Login

साया - 35

समीरला भेटायला आलेला त्याचा मित्र जेव्हा हॉस्पिटल मधून बाहेर पडतो अचानक त्याचा अपघातात मृत्यू होतो, हा अपघात होता की कोणी केलेला घातपात?







दुसऱ्या दिवशी सूर्य हा शांतता आणि आनंद घेऊन आला आहे असा नीलच्या मनात विचार आला. तो काही वेळासाठी नर्सला सांगून घरी फ्रेश होण्यासाठी निघून गेला. दोन वेगवेगळ्या नर्स दोघांच्या रूममध्ये त्यांच्या देखरेखी साठी सज्ज होत्या. दुसरीकडे दैनंदिन पेशंटची, कर्मचारी यांची वर्दळ हॉस्पिटलमध्ये वाढत होती. दुसरीकडे ती जुनी रिपोर्ट फाईल रेकॉर्डर रूम मध्ये साफसफाई करताना एका कर्मचाऱ्याला दिसली. त्याने ती बाकीच्या फाईल सोबत उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही विशेष वाटले नाही. त्याने ती  उचलून परत वर ठेवण्यासाठी हात वर केला आणि  अचानक बाहेरून......


                       पुढे.......


ती फाईल त्या कर्मचाऱ्यांनी उचलताच अचानक बाहेरून जोरात हवेचा एक मोठा  झोक आला. आणि त्याच्या हातातील सर्व फाईल खाली पडल्या. सोबतच त्या कर्मचाऱ्यालाही जणू काही कोणी धक्का दिला असावा अशा प्रकारे तो खाली पडता पडता त्याने स्वतःला सावरले.

.......

दुपारच्या सुमारास समीरला भेटण्यासाठी हॉस्पिटलमधील एक माजी कर्मचारी येतो. त्याचं नाव शेखर होते.

तो हातात फुलांचा गुच्छ घेऊन हसतमुखाने आत गेला. आणि तो सरळ समीरच्या वॉर्ड मध्ये भेटायला जातो.
"सर, नमस्कार कशी आहे आता तब्बेत. तुम्हाला या अवस्थेत पाहून खूप वाईट वाटलं. तुम्ही लवकर बरे व्हा, हीच मी देवाकडे प्रार्थना करतो."

समीर हसतमुखाने त्याचे आभार मानतो.
"धन्यवाद, इथे मला भेटायला आलास तू मला छान वाटले."

काही मिनिटे दोघे जुन्या आठवणी काढून गोष्टीचा आनंद घेतात. त्यामुळे काही वेळ का होईना समीर त्याच्या दुःखातून बाहेर निघाला आणि स्वतःच्या आनंदाच्या क्षणात गुंतला. हॉस्पिटलमधील दिवस, एकत्र केलेलं काम, जुन्या सहकाऱ्यांची चौकशी यामुळे वातावरण थोडं हलकं झालं. बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. काही वेळाने
मग तो कर्मचारी अचानक गंभीर झाला.

"सर... एक गोष्ट सांगू का? काल रात्री तुमच्या घराजवळून जात होतो... मला तिथे एक विचित्र गोष्ट दिसली. म्हणजे तुम्हाला यावर किती विश्वास बसेल हे मला माहित नाही,पण मला सांगणे गरजेचे वाटत आहे म्हणून सांगत आहे."

    "मी दूरून एक बाई पाहिली. ती पावसात एकटीच रस्त्यावर चालत होती. मला वाटलं कल्याणी मॅडम असतील. मी तिच्या मागे जाऊन हाक दिली....
तर त्या दिसत जरी कल्याणी मॅडम होत्या तरी अजून कोणीतरी त्यांना जनु कंट्रोल केले होते असेच वाटत होते. त्यांची चालत विचित्र होती. त्या फारच विकृत दिसत होत्या. मला जरी त्या कल्याणी मॅडम वाटत असल्या तरीही त्यांचा अंधारात चेहरा दिसत नव्हता. पण तरीही मी जे पाहिले ते सांगण्याचा प्रयत्न केला."


हे ऐकून नीलच्या मनात संशय आणखी गडद होतो.

तो त्या कर्मचाऱ्याला अधिक काही विचारणार, इतक्यात त्याचा फोन वाजतो.

तो फोन उचलण्यासाठी घाईत उठतो.

"सर, मी आता निघतो. पुन्हा भेटायला येईन."


तो फुलांचा गुच्छ ठेवतो आणि घाईघाईत निघून जातो.


---

सुमारे अर्ध्या तासाने...

हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर गोंधळ उडाला. सर्वत्र एकच खळबळ उडाली. बरेच कर्मचारी हळहळ व्यक्त करीत होते. तेवढ्यातच एका पोलीस अधिकाऱ्याचा समीरला फोन आला.

"हॅलो, डॉ समीर मी इन्स्पेक्टर चव्हाण बोलत आहे, एक वाईट बातमी आहे." समीरचा चेहराच पांढरा पडला.

समीर, "काय झाले साहेब, काय वाईट बातमी आहे. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात?"


चव्हाण,"... आत्ताच जे भेटून गेले तुम्हाला... तुमचे माजी कर्मचारी शेखर त्यांचा अपघात झाला आहे."


समीर ला हे ऐकून धक्काच बसला,

"काय?"


"त्यांना ट्रकची जोरदार धडक बसली... हा अपघात एवढा जबरदस्त होता की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला."


समीरच्या हातातून मोबाईल खाली पडतो.

खोलीत काही क्षण शांतता पसरते. हे पाहून नील त्याला विचारतो, "काय झाले समीर. काही प्रॉब्लेम झाला का?."


नील जेवढं काही बोलला त्यातील एकही शब्द जणू समीरच्या कानावर गेला नसावा अशाप्रकारे तो स्तब्ध होऊन बसलेला होता. त्यामुळे मात्र नीलच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. त्याने परत समीरला आवाज दिला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी नील ने त्याचा हाताने खांदा हलविला, आणि त्याला भानावर आणले. आणि काय झाले ते विचारले, त्यावेळी समीरने हकीकत सांगितली.
नीलच्या मनात मात्र त्यामुळे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला.

हा खरोखर अपघात होता... की त्याने काही पाहिलं होतं, त्याला कोणते रहस्याची जाणीव झाली होती म्हणून त्याचा जीव गेला?

त्याने ताबडतोब पोलिसांकडे जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याच्या मनातील शंका आणि प्रश्नाची उत्तर शोधण्यास त्याला मदत होईल.


हॉस्पिटलमधून बाहेर पडताच नीलने एक खोल श्वास घेतला. समीरने सांगितलेली बातमी अजूनही त्याच्या मनातून जात नव्हती. सारखे मागील कल्याणी आणि नील सोबत झालेल्या घटना शिवाय हा एक्सीडेंट हे सर्व त्याच्या डोक्यात एका मागून एक विचार फिरत होते.

शेखर...

अवघ्या अर्ध्या तासापूर्वी तो समीरसमोर बसून हसत-खेळत बोलत होता.

आणि आता...

तो या जगात नव्हता.

नीलने ताबडतोब कार सुरू केली आणि इन्स्पेक्टर चव्हाण यांनी सांगितलेल्या अपघाताच्या ठिकाणाकडे निघाला.


---

सुमारे वीस मिनिटांनी तो शहराच्या बाहेरच्या रस्त्यावर पोहोचला.

त्या ठिकाणी पोलिसांची जीप, ॲम्ब्युलन्स आणि काही उत्सुक लोकांची गर्दी जमली होती.

पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. रस्ता मात्र पूर्ण ओला होता.

इन्स्पेक्टर चव्हाण नीलला पाहताच त्याच्या दिशेने आले.

"डॉ. नील... तुम्ही आलात."

"हो. नेमकं काय आणि कसं घडलं?"

चव्हाणने घटनास्थळाकडे पाहत उत्तर दिलं,

"साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार एक भरधाव ट्रक आला... आणि शेखरला जोरदार धडक देऊन निघून गेला."

"सीसीटीव्ही?"

"दुर्दैवाने या भागात नाही."

नीलने आजूबाजूला नजर टाकली.

रस्त्याच्या कडेला अजूनही रक्ताचे डाग दिसत होते.

शेखरची तुटलेली बॅग बाजूलाच पडली होती. सर्वत्र त्याच्या आजूबाजूला रक्त पसरले दिसत होते.

ते दृश्य पाहून नील काही क्षण शांत उभा राहिला.


---

तेवढ्यात फॉरेन्सिक टीममधील एक अधिकारी चव्हाणजवळ आले.

"सर..."

"या अपघाताचे निरीक्षण करतांना एक विचित्र गोष्ट लक्षात आली आहे."

"काय?"

"तुम्ही स्वतः पाहिलेलं बरं."

सर्वजण रस्त्याच्या मधोमध गेले.

अधिकाऱ्याने टॉर्चचा प्रकाश खाली टाकला.

रस्त्यावर दोन मोठे टायरचे ठसे स्पष्ट दिसत होते.

"हे बघा."

चव्हाण खाली बसले.

"हो... ट्रकचे टायर आहेत."

अधिकारी शांतपणे म्हणाला,

"हो सर..."

"पण पुढे बघा."

चव्हाण आणि नीलने पुढे नजर टाकली.

आणि दोघेही क्षणभर स्तब्ध झाले.

कारण...

टायरचे ठसे जिथे शेखर पडला होता...

फक्त त्या जागेभोवतीच होते.

त्याआधी रस्त्यावर कोणतेही ठसे नव्हते.

आणि...

त्या जागेनंतरही...

एकही टायर चे ठसे दिसत नव्हते.

जणू...

ट्रक हवेतून तिथे आला...

शेखरला धडक दिली...

आणि पुन्हा हवेतच नाहीसा झाला.


---

"हे अशक्य आहे." चव्हाण पुटपुटले.

फॉरेन्सिक अधिकारी म्हणाला,

"सर, आम्ही पन्नास मीटर पुढे आणि पन्नास मीटर मागे तपासलं."

"एकही सलग टायर मार्क नाही."

"फक्त ही वीस-पंचवीस फूट जागा एवढेच ठसे दिसत आहे."

नील खाली बसला.

त्याने स्वतः हाताने त्या ठशांवरून बोट फिरवलं.

ते खरे होते.

रबरचे स्पष्ट ठसे.

कोणत्याही प्रकारचा भास नव्हता.

"हे कसं शक्य आहे?" त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.


---

इन्स्पेक्टर चव्हाणने संपूर्ण परिसर पुन्हा तपासण्याचे आदेश दिले.

प्रत्येक दगड...

प्रत्येक झुडूप...

प्रत्येक खुण...

सगळं तपासलं गेलं.

पण काहीच मिळालं नाही.

ना ब्रेक लावल्याच्या खुणा.

ना वाहन वळल्याचा पुरावा.

ना फुटलेल्या काचेचे तुकडे.

ना ट्रकच्या रंगाचा अंश.

काहीच नाही.


---

तेवढ्यात एका पोलिसाने चव्हाण यांना जोरात आवाज दिला.

"सर!"

सर्वांनी आश्चर्याने पण तेवढ्याच आशेने त्याच्याकडे पाहिले आणि सर्वजण त्याच्याकडे धावत गेले.....

क्रमशः.....


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →