Login

व्यासांच्या मानसकन्या भाग 29 मल्लयुद्ध प्रवीण भानुमती

मला युद्ध प्रवीण भानुमती
व्यासांच्या मानसकन्या भाग 29
मल्लयुद्ध प्रवीण भानुमती

“युवराज तुम्ही आयुष्यात इतक्या चुका केल्या, पांडवांची लाक्षागृहात जाळून हत्या करण्याचा तुम्ही केलेला अयशस्वी प्रयत्न, स्वतःच्याच चुलत भावांप्रती तुमच्या मनात असणारी असूया, इर्षा, मस्सर, राग, द्वेष साऱ्या जगाला माहिती आहे. पण म्हणून त्यासाठी तुम्ही स्वतःच्याच कुलाचा असा अपमान कराल असं वाटलं नव्हतं.” संतापाचा अतिरेक होऊन भानुमती रागाने लालबुंद झाली होती.

राजघराण्यातील सत्तेसाठी, राजसिंहासनासाठी पूर्वापार चालत आलेलं कौटुंबिक राजकारण भानुमतीला नवीन नव्हतच, पण तिचा आक्षेप होता तो लबाडीने, कपटाने, द्युतासारख्या हिणकस मार्गाने आपल्या पराक्रमी पतीने त्याच्याच चुलत भावांचं राज्य हिसकावून घेण्याला, तिचा विरोध होता तो पुरुषांच्या सत्तेच्या, शक्तीच्या आणि राज्यासाठीच्या स्पर्धेमध्ये, घराण्यातल्या कुलवधूला भर राजसभेत आणण्याला, आणि त्यातही तिच्या पदराला हात घालण्याला. कुरु राजघराण्यासारखं नामवंत आणि कीर्तीवंत अतिशय पुरातन आणि शतकानुशतकांच्या पराक्रमाची पुण्याई आणि शौर्याचा वारसा सांगणाऱ्या राजवंशात सत्तेच्या लोभापायी आणि आपापसातल्या आकसाचा परिपाक म्हणजे काय तर भर राजसभेत कुरूंच्या सर्व मंत्रीगणांसमोर, त्यांच्याच कुलवधूच्या, तिच्या इच्छेविरुद्ध, ती रज:स्वला असताना तिला सभेत आणल्यामुळे, तिच्या पदराला हात घातल्यामुळे राजघराण्यातल्या समस्त स्त्रियांच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला तडे गेले होते.

झाल्या प्रकाराने भानुमतीने दुर्योधनावर प्रचंड आगपाखड केली. तिच्यासाठी एका वीर पुरुषाने, तिच्याच सहचराने, विशेषतः दुर्योधनासारख्या त्या काळातील सर्वोत्कृष्ट गदायुद्ध प्रविण योध्याने स्वतःच्या बळाचा आणि सत्तेचा गैरवापर इतक्या खालच्या स्तराला करावा ह्याचा विचार ती स्वप्नात देखील स्वीकारू शकत नव्हती. दुर्योधनाने स्वतःच्याच भावी राजसभेत, स्वतःच्याच मोठ्या भावाच्या पत्नीला असं बळाने, तिच्या इच्छेविरुद्ध दु:शासनाकरवी फरफटत आणणं म्हणजे विश्वातील सर्वात मोठं दुष्कृत्य होतं आणि त्याकरिता भानुमती दुर्योधनाला कदापि क्षमा करणार नव्हती.

रागारागाने भानुमती स्वतःच्या दालनात परतली तर तिथे सुप्रिया आधीच येऊन बसली होती. आपल्या जिवलग मैत्रिणीला तिथे बघून भानुमतीच उरलंसुरलं अवसानही गळालं आणि ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली.

“युवराज्ञी सावरा स्वतःला, अजून किती विलाप करणार आहात? दुसऱ्याने केलेल्या अपराधाची शिक्षा तुम्ही स्वतःला का देत आहात? निदान स्वतःच्या स्वास्थ्याचा तरी विचार करा.” सुप्रियाने कसे तरी शब्द जुळवून भानुमतीशी बोलण्याचा प्रयत्न केला.

“सुप्रिया, ज्या व्यक्तीने हा असा अक्षम्य अपराध केला आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून प्रत्यक्षात माझा जोडीदार आहे. अगं राजघराण्यातल्या स्त्रियांची दुःख फार निराळी असतात. एखाद वेळी युवराजांनी त्याच्या चुलत भावांबरोबर युद्ध करून त्यांचं साम्राज्य आणि संपत्ती मिळवली असती तरी चाललं असतं किंवा युवराजांना वीरगती प्राप्त झाली असती तरीही मी आयुष्यभर त्यांची विधवा म्हणून जगले असते, किंवा त्यांच्या पराक्रमाचा टिळा भाळी लावून त्यांच्या कलेवरासह सहगमन केलं असतं, पण एका पराक्रमी बलशाली पुरुषांनं, एका अबलेला स्वतःच्याच राज्यसभेत बोलावुन तिचा अतिशय हीणकस शब्द वापरून, स्वतःच्याच वहिनीच्या पदराला हात घालण्याचा आदेश, स्वतःच्याच अनुज भावाला देणं आणि ती व्यक्ती माझा सहचर असणे यासारखं दुःख जगात दुसरं कुठलंही नाही. माझ्या पतीने मला आयुष्यभराची अशी जखम दिली आहे की ती आता कधीच भरून येणं शक्य नाही. आकाशात ज्याप्रमाणे चंद्र, सूर्य, तारे याशिवाय दुसरं काहीही सत्य नाही त्याचप्रमाणे माझ्या पतीने केलेल्या अक्षम्य अपराधाला आता कुठेही क्षमा नाही. त्यादिवशी राज्यसभेत जे काही घडलं त्यामुळे समस्त नारी वर्गाचा जो अपमान झालेला आहे, समस्त स्त्री जातीच्या आत्मसन्मानाला जो धक्का लागलेला आहे, त्याचे प्रायश्चित्त आता फक्त एकच आहे आणि ते म्हणजे देहांत शासन. पण ज्या साम्राज्याच्या युवराज्याच्या डोळ्यावर सत्तेची, संपत्तीची, स्वतःच्याच नव्हे तर चुलत भावंडांच्या साम्राज्याच्या लालसेची पट्टी बांधली असेल त्याचा विनाश अटळ आहे. आणि या साम्राज्याचे नागरिक म्हणून आता यापुढे जो काही अनर्थ घडेल, जी काही जीवित, आर्थिक आणि भावनिक, कौटुंबिक प्राणहानी होईल त्याला सर्वस्वी महाराज आणि स्वतः युवराजच उत्तरदायी असतील. राजघराण्यातील स्त्रियांना जीविताचं भय कधीच नसतं पण त्या कलंकित आयुष्य सुद्धा जगू शकत नाही. आणि द्रौपदी तर साक्षात याज्ञसेनी आहे या साम्राज्याचा विनाश अटळ आहे सुप्रिया! या साम्राज्याचा विनाश अटळ आहे.” भानुमतीच्या प्रत्येक शब्दातून तिच्या मनातली निराशा, हाताशा, एक मल्लयुद्ध कुशल युद्धपटूची अगतिकता सुप्रियाला स्पष्टपणे जाणवत होती.

दुर्योधनही कुठेतरी भानुमतीच्या शब्दांनी भानावर येण्याचा प्रयत्न करत होता, पण मामा शकुनींची आणि सर्वात जास्त महत्त्वाचं धृतराष्ट्राची सत्ताकांक्षा आणि कर्णाचा पांडवांप्रती असलेला द्वेष आणि उद्वेग दुर्योधनाला कधीच सारासार विचार करू देत नव्हता. त्यातच त्याला वाटणारी जन्मापासूनची इतरांची त्याच्याविषयीची सहानुभूतीची भावना, त्याला वाटणारी असुरक्षितता आणि त्याचं नसलेलं परंतु धृतराष्ट्राने तसा आभास निर्माण करुन त्याच्या मनात रुजवलेलं साम्राज्यप्रतीचं आकर्षण, हस्तीनापुर त्याचं नसलेलं साम्राज्य, ज्याचा युवराज म्हणून तो वाढवला गेला, भावी महाराज म्हणून ज्याचं तारुण्य फुललं, तोच आता त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घडामोडींकरिता मानसिक, भावनिक आणि वैचारिकरीत्या अजिबात तयार नव्हता. आणि त्यामुळे जे होऊ नये ते होऊन बसलं होतं. त्याच्या या कृतीमुळे समस्त हस्तीनापुरवासी त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघत होते, तर राज्यसभेतील पितामह, गुरु द्रोण, कृपाचार्य, विदुर आणि इतरही अनेक मंत्रीगण त्याच्या विरोधात गेले होते. पण तरीही सत्तेची आंधळी पट्टी डोळ्यावर बांधलेल्या दुर्योधनाला त्या कशाचीही तमा नव्हती. त्याला फक्त त्याचे स्वप्न, त्याच्या आकांक्षा, त्याचे युवराज पद, आणि हस्तीनापुरचं सम्राटपद एवढंच प्रिय होतं.

गांधारीने आणि पत्नी भानुमतीने दुर्योधनाला हर प्रकारे समजावून सांगितलं, भानुमतीने तर दुर्योधनाला अनुद्युता ऐवजी सरळ सरळ भीमाशी द्वंद्व युद्ध करण्याचा सल्ला दिला होता पण तरीही शकुनीच्या धूर्त सल्ल्याने त्याने युधिष्ठिरासमोर अनुद्युताचा प्रस्ताव मांडला आणि द्युतलंपट युधिष्ठिरने तो मान्य केला.


©® राखी भावसार भांडेकर.


संदर्भसूची

1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय, लेखक रणजित देसाई.

3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.

4. युगांत, इरावती कर्वे.

5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.

6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.

7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.