मल्लयुद्ध प्रवीण भानुमती
सोळा महाजनपदांपैकी प्रसिद्ध असलेलं कंबोज हे एक महाजनपद. आज राजप्रसादाच्या सभेत महाराज चंद्र वर्मन यांच्याशी सुताचे फारच गंभीर आणि काहीतरी गुढ बोलणे सुरू होते. भाटाने उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यगणीक महाराज चंद्र वर्मांच्या चेहऱ्यावरच्या चिंतेच्या आठ्यांचं जाळं वाढतच चाललं होतं. गेल्या काही वर्षांपासून आर्यवर्तामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्यामुळे खरंतर सर्वच महाजनपदांमध्ये अस्वस्थतेची एक लाट निर्माण झाली होती. कोणीही स्पष्ट काही बोलत नव्हतं पण सगळं काही आलबेल आहे अशी ही परिस्थिती नव्हती. अशा अस्वस्थतेतच त्यांनी त्या दिवशीची सभा संपन्न केली.
रात्री ही महाराज स्वस्थ नव्हतेच. साधारण पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी कंबोजच्या लगत असलेल्या गांधार महाजनपदातून पितामह भीष्मांनी स्वतःच्या पुतण्यासाठी गांधारी ही वधू सुनियोजित केली होती. त्यानंतरही वर्षानुवर्ष हस्तीनापुर वरून येणाऱ्या बातम्या संपूर्ण आर्यवर्ताची चिंता वाढवण्याचेच काम करत होत्या.
‘विवाहानंतर लगेचच पांडूचं दिग्विजय करिता निघून जाणं आणि घरात यादव कुलातली सून आली म्हणून मग भीष्मांनी स्वतः हस्तक्षेप करून खूप सारं धन, धान्य, गोधन, पशुधन, सुवर्ण,ताम्र आणि इतर बऱ्याच भेटवस्तू देऊन रथसारथ्यात निपुण असलेली मद्र देशाची राजकन्या, आणि अश्व परीक्षेत तरबेज माद्रीसह पांडूची लग्न गाठ बांधली पण तरीही अचानक महिन्या दोन महिन्यात काहीतरी घडामोडी घडल्या आणि पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात गेला.
इकडे गांधारीने ही पातीव्रत्याची परिसीमा गाठून पतीच्या अंधत्वाला स्वीकारून स्वतःही डोळ्यांवर पट्टी बांधली याचा नेमका काय अर्थ घ्यायचा? महाराणी गांधारीची ती कुरु साम्राज्य प्रति निष्ठा होती, की मनातला क्षोभ तिने स्वतःचे जीवन अंधकारमय करून राजकुलाला निर्देशित केला होता?’ स्वतःच्या शयन कक्षात अस्वस्थपणे एरझाऱ्या मारत, मंचकावरच्या चषकामधून मदिरेचे कडवट घोट घशाखाली उतरवताना राजा चंद्र वर्मांची काळजी अधिक गहन होत चालली होती. युद्धकला, बुद्धिबळ, आणि मल्लयुद्धात तरबेज असणाऱ्या आपल्या लेकीचं भानुमतीच स्वयंवर राजा चंद्रवर्मांना करायचं होतं. भानुमतीची आई आणि राजा चंद्रवर्माची पत्नी ‘आश्रा’ हिने तर राजाच्या खनपटीला बसूनच मुलीच्या स्वयंवराचा घाट घातला होता.
“महाराणी तुम्हाला तुमची लेक एवढी का डोईजड झाली आहे? एवढी गुणसंपन्न, रूपसंपन्न, युद्ध कला, मल्लयुद्ध आणि बुद्धिबळात तरबेज असलेली माझी लेक मी कुणालाही देऊन टाकू का?” पत्नी पुढे हरलेला बाप राजा चंद्रावर्मन अतिशय क्षोभाने महाराणी आश्राला लेकीच्या लग्नाच्या घाईविषयी विचारत होता.
“ हे आर्यपुत्र, जगातील कुठलाही बाप असा नाही की त्याला त्याच्या संततीमध्ये कुठलाही दोष दिसेल. त्यातच कन्या ह्या पित्याच्या अगदी हृदयाजवळच असतात. त्यामुळे प्रत्येकच वधूपित्याला आपली मुलगी फारच गुणी आणि सर्वगुणसंपन्न आहे असं वाटतं. पण महाराज सध्या आर्यवरतात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून तुमच्याही हे लक्षात आलं असेल की आता अर्जुन काही तुम्हाला तुमचा जावई म्हणून मिळणार नाही त्यामुळे………”
“त्यामुळे काय महाराणी? आम्ही आमच्या नक्षत्रासारख्या मुलीला कुठल्याही कफ्फलकाच्या पदरी बांधायच का?” वधूपिता राजा चंद्रवर्मन चिडून बोलला.
“हे नृपश्रेष्ठा, जसा तुला तुझ्या कन्येचा अभिमान आहे तशीच मलाही तिच्या भविष्याची चिंता आहे. आर्यपुत्र! थोडासा व्यवहारिक दृष्टीकोन ठेवून विचार करा. तुम्ही आणि माझ्या परमप्रिय लेकीने ज्या अर्जुनाचा ध्यास घेतला आहे ते सर्व पांडव लाक्षागृहात जळून……” ती कल्पनाही महाराणी आश्राला करावीशी वाटत नव्हती. पण तरीही नको त्या गोष्टी ओठांवर आल्याच.
“हम्म्म!” राजाने एक मोठा सुस्कारा सोडला. “मग आता तुमचं काय म्हणणं आहे?”
“हे गजेन्द्रा! मला तर वाटतं की आपण आपल्या लेकीचं स्वयंवर आयोजित करावं. ती तिच्या मनपसंत वर निवडुन गृहस्थाश्रमात सुखी होईल!”
“पण महाराणी आत्ताच तुम्ही म्हणालात ना की भानूने मनोमन अर्जुनाला वरले आहे! मग…” राजाच्या समोर त्याच्या सुंदर लेकीचा दुःखी चेहरा आला.
“आर्यपुत्र, आपण अर्जुनाला सुद्धा स्वयंवराला बोलवूया! पण तो आलाच पाहिजे अशी अट मात्र नको!”
“पण महाराणी आत्ताच तुम्ही म्हणालात की लाक्षागृह….”
“महाराज पण त्यानंतर आता जवळपास एखाद वर्षानंतर पांचालच्या राजकन्येचं स्वयंवर झालं होतं. आणि तिथे एका गरीब ब्राह्मणाने त्या मत्स्य यंत्राचा पण जिंकला होता. मत्स्य यंत्राइतका कठीण स्वयंवराचा पण जिंकणं या आर्यवर्तात केवळ गुरु द्रोणाचार्य, कर्ण, आणि अर्जुनालाच शक्य आहे. याचाच अर्थ पांडव जिवंत आहेत पण….”
“पण आता त्यांना सुयोग्य अशी पत्नी मिळालेली आहे आणि तरीही तुम्ही म्हणता की अर्जुनाला निमंत्रण द्यावं?” स्वतःच्या श्वासांवर, शब्दांवर नियंत्रण ठेवण्याचा असफल प्रयत्न करून जवळजवळ क्रोधातिशयाने आणि अविश्वासानेच राजा चंद्रवर्माने त्याच्या पत्नीला हा प्रश्न विचारला.
“अलबतच! महाराज तुम्ही स्वतः मोठे योद्धे आहात आणि तुमचेच गुण तुमच्या लेकी मध्ये आले आहेत. स्वयंवरापूर्वी जर तिला कळलं की अर्जुन स्वयंवराला येणारच नाही तर ती तर हातात वरमाला घेणारच नाही! म्हणूनच महाराज माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आर्यवर्तातल्या समस्त राजांना स्वयंवराची निमंत्रणे पाठवा, आणि आपल्या लेकीचं नशीब आणि प्रेम थोर असेल तर कदाचित अर्जुनच तिला वरेल!” नाही म्हटलं तरी महाराणीचं आपल्या लेकीवर जीवापाड प्रेम होतं आणि तिला सुयोग्य वर मिळावा असं त्या मातेच्या हृदयाला वाटतं होतं, पण तरीही सद्यस्थितीत जी काही भूराजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्याला अनुसरूनच महाराणी आश्राने महाराजांना वास्तव परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
अखेर सर्व गोष्टींचा सारासार विचार करून राजा चंद्रवर्माने आपल्या लाडक्या लेकीचं-भानुमतीचं स्वयंवर सुनियोजित केलं. भानुमतीच्या स्वयंवराचे खलिते सर्व राजे महाराजांना पाठवण्यात आले. भानुमतीच्या सौंदर्य पेक्षा तिच्या गुणांचीच चर्चा संपूर्ण आर्यवर्तात पसरलेली असल्याने भानुमतीच्या स्वयंवराकरिता, जरासंध, वक्र, दुर्योधन, कर्ण, शिशुपाल ,रुक्मी असे महान योद्धा भानुमतीच्या स्वयंवराला सज्ज झाले.
बुद्धिमत्ता, चातुर्य, सौंदर्य, शारीरिक बलासह शरीर सौष्ठव अशा गुणांनी युक्त या गुणी लेकीचा पती कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण कंबोज देशाला लागून राहिली होती. सोळा शृंगार, सौभाग्य अलंकार स्वतःच्या तनुवर लेवुन भानुमती सलज्ज भाव मुखावर ठेवून, हातातली वरमाला सावरत, हळुवार एक एक पाऊल टाकत स्वयंवराला उपस्थित राजांसमोरून धीम्या चालीने पुढे सरकत होती. दुर्योधनाची आणि तिची एका क्षणासाठी नजरा नजर झाली आणि तिने पटकन आपले लोचन दुसरीकडे वळवले. प्रत्येक सम्राटाच्या समोर एक मंद स्मित करत हलकेच मानेला झटका देत, भानुमतीचं हळूच पुढे जाणं स्वयंवरात नकार मिळालेल्या राजालाही भान हरपायला लावत होतं.
भानुमतीने असाच एक सलज्ज कटाक्ष दुर्योधनाकडे टाकला त्याचवेळी तिच्या मनात तिच्या वडिलांनी सांगितलेला एक विचार क्षणभर तरळुन गेला.
“पिताश्री, हस्तीनापुर नरेशांनी स्वतःच्या मुलाचं नाव असं का ठेवलं असावं?” युद्ध शाळेमध्ये शस्त्रांची निगराणी करणाऱ्या राजा चंद्रवर्माला त्याची लेक खङगावरून हात फिरवताना हा प्रश्न विचारत होती.
“भानू तुला नक्की काय म्हणायचं आहे?” भानुमतीचा प्रश्न न केळल्याने राजाने तिलाच प्रतिप्रश्न केला.
“हे काय हो बाबा तुम्हाला इतकंही कळत नाही? दुर्योधन असं कुठे नाव असतं का? त्याच्या जन्माच्या वेळी अपशकुन झाले होते असं मी ऐकलं आहे पण मला तरी वाटतं की त्याच्या पालकांनीही असाच काहीतरी विचार केला असावा, त्याच्या या अशा विचित्र नाव ठेवण्यामागे!”
“भानू ही कुठली तुझी ग पद्धत तुझ्या बाबांशी बोलण्याची? आणि तेही युद्ध शाळेमध्ये?” तेवढ्यात महाराणी आश्रा युद्ध शाळेतून धनुर्विद्येचा सराव करून शस्त्रागाराकडे येत भानुमती वर कडाडली.
“महाराणी शांत व्हा! भानू तुझा प्रश्न अतिशय योग्य आहे, पण बेटा तुला दुर्योधन या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? अगं दुर्योधन म्हणजे ज्याला युद्धात परास्त करणे महाकठीण असा बलशाली योद्धा!” महाराजांनी भानुमतीच्या प्रश्नाचे निराकरण केलं.
एका क्षणात भूतकाळातला हा संवाद भानुमतीच्या आठवणीत तराळुन गेला आणि ती दुर्योधनानंतरच्या राजासमोर जाऊन उभी राहिली. भानूची प्रिय सखी सुप्रिया प्रत्येक राजाचं कर्तृत्व, वीरता, त्याच्या घराण्याची थोरवी वर्णन करुन तिला सांगत होती पण जरासंधाचं वर्णन पूर्ण होण्यापूर्वीच भानुमतीच्या सुकुमार हातांवर एक मजबूत हाताची घट्ट पकड घट्ट झाली आणि कुणालाही काहीही कळण्यापूर्वी दुर्योधनाने बलपुर्वक भानुमतीच्या हातातली वरमाला बळजबरीने स्वतःच्या गळ्यात घातली.
झाल्या प्रकाराने भानुमती भांबावून गेली. स्वयंवराकरिता आलेले राजे मात्र त्वेषाने आपापले शस्त्र घेऊन दुर्योधनाकडे धावले. पण तोपर्यंत फार उशीर होऊन गेला होता दुर्योधनाने बलपुर्वक भानुमतीचं हरण केलं होतं आणि कर्णाने स्वयंवरात उपस्थित समस्त बलशाली योद्ध्यांना स्वतःच्या शरांवर तोलुन धरलं होतं.
स्वयंवरात आपलं हरण झालेलं आहे आणि आता दुर्योधनाशिवाय आपल्याला पर्याय नाही असं मनाला समजावत भानुमतीने आपली सखी सुप्रियाचा विवाह कर्णाशी लावून देण्याच्या अटीच्या बदली दुर्योधनाला सहचर म्हणून संमती दिली.
अशा रीतीने भानुमतीचा दुर्योधनाशी आणि तिची प्रिय सखी सुप्रियाचा कर्णाशी विवाह संपन्न झाला.
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा