतं.

त्यांचा रंग गडद लाल होता.

समीरने भीतीने दोन पावलं मागे सरकण्याचा प्रयत्न केला.

इतक्यात त्याच्या कानाजवळूनएक मंद श्वास गेल्यासारखा भास झाला.

"...तू... परत... आलास..."
"..मी तुझीच वाट पाहत होते..."

त्याने टॉर्चचा प्रकाश चारही बाजूंना फिरवला.

काहीच दिसलं नाही.

अचानक...

वडाच्या झाडाच्या वरच्या फांद्यांवरून एकाच वेळी शेकडो पक्षी किंचाळत उडाले.

त्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

समीरने सहज वर पाहिलं.

आणि त्याचा श्वास अडखळला.

झाडाच्या एका जाड पारंबीवर...

एक काळी आकृती त्याला बसलेली दिसली.

लांब केस...

पूर्ण स्थिर देह...

आणि दोन चमकणारे डोळे...

विज चमकताच ती आकृती नाहीशी झाली.

त्याच्या अंगाचे पाणी पाणी झाले, पाय तिथेच लटलट करत होते, अंगावरून घामाचे लोट वाहू लागले.

समीर एकदम मागे सरकला. त्याच्या पायाला काहीतरी अडकलं.

तो खाली पडला.

टॉर्च हातातून दूर जाऊन पडली.

प्रकाश फिरत फिरत झाडाच्या खोडावर स्थिरावला.

त्या प्रकाशात झाडाच्या सालीवर एक चिन्ह स्पष्ट दिसलं.

एक डोळा.

आणि मध्यभागी एक छोटंसं हृदय.

समीर उठण्याचा प्रयत्न करू लागला.

पण त्याला जाणवलं...

त्याच्या पायाभोवती काहीतरी घट्ट आवळत होतं.

त्याने घाबरून खाली पाहिलं.

वडाच्या पारंब्या...

जिवंत असल्यासारख्या...

त्याच्या पायांभोवती विळखा घालत होत्या.

त्याने पूर्ण ताकदीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला.

"कोण आहे?"

"मला सोडा!"

त्याचा आवाज रिकाम्या परिसरात घुमला.

उत्तर आलं नाही.

फक्त...

एक स्त्रीचा मंद हशा.

तो हशा जवळ येत गेला.

समीरने शेवटचा प्रयत्न केला.

त्याने मोबाईल हातात घेतला.

पण स्क्रीनवर फक्त एकच गोष्ट दिसत होती.

नो नेटवर्क...

फक्त...

काळ्या स्क्रीनवर आपोआप उमटलेलं तेच चिन्ह.

डोळा.

मध्यभागी हृदय.

मोबाईल अचानक बंद झाला.

त्याच क्षणी परिसरात प्रचंड विजांचा कडकडाट झाला.

झाडाच्या फांद्या एकदम जोरजोरात हलू लागल्या.

पावसाचा मारा वाढला.

आणि काही क्षणांसाठी सर्वकाही दाट पांढऱ्या धुक्यात हरवून गेलं......

.......

दुसऱ्या दिवशी सकाळी...

शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू झाली होती. आणि दुसरीकडे

नील समीरला फोन करत होता.

एकदा...

दोनदा...

पाच वेळा...

पण समीरचा फोन लागत नव्हता. आता मात्र त्याच्या मनात काळजी वाढू लागली.

तेवढ्यात इन्स्पेक्टर चव्हाणांचा फोन आला.

"डॉ. नील... तुम्ही लगेच डॉ समीरच्या नवीन हॉस्पिटलच्या प्रांगणात या."

"का? काय झालं?"

काही क्षण चव्हाण काहीही न बोलता गप्प राहिले.

मग इन्स्पेक्टरचा गंभीर आवाज आला.

"इथे एक मृतदेह सापडला आहे."

नीलचं हृदय धडधडू लागलं.

तो लगेच घटनास्थळी पोहोचला.

संपूर्ण परिसर पोलिसांनी बंदिस्त केला होता.

लोकांची तिथे गर्दी जमली होती. त्यातून वाट काढत

नील पुढे गेला.

जमिनीवर पांढरं कापड टाकलेलं होतं.

इन्स्पेक्टर चव्हाणांनी त्याच्याकडे पाहिलं.

"स्वतःला सावरून..."

ते म्हणाले.

हळूहळू त्यांनी कापड बाजूला केलं.

नील च्या चेहऱ्याचा रंग उडाला त्याचा चेहरा एकदम गंभीर आणि दुःखी झाला त्याच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता कारण त्या कापडाखाली जो मृत देव होता,

तो समीर होता.

पण...

त्याच्या चेहऱ्यावर भीती गोठलेली होती.

डोळे पूर्ण उघडे.

जणू मृत्यूपूर्वी त्याने काहीतरी अकल्पनीय पाहिलं होतं.

शरीरावर मारहाणीच्या खुणा नव्हत्या.

फक्त मनगटावर मातीचे डाग...

आणि उजव्या तळहातावर नखांनी ओरबाडल्यासारखं उमटलेलं एक चिन्ह.

एक डोळा.

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

इन्स्पेक्टर चव्हाण हळू आवाजात म्हणाले,

"आश्चर्याची गोष्ट म्हणजे..."

"घटनास्थळी कोणतेही पावलांचे ठसे नाहीत."

"ना झटापटीच्या खुणा."

"ना वाहनाचे चिन्ह."

"जणू कोणीतरी यांना मारल्यानंतर इथे शांतपणे ठेवून गेलं."

नील समीरकडे पाहतच राहिला.

त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता,


तो इथे कसा आला?

आणि त्याच्या मृत्यूमागचं सत्य काय?...


आजचा भाग इथेच संपतो... पण रहस्य आता आणखी गडद होत चाललं आहे!

समीरचा मृत्यू नेमका कसा झाला?
तो वाड्यातून बाहेर पडला होता की अजूनही त्या शापित जागेच्या तावडीतच अडकला होता?
आणि त्याच्या तळहातावर उमटलेलं 'डोळा आणि मध्यभागी हृदय' हे चिन्ह नेमकं कोणाचं आहे?

तुमच्या मते पुढे काय घडेल? तुमचा अंदाज नक्की कमेंटमध्ये लिहा.

कथा आवडली असेल तर लाईक करा.
तुमचं मत आणि पुढच्या भागाबद्दलचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच थरारक आणि रहस्यमय कथा वाचण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.

तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि फॉलोमुळे ही कथा आणखी जोमाने पुढे नेण्याची प्रेरणा मिळते.

क्रमशः...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →