व्यासांच्या मानसकन्या भाग 28
मल्लयुद्ध प्रवीण भानुमती
मल्लयुद्ध प्रवीण भानुमती
नेहमी सत्तेसाठी आणि हस्तीनापुरच्या सिंहासनाचं स्वप्न उराशी बाळगणारा दुर्योधन मात्र भानुमतीवर जीव ओवाळून टाकी. साऱ्या हस्तीनापूरवर दुर्योधनाची सत्ता चाले पण दुर्योधनावर मात्र भानुमतीची! आधी सांगितल्याप्रमाणे भानुमती मल्लयुद्ध, बुद्धिबळ आणि युद्धकलेत निपुण होती. मल्लयुद्धाचे आणि कुस्तीचे अनेक डावपेच तिला येत आणि कुस्तीच्या सरावाच्या मैदानावर भानुमती पाहता पाहता दुर्योधनाला जमिनीवर पटकुन देत असे. दुर्योधनाने भानुमतीकडून मल्लयुद्धाचे अनेक डावपेच शिकले होते. आणि तिच्याच सल्ल्याने त्याने बलरामाला त्याला गदायुद्ध शिकविण्याची गळ घातली होती. त्याच भानुमतीने चौसरच्या खेळामध्ये पांडवांचा पराभव झाल्यानंतर, द्रौपदीच्या वस्त्राला हात घालण्याची हिंमत करणाऱ्या दु:शासनाला प्रोत्साहन देणाऱ्या दुर्योधनाची चांगलीच कान उघडणे केली.
“महाराणींचा विजय असो, महाराणींची कीर्ती त्रिखंडात नांदो, युवराज्ञी भानुमती आपल्याला दंडवत करते आहे.”
“भानुमती तू? यावेळी अशा अपरात्री इथे?”
“महाराणी मला आता या राजप्रसादात अजिबात सुरक्षित वाटत नाही म्हणून मी तुमच्या आश्रयाला आले आहे. सूर्यास्त होऊन जेव्हा अंधाराचे राज्य साऱ्या विश्वावर पसरतं तेव्हा माझ्या मनावरही एक भीतीची काळी सावली घिरट्या घालत असते. ती सावली अंधारात क्षणाक्षणाने मोठी मोठी होत जाते आणि मला तिच्या बाहुपाशात सामावू पाहते, ती सावली दुसरी तिसरी कोणाचीच नसून कुरू साम्राज्याच्या कुलवधूच्या शिलाला हात घालणाऱ्या इथल्याच सत्ताधाऱ्यांची आहे आणि म्हणूनच या अशा अपरात्री मी तुमच्या दालनात आले आहे, ते केवळ याच विश्वासाने की कदाचित तुमच्या पदराखाली मी माझं शील आणि जीव वाचवू शकेल.” भानुमतीच्या प्रत्येक शब्दातून उपरोध ओसांडून वाहत होता.
“भानू? अग तू हे काय बोलते आहे? राज्याची युवराज्ञीच जर राजप्रसादात सुरक्षित नसेल तर……..? तु कुणालाही भीण्याचं कारण नाही. एवढ्या मोठ्या संपन्न आणि सामर्थ्यशील कुरुंच्या राजप्रसादात कुणाला त्याच्या जीविताचं भय नाहीस झालं आहे की त्याने प्रत्यक्षात युवराज्ञीकडे वाकड्या नजरेने बघावं?”
“या राजप्रसादात खरंच एका स्त्रीचं, कुलवधूचं, वहिनीचं, सुनेचं रक्षण करण्याचं सामर्थ्य आहे?” भानुमतीच्या या वाक्याने महाराणी गांधारी क्षण दोन क्षण बसल्या जागी शहारली, आपल्या सुनेला काय म्हणायचं आहे हे तिच्या चटकन लक्षात आलं. पण आता तिच्याजवळ सुनेला द्यायला उत्तर नव्हतं.
“महाराणी आज मी या साम्राज्याची युवराज्ञी म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य स्त्री, तुमच्या राज्याची नागरिक म्हणून,एक नारी म्हणून तुमच्याकडे आली आहे. रज:स्वला असताना आज जे काही तोरण स्फटीका द्युतगृहात घडलं, तसाच एखादा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला तर? माझ्याच घरातल्या, माझ्याच लोकांनी माझ्या पदराला हात घातला आणि घरातले ज्येष्ठ मंडळी त्यावर राजनिष्ठेच कडू विष पिऊन मूकपणे माझ्या अस्तित्वाचे, स्वाभिमानाचे, स्त्रीत्वाचे, समस्त स्त्री जातीच्या अब्रूचे धिंडवडे मूग गिळून, गप्प बसून बघत राहिले तर मी दाद कुणाकडे मागावी?”
“भानू यावेळी माझ्याजवळ तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही पण ही वेळ या महाराणीला शब्दांचे बाण मारून घायाळ करण्याची नाही ग, तर पोरी, पांचालीच्या खचणाऱ्या मनोधैर्याला खंबीर आधार देण्याची आहे.”
“हस्तिनापुरच्या युवराजांना काय वाटलं? पांचाल नरेशांची कन्या, याज्ञसेनी द्रौपदी, पांडवांची धर्मपत्नी कल्याणी, इंद्रप्रस्थाची महाराणी पांचाली, कृष्णाची प्रिय भक्त कृष्णा-द्रौपदी हीचं मनोधैर्य तोडणं इतकं सहज शक्य आहे? आणि जर ती मनाने खचली असेल तर या कुरु साम्राज्याचा विनाश अटळ आहे. या साम्राज्याची नीतिमत्ता, नैतिकता, या घराण्याचा वारसा आपल्या पायदळी तुडवून, इथलेच भावी महाराज, युवराज दुर्योधन आपल्याच वहिणीला भर सभेत……. मला कल्पनाही करवत नाही……… दुःख तर एकाच गोष्टीचं आहे की हा सगळा किळसवाणा प्रकार माझ्याच नवऱ्याने केला! सत्ता, पैसा, ऐश्वर्य, आणि इंद्रप्रस्थाच्या राज्यासाठी, एका स्त्रीची इतक्या खालच्या पातळीला उतरून मानहानी करावी? जिथे माणुसकीच्या सगळ्या मर्यादा संपतात, जंगलात जनावर सुद्धा ज्या पद्धतीने वागत नाही तिथे एवढ्या पुरातन, भव्य आणि महान घराण्याच्या राजसभेत साक्षात कुलवधूच्याच पदराला, घरच्याच लोकांनी हात घालावा? महाराणी जर असा प्रसंग माझ्यासोबत घडला तर मी कुठे जाऊ?”
“भानु निदान तू तरी मला महाराणी म्हणू नकोस. आज हस्तिनापुरची महाराणी आत्मग्लानीच्या अथांग सागरात स्वतःच्याच मुलाच्या अक्षम्य अपराधाचं ओझं मनावर ठेवून, या कुरू साम्राज्याच्या प्रत्येक वंशजाची हजारो हजारो वेळा क्षमा मागते आहे.”
“ठीक आहे महाराणी, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधावी लागतील.” भानुमती महाराणी गांधारीच्या कक्षातून डोळ्यात अश्रू आणि मनात नवऱ्याविषयी वाटणारा प्रचंड राग घेऊन ती दुर्योधनाच्या प्रसादात गेली.
“भानू! विवाहाच्या इतक्या वर्षांनंतर आज पहिल्यांदाच तू स्वतः माझ्या प्रासादात आलीस.” दुर्योधनाने चाचरत, आश्चर्याने भानुमतीला विचारले.
“मग आपलं काय म्हणणं आहे युवराज? आल्या पावली परत जाऊ?”
“न…नाही, नाही तसं काही नाही. तू अचानक आज…म्हणून…” दुर्योधनाला काय बोलावं ते सुचेना
“मला काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत युवराज! आणि त्यांची उत्तर केवळ तुमच्यात जवळ आहे.” भानुमती करारी नजरेने दुर्योधनाच्या डोळ्यांमध्ये बघत होती आणि दुर्योधन अस्वस्थतेने स्वतःची नजर इकडे तिकडे फिरवत होता.
“तुमचं कुरु घराणं फार पुरातन आणि महान आहे हो ना? महाराणी शकुंतलेचा मुलगा भरताने स्वतःच्या कर्तुत्वाने हे साम्राज्य इतकं मोठं केलं. आणि स्वतःची एकही संतती साम्राज्य सांभाळण्यास लायक नाही असं बघून त्यांनी प्रजेतीलच एका सर्वसामान्य परंतु कर्तृत्ववान मुलाला हे राज्य दिलं हे ही खरं आहे ना?”
“अलबतच! तू ऐकलं ते सर्व शब्दन् शब्द खरं आहे.” दुर्योधनाने मोठ्या गर्वाने आणि ताठ्याने होकार भरला.
“महाराज दुष्यंत जेव्हा महाराणी शकुंतलेला विसरले होते तेव्हा शकुंतलेने त्यांना भर राज्यसभेत समस्त मंत्री गण आणि प्रजाजनांसमोर फटकारून, त्यांच्या आर्य धर्माविषयी आणि राजाच्या कर्तव्याविषयी त्यांना याच राज्याच्या राजसभेत चांगली समज दिली होती हेही तुम्हाला माहितीच असेल.”
“भानू तुला काय झालं आहे आज? तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे बोल.” हातांच्या बोटांचा अस्वस्थ चाळा करत दुर्योधन वैतागून बोलला.
“युवराज मला आज एका गोष्टीची फार खंत वाटते की इतकी महान परंपरा आणि वारसा असणाऱ्या या कुरु घराण्यात, भर सभेत एक ऋषिकन्या साक्षात हस्तीनापुरच्या सम्राटाला खडे बोल सुनावून त्याची कान उघडणे करू शकते, त्याच कुरूंच्या राज्यसभेत माझ्यासारख्या एका राजस्त्रीच्या, मातेसमान वहिनीच्या पदराला हात घालण्याचा आदेश तुम्ही दिला?”
“भानुमतीsss!” दुर्योधन रागाने कडाडला. स्वतःच्या शब्दांना…..”
“जे कृत्य करताना माझ्या लहान दीराचा हात थरथरला नाही, की त्याच्या आत्म्याने त्याला प्रतिप्रश्न केला नाही. जो आदेश देताना तुम्ही एका क्षणाकरीता सुध्दा स्वतःच्या आदेशाचा काय परिणाम होईल याचा फेरविचार केला नाही, त्या आदेशाच्या केवळ माझ्या उच्चारण्याने तुम्हाला इतका त्रास होतो आहे युवराज? विचार करा युवराज, जर द्रौपदीच्या ठिकाणी मी असते तर? एक पती म्हणून तुम्ही आज कुठे असता? स्वतःच्या कर्तृत्वाने, तुम्ही स्वतःच्या जोरावर जे काही शून्यातून निर्माण केलं ते कुणी कपटाने आणि चलाख लबाडीने धूर्तपणाने हिसकावून घेतलं आणि तुमच्या धर्मपत्नीचा अपशब्द आणि हीन वाक्यांनी अपमान केला, त्यावरच न थांबता ती रज:स्वला असताना, तिच्या पदरालाही हात घातला, तर तुम्ही काय कराल?” भानुमतीच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या पण त्याच वेळी तिच्या नेत्रातून आगीच्या ज्वाळाही निघत होत्या. भानुमतींच्या या प्रश्नाने दुर्योधनाचं अंतर्मन ढवळून निघालं होतं, एक क्षण त्याला वाटलं की विदुराला पांडवांच्या मागे पाठवून त्यांना माघारी बोलवावं पण बालपणापासून आत्तापर्यंत राजघराण्याने आणि समाजाने त्याची केलेली हेटाळणी, उपहास, वडिलांचं राजसत्तेवरचं आंधळं प्रेम आणि डोळे बांधून मुलांप्रती गांधारीची असणारी उदासीनता त्याच्या अंगावर धावून आली. तो काहीतरी बोलणार होता तेवढ्यात परत भानुमती गरजली.
“आर्यपुत्र, तुमच्या पराक्रमावर, शौर्यावर मी प्रेम केलं अगदी मनापासून! पण तुमच्या आतमध्ये सत्तेसाठी आसुसलेला जो विषारी नाग आहे त्याने आज तुमचा पूर्णपणे घात केला आहे. उद्या जर हस्तीनापुरच्या एखाद्या अबलेला संरक्षणाची गरज भासली तर ती निर्भयपणे हस्तीनापुरच्या नरेशाकडे आशेने पाहू शकेल का? ती तुम्हाला संरक्षण मागेल का? तुम्ही जे कृत्य केलं आहे त्याला केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या नंतर येणाऱ्या कुरु साम्राज्याच्या समस्त पिढ्यांना या कृत्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटलं? द्रौपदीच्या पदराला हात घालून तुम्ही पांडवांना अपमानित केलं? बालपणापासून आत्तापर्यंत तुमच्या अपमानाचा तुम्ही बदला घेतला? असं दुष्टपणे वागून, तुम्ही स्वतःचं मन आणि आत्मा दोघांचीही हत्या केली. हस्तीनापुर सारखं संपन्न शहर तुमच्या राज्याची राजधानी होती, कुलगुरू कृपाचार्य, युद्धकला निपूण गुरु द्रोणाचार्य, पितामहांसारखे लढवय्ये, असूनही तुम्हाला काहीही करता आलं नाही! घराण्याचा वारसा मिळुनही तुम्ही तिथेच आहात, वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही स्वतःच असं काय कमावलं? चुलत भावंडांचे राज्य आणि तेही द्युताने आणि कपटाने? पण पांडवांनी मात्र त्यांच्या शौर्याने, कौशल्याने खांडवप्रस्थ सारख्या ओसाड, खडकाळ, माळरानावर इंद्र सभेला लाजवेल अशी राजधानी वसवली आणि स्वतःच नवीन राज्य निर्माण केलं, त्याचीच असुया तुमच्या मनात दाटली होती ना? आणि त्याकरिता तुम्ही द्युता सारखा हिणकस मार्ग अवलंबलात? यश मीळवण्याकरीता कधीही लबाडी करता येत नाही. तिथे कठोर परिश्रमांचीच आवश्यकता असते युवराज! उद्या माझा लक्ष्मण मोठा होईल आणि मला विचारेल ‘माते मला पिताश्रींचं कर्तुत्व सांग’, तर मी काय सांगणार? तुझ्या पिताश्रीनीं स्वतःच्याच चुलत भावंडांबरोबर कपट करून त्यांचं संपूर्ण साम्राज्य गिळंकृत केलं. एवढेच करून ते थांबले नाहीत तर स्वतःच्या मोठ्या वहिणीच्या पदरालाही………….. तुम्ही हे काय करून ठेवलं आर्यपुत्र? येणाऱ्या पिढ्यांना आपण कुठला इतिहास सांगणार आहोत? ज्या स्त्रीच्या उदरातून भूतलावरील समस्त साम्राज्यांचा उषःकाल जन्म घेतो, ज्या नारीच्या आशीर्वादाने साम्राज्ये उभी राहतात आणि तिच्या एका अश्रूने तीच साम्राज्य जमीनदोस्त होतात, तिच्याच शिलाला आम्ही कुरुवंशींनी भर सभेत हात घातला?”
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा