व्यासांच्या मानसकन्या भाग ३१
कर्तव्य परायण कुंती
कीचकाचा वध झाला, किचक इतका बलशाली होता की त्या काळातील केवळ सहा वीर त्याचा वध करू शकत होते. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, बलराम, दुर्योधन, कर्ण आणि भीम! दुर्योधनाच्या महालात शकुनी, कर्ण आणि स्वतः दुर्योधन किचकाच्या झालेल्या वधावर खल करत होते आणि त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की किचकाचा वध नक्कीच भिमाने केला. पांडवांचा अज्ञातवास भंग करण्याकरिता म्हणून कौरव विराटाचं गोधन लुटण्यासाठी विराट राजावर चालून गेले आणि अर्जुनाने त्यांचा पाडाव केला. याच घटनेला प्यादं बनवून दुर्योधनाने परत एकदा पांडवांना वनवासात पाठवण्याची जोरकस मागणी केली. पण तेरा वर्षात कुरुसभेतील सर्व ज्येष्ठांना दुर्योधनाचा कावा आणि धृतराष्ट्राचं धूर्त, स्वार्थी, सत्तालोलुप आणि अंध राजकारण कळून चुकलं होतं, त्यामुळे साऱ्यांनीच पांडवांचा वनवास आणि अज्ञातवास पूर्ण झाला आहे असाच निर्वाळा दिला. युधिष्ठिराने हस्तिनापुरात राजदूत पाठवून स्वतःच्या राज्याची मागणी केली. हस्तीनापुरहुनही पांचालात कौरवांचा राजदूत गेला. पण वाटाघाटींची, तहाची आणि धृतराष्ट्रानं इंद्रप्रस्थ त्याला परत देण्याची सगळीच बोलणी विस्कटली होती म्हणूनच सर्वात शेवटी कृष्ण स्वतः राजशिष्टाईकरिता हस्तीनापूरला आला होता.
हस्तीनापूरच्या राजप्रसादाच्या प्रांगणातच विदुराचं घर होतं, हस्तीनापुरच्या भव्य राजवाड्यासमोर त्याचं घर तर निव्वळ झोपडी वाटावी इतकं साधं होतं. पांडव द्युतात हरल्यानंतर आधी ठरल्याप्रमाणे वनवासात गेले होते पण केवळ विदुराच्या मध्यस्थीने कुंती पांडवांच्या माघारी कुरूंच्या राजधानीत राहिली होती. पण ती हस्तीनापुरच्या राजवाड्यात मात्र राहत नव्हती. विदुराच्या घरी राहून, राजेशाही जीवनाचा त्याग करून, अगदी साध्या वनवासी जीवनाचा तिने स्वीकार केला होता, जणू पांडवांच्या माघारी शत्रूंचे वैभव रोज डोळ्यांनी पाहण्याचा वनवास कुंतीने तिच्या पुरता स्वीकारला होता.
कुंती, कृष्णाची आत्या असल्याने कृष्ण राज्यसभेत जाण्यापूर्वी तिला भेटला. त्यावेळी पहिल्यांदाच कधी नव्हे ते कुंती मोठ्याने ओक्साबोक्शी रडली. लहानपणापासून तिच्या वाट्याला आलेल्या सगळ्या कष्टांची, मन मारून जगण्याची, दुःखाची, आपदांची, वेदनांची पुन्हा एकदा उजळणी झाली. आतापर्यंत कुंरूंची स्नुषा म्हणून, वैवाहिक सुख देण्यात असमर्थ असलेल्या पांडूची अर्धांगिनी म्हणून, नियोगाने संतती जन्माला घातली म्हणून, राजधानीतील जनतेच्या प्रश्नांची सरबत्ती सहन करत, डोळ्यात तेल घालून जपलेल्या आपल्या आणि सवतीच्या मुलांना मोठ्या धैर्याने आणि सजग राहून वाढवलेल्या मुलांना सुसंस्कारित करताना, घराण्यातील कटकारस्थानानां मोठ्या धीराने तोंड देत, महत्त् प्रयासाने मिळवलेले राज्य जुगाराच्या एका खेळात ज्याने गमावले आणि त्याच्या या कृतीमुळे तिच्या सुनेला भर सभेत विटंबनेला सामोरे जाण्याची वेळ आली या सगळ्यां घटनांना कुंतीने कृष्णासमोर अश्रूंवाटे वाट मोकळी करून दिली.
कृष्णाची शिष्टाई सफल झाली नाही. परत जाताना कृष्ण परत एकदा तिला भेटला त्यावेळी कुंतीने मुलांसाठी जो निरोप दिला त्यावेळी कुंतीच्या मनातले शल्य, भविष्याविषयीची आशा आणि तिच्या मनाचा कठीणपणा दिसून आला.
“कृष्णा, अर्जुनाला आणि भीमाला माझा निरोप सांग की, झालेला अपमान विसरू नका. युधिष्ठिरला सांग की तू धर्मात्मा आहेस, पण त्याचवेळी तू राजा देखील आहेस. तु ज्या धर्माला अनुसरतोस तो धर्म नष्ट होतो आहे, हे कदापि विसरू नकोस. ब्रह्मदेवाने क्षत्रियांना उरापासून निर्माण केले आहे. ते बाहुबल दाखवण्यासाठी, रणांगणावर शत्रूवर तुटून पडण्यासाठी, स्वतःच्या स्त्रीचं शील रक्षण करण्यासाठी, प्रजापालन करण्यासाठी, युद्धाला सज्ज हो! राजा जर धर्म विसरला तर तो नरकात जातोच पण सर्व प्रजेलाही नरकात ढकलत असतो. तुला मिळालेला वडिलांचा वारसा तुझ्या एका पोरकटपणामुळे पूर्णपणे बुडालेला आहे. सामोपचाराने मिळत नसेल तर बाहुबलाच्या जोरावर तो तू परत मिळव. पाच मुलांची माता असूनही मला परक्यांच्या घरी आश्रित म्हणून राहावे लागते आहे यासारखे मोठे दुःख नाही. राजधर्माने वाग. क्षत्रिय आहेस तर क्षत्रियांप्रमाणे कृतीही कर. पुळचट गोष्टी आणि अहिंसेचा धर्म हे क्षत्रियाचं भूषण नाही. ज्या दिवसाकरिता क्षत्रिय नारी मुलाला जन्माला घालते तो दिवस आता आला आहे. तुम्हा पाचही भावांचं शस्त्रांचे तेज तळपुदे! तुमच्या मातेच्या शिलावर झालेल्या आघातांचं आणि पत्नीच्या अपमानाच्या कटू वेदनांची पराक्रमाद्वारे परतफेड करा!”
राजशिष्टाईकरिता जेव्हा कृष्ण हस्तीनपुरात आला होता, तेव्हा दुर्योधनाने पांडवांना राज्याचे उत्तराधिकारी म्हणून मानण्यास स्पष्ट शब्द नकार दिला होता. त्याचं म्हणणं होतं की ‘केवळ कौरवच हेच हस्तीनापुरचे नैतिक वारसदार आहेत आणि पांडव हे केवळ नियोगाची संतती असल्याने ते राज्यावरचा त्यांचा अधिकार सांगू शकत नाहीत.’ ही गोष्ट कुंतीला कळली होती म्हणूनच ती तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना क्षमा करू शकत नव्हती.
“कुंतीच्या चारित्र्यावर संशय घेणारे सुद्धा खरे कौरव आहेत का हे एकदा त्यांनी त्यांच्या जन्मदात्यांना विचारावं! राज्याला वारस हवा म्हणून महाराणी सत्यवतीने ज्या नियोगाचा अवलंब करून महर्षी व्यासांच्या मदतीने माझ्या सासवा, अंबिका आणि अंबालिका यांना मातृत्व स्वीकारायला लावलं आणि राज्याचा कारभार अखंड ठेवण्यासाठी, कुळाला वारस मिळावा आणि कुरूंचं हे राज्य लयाला जाऊ नये त्याकरिता अवलंबिलेला सनातन धर्म जेव्हा मी माझ्या पतीच्या अनुमतीने अनुसरला तर मी जारिणी झाली का? सत्तेच्या लोभापायी आणि सिंहासनाच्या एकछत्री अधिकाराकरिता समाजमान्य नियोग पद्धतीलाच नाकारून महाराज आणि राजपूत्राने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, माझ्या मुलांना लाक्षागृहात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, राज्यापासून, सत्तेपासून, त्यांच्या नैतिक अधिकारांपासून कपटाने आणि छळाने दूर केले, यावरही त्यांचे समाधान झाले नाही तर माझ्या सुनेच्या पदरापर्यंत त्यांचा हात गेला! त्यांना मी कधीही क्षमा करणार नाही! नैतिकतेच्या आणि धर्माच्या वल्गना करणारा दुर्योधन त्याला तरी खरा आर्य धर्म माहिती आहे का? संतती म्हणजे केवळ त्या कुटुंबाचा वंश नसून पितृऋण फेडण्याची आणि वंशाची ज्योत जिवंत ठेवण्याची जबाबदारी असते. संतती ती कुणाचीही असो त्यावर पहिला अधिकार त्या समाजाचा असतो ज्या समाजात ती संतती जन्माला येते. नियोग म्हणजे वर्तन स्वैरता नाही, तर धर्म मार्गाने पती असमर्थ किंवा मृत झाला असेल तर त्याच्या पत्नीचा मातृत्वाचा अधिकार प्रमाण मानून स्त्रीच्या स्त्रीत्वाचा तो समाजमान्य अधिकार आहे. नियोग म्हणजे लैंगिक स्वैराचार नसून समाजाने आखून दिलेली आणि कुटुंबाने कर्तव्य म्हणून स्वीकारलेली नैतिक जबाबदारी आहे. या जबाबदारी मध्ये जैविक पितृत्वापेक्षा सामाजिक वारस, समाजाऋण आणि इतिहासाची सातत्यता जास्त श्रेष्ठ मानली गेली आहे. जर कुंतीची मुलं औरस नाहीत तर कुरु सिंहासनावर बसलेले हस्तीनापुरचे नरेशही औरस नाहीत.” कुंतीच्या डोळ्यातून दोन तप्त अश्रू तिच्या पदरावर ओघळले. आणि परत तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
“कृष्णा माझ्याच जीविताचा उत्तराधिकार घेऊन माझी संतती जन्माला आली का रे? नकाळत्या वयात पिताश्रींचं घर सोडून मी महाराज कुंती भोजांची कन्या झाली, माझ्या घरी मी जिथे सर्व गोष्टींवर हक्क सांगत होती तिथे महाराज भोज्यांकडे माझ्यावर आली ती केवळ जबाबदारी आणि कर्तव्यपरायणता. माझं आयुष्य माझ्या मालकीचं कधीच नव्हतं तर ते केवळ कर्तव्य पूर्ण करण्यासाठीच एक युद्ध होतं. माझ्या मुलांनाही त्यांच्या पित्याचे प्रेम मिळालं नाही. हस्तीनापुर सम्राटांनीही त्यांना कधी प्रेमाने जवळ केलं नाही. माझा संघर्ष माझ्या संततीच्याही नशिबी आला. पण माझं दुःख संघर्षाचं नाही, माझं दुःख माझ्या स्थानासाठी आहे. माझ्या मुलांच्या नैतिक हक्कासाठी आहे. माझा निरोप सांगूनही जर धर्मराज युद्धाला तयार नसेल तर माझ्या सुनेला सांग की ‘तू एका मोठ्या कुळातली कन्या आहेस आणि तुझं सासरही तेवढेच महान आहे. मोठ्या कुळातल्या मुली आणि महान वंशपरंपरा असणाऱ्या राज्याच्या महाराण्या अपमानित जीवन कधीच जगत नाहीत. स्वतःसाठी नाही तर निदान स्वतःच्या अपमानाच्या परिमार्जना करिता तरी तू तुझ्या पतींना युद्धासाठी प्रेरणा दे.”
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, निरागस वयात परक्याच्या घरी गेलेली कुंती तिथे कधी रमली की नाही सांगता येत नाही, परंतु ती तिच्या स्थानासाठी आणि अधिकारांसाठी अखंड सजग होती. इतर राजकन्यांप्रमाणेच तिचेही कुंतीभोजाकडे सर्व प्रकारचे शिक्षण, प्रशिक्षण झालेच असेल. सासरी हस्तीनापुरला आल्यानंतर मात्र इथला सगळा कारभार बघून तिच्यातली धोरणी, राजकारणी, आणि स्वतःच्या मुलांविषयी अखंडपणे सावध असणारी स्त्री जास्त प्रभावी बनली. स्वतःच्या स्थानाबद्दल, हक्काबद्दल ती अत्यंत जागरूक होती. क्षत्रियत्वाचा अति अभिमान असलेली अशी ती बाई होती. जीवन ही तिच्या मते लढाई होती आणि लढाईच्या वेळी ती अजिबात विचलित होत नसे. कुंती म्हणजे हस्तीनापुरच्या राजकारणाच्या पटलावरच्या पडद्यामागची सगळ्यात धोरणी आणि मुत्सद्दी राजकारणी व्यक्ती!
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
