व्यासांच्या मानसकन्या भाग 26
याज्ञसेनी द्रौपदी
याज्ञसेनी द्रौपदी
वनवास संपल्या नंतर अज्ञातवासात परत त्याच मानहानीच्या प्रसंगाला द्रौपदीला सामोरे जावे लागले. द्युताच्या वेळी धृतराष्ट्राने तिला दिलेल्या तीन वरांमुळे तिने स्वतःला दास्यत्वातून मुक्त केले, वनात असताना जयंद्रथानेही तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण भीम अर्जुनाने तिची सुटका केली. युधिष्ठिराने जयेंद्रथाला बहिणीचा नवरा म्हणून क्षमा केली परंतु द्रोपदीला हे कधीच मान्य नव्हते.
“महाराज, विटंबना माझी झालेली आहे, मग या दुष्ट पापी जयेंद्रथाला क्षमा करणारे आपण कोण? प्रत्येक वेळी माझ्या आयुष्याचे निर्णय तुम्ही परस्पर घेऊन मोकळे होता. तूम्हाला काय वाटतं तुमच्या क्षमा करण्याने या जयेंद्रथाला थोडीशी तरी सुबुद्धी येईल? परस्त्री मातेसमान असते या अगदी मूलभूत गोष्टीचा वासनेच्या आहारी जाऊन ज्या माणसाला विसर पडतो, जो स्त्रीची तर सोडाच पण नात्यांची ही चाड ठेवत नाही, मी यांच्या बायकोची वहिनी, तिला भगिनी मानण्याचे सोडून घाणेरड्या वासनेच्या आहारी जाऊन ज्याने मला स्पर्श केला त्या जयेंद्रथाला इतक्या सहजी मी क्षमा करणार नाही. दुष्ट लोकांना क्षमा करून त्याचा काहीही उपयोग नसतो. या दुष्टाने नात्यांची जराही लाज राखली नाही, पण मी तसं करू शकत नाही! कितीही केलं तरी दु:श्याला तुमची बहीण आहे आणि माझी नणंद! क्षत्रियाचा पराभव म्हणजे त्याचा अपमान, त्याच्या स्वाभिमानाची हत्या, त्याच्या अहंकारावर केलेला मर्माघात! केवळ रणांगणात क्षत्रियांचा पराभव होत नसतो तर त्यांची मानखंडनाही त्यांचा अपमान असतो! या वनवासात जयंद्रथानं माझ्या पदराला हात घातला तर त्याचे पाच पाट काढून त्याला सोडून द्या! साऱ्या विश्वाला कळू द्या की पांडवांच्या पत्नीच्या पदराला हात घालणाऱ्यांचा शेवट किती अपमानास्पद आणि लाजिरवाणा होतो ते! द्रोपदी ने सांगितल्याप्रमाणे भिमाने जयेंद्रथाचे पाच पाट काढले.
अज्ञातवासातही द्रौपदी वर परत तीच लाजिरवाणी परिस्थिती ओढावली. तिच्या सौंदर्यावर भाळून किचकाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती दुःखाने जळत होती. तिचा संताप उफाळून आला. तिने विराट राजाकडे रुजूगायी केली तेव्हा कंक झालेला युधिष्ठिर तिला परत पूर्वीचाच उपदेश करतो.
“सेविके राजाचे मनोरंजन करणं हाच तुझा धर्म! राजाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास सेवकांना पाप लागतं! राजाची सेवा कर आणि कृतकृत्य हो!”
यावेळी द्रौपदी शांत राहणं शक्यच नव्हतं. तिच्या अश्रूंनी आता ज्वालामुखीचं स्वरूप घेतलं होतं. तिच्या काळा कुरळ्या केसांमध्ये अग्नीच्या ज्वाला निर्माण झाल्या होत्या. तिचे डोळे आग ओकत होते, ओठ रागाने थरथरत होते. ज्या अग्निकुंडातून ती निर्माण झाली होती जे तेज तिने द्युताच्या वेळी कौरवांच्या सभेत दाखवले होते, त्यापेक्षा कितीतरी जास्त रुद्ररूप तिचे आता झाले होते. झालेला प्रकार तिने भीमाला सांगितला. भीमाने कीचकाचा वध केला. पण तेवढ्यानेही द्रौपदी शांत झाली नाही. कीचक वधानंतर त्याच्या मरणाची बातमी मोठ्या दिमाखात तिने रक्षकांना सांगितली आणि कीचकाची प्रेतयात्रा पहात ती उभी होती, किचकाच्या भावांच्या दृष्टीस ती पडली आणि भावाच्या वधाचा सूड घ्यायचा म्हणून त्यांनी तिला बांधून कीचकाबरोबर जाळण्यासाठी स्मशानात नेण्याचा प्रयत्न केला. परत भीमाने त्या गोंधळात तिला सोडवली. या एका प्रसंगातून द्रौपदीच्या मनातली स्वतःच्या अपमानाची ज्वाला किती धगधगती होती हे लगेच लक्षात येते.
तिच्यावर बळजबरी करणारा, तिच्या शिलाला हात घालणारा मेल्यानंतर त्याची प्रेतयात्रा बघून अपमानित झालेली द्रौपदी जणू जगाला सांगते आहे की माझा अपमान पूर्ण झाल्याशिवाय मी शांत होणार नाही आणि पांडवांनाही शांत बसू देणार नाही.
विराटपर्वात ती स्पष्टपणे म्हणते, “जिला युधिष्ठिर सारखा नवरा मिळाला तिला सुख कसे मिळणार?” संतापाच्या भरात द्रोपदीचा तोल सुटतो, ती तीळतीळ जळते, तिचा संयम क्षणाक्षणाने ढळतो. जन्माच्या वेळी जळते आणि जाळते रूप घेऊन आलेली ही कामकलिका तिच्या वृत्ती अतिशय भावना संपन्न आहे. तिच्या वासना धगधगणाऱ्या परंतु शुद्ध आहेत. अर्जुनाच्या पराक्रमावर ती भाळली होती. तिला कधीही वैभवाचा, धनाचा, भौतिक सुखांचा किंवा राजेशाही जीवनाचा मोह होता असं म्हणता येणार नाही. तिच्या स्वयंवराचा पण अर्जुनाने जिंकला तेव्हा तो दरिद्री ब्राह्मण पुत्र आहे, हे द्रौपदीला माहिती असूनही ती त्याची सहचरणी झाली. कीचक मेल्यानंतर बृहन्नडेच्या रूपातला अर्जुन तिला विचारतो, “तू किचकापासून कशी मुक्त झालीस? कीचक कसा मेला ते मला सांग, मला ऐकण्याची इच्छा आहे.” त्यावेळी ती त्याला फटकारून म्हणते, “बृहन्नडे तुझं सैरंध्रीशी काय काम आहे? तू तर आता अंत:पुरात सुखात बसली आहेस, सैरंध्रीला दुःख आहे ते तुला नाही, तिच्या वेदना तुला कधीही कळणार नाहीत. केवळ स्त्री वेश केल्याने स्त्रीचं दुःख पुरुषाला कधीही उमगणार नाही. माझ्या दुःखावर हसण्यापेक्षा पुढच्या युद्धाचा विचार कर.” द्रौपदीची मनोवस्था अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्या प्रत्ययास येते.
अर्जुनासह इतर चौघांनीही तिचं पाणी ग्रहण केलं तेही तिने मान्य केलं. पण तरीही तिचं पातीव्रत्य मात्र खोटं नाही. द्रौपदीच्या वासना, कामभावना, तिचा राग, द्वेष, मत्सर, आणि स्वतःच्या स्वाभिमाना प्रति असलेली जाणीव अत्यंत जिवंत आणि सजग आहे. सर्व स्त्रियांमध्ये जागृत असणारी कोणत्या पुरुषाला आपल्याबद्दल काय वाटते ही जाणीव द्रौपदीला होती. त्या पुरुषाला जवळ करावे की दूर ठेवावे हा निर्णय ती अतिशय वेगाने घेऊ शकत होती. विरक्ती हा मुळात द्रौपदीचा गुणच नाही. शृंगारची, नटण्या, मुरडण्याची तिची उपजत आवड कधीही तिने लपविली नाही. वनवासात धनहीन पतींना ती दागदागिने, रेशमी तलम वस्त्रे मागत नाही, तर वसंतात फुललेली गंधमादन पर्वतावरची सहस्त्रदळी रंगबेरंगी कमळे तिला हवी आहेत. ती आणायला भीम जातो. द्रौपदीचा कुठलाही हट्ट असो तो पूर्ण करायला भीम सदा तत्पर असतो आणि हे द्रौपदी पूर्णपणे जाणून आहे. द्रोपदीचे आपल्या पतींशी वागणं अतिशय संयमाचं आहे. युधिष्ठिराशी ती वाद विवाद करते पण तरीही तिला हे माहिती आहे की अज्ञातवासाचा पण राजसभेत युधिष्ठीरानं मान्य केला आहे. त्यामुळे तेरा वर्षे वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण म्हणून ती गप्प बसून राहत नाही. युधिष्ठराला ती, तिच्या इतर चार पतींच्या अपमानाची आणि स्वतःच्या चुकीची जाणीव करून देते. अर्जुनावर ती प्रेयसी प्रमाणे प्रेम करते, स्वयंवरात ज्या अर्जुनाने तिला जिंकलं तेच तिचं पहिलं प्रेम आहे. भीमाची ती स्वामीनी आहे. द्रौपदीच्या प्रत्येक संतापात आणि रागात, अपमानात, क्रोधात भीमासारखी साथ तिला कुणीही दिली नाही. नकुल आणि सहदेव यांना ती जपते परंतु भविष्यासाठी तयारही करते.
पांडव शूर होते, मोठ्याला द्युताचं व्यसन, भीम आडदांड, त्याला केवळ प्रीती आणि क्रोध एवढंच कळतं. अर्जुन पराक्रमी धनुर्धर, लढाऊ वृत्ती त्याच्यामध्ये आहेच पण त्याला राज्याची लालसा नाही. धाकटे दोघे जुळे बंधू, मोठे भाऊ जसं करतील जसं म्हणतील त्याला साथ देणारे आणि त्यांच्या हो मध्ये हो करणारे. पांडवांना स्वतःची अशी राज्याची लालसा नव्हतीच. द्रौपदीशी विवाह झाल्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या स्वत्वाची जाणीव झाली. पण तरीही द्युतांमध्ये मिळालेलं सर्वस्व हरणारा युधिष्ठिर जणू राज्यापासून अलिप्तच वाटतो. आपल्या नवऱ्याने क्षत्रिय धर्म पाळावा आणि गेलेले राज्य आणि नाव परत मिळवावे म्हणून द्रौपदी सतत धडपडत असते. द्रौपदी वर मनापासून प्रेम करणारा भीम तिला सतत साथ देत असतो. नकुल सहदेवाला स्वतःची मत किंवा विचार नाहीतच. तेही भिमाचीच बाजू घेतात.
एकंदरीतच पांडवांचा राज्यावरचा अधिकार आणि सत्तेची महत्वकांक्षा वनवासात सतत द्रोपदीनं जागती ठेवली. सर्वच बाबतीत उदासीन झालेल्या पतींची महत्त्वकांक्षा फुलवण्याचं, अपमानाच्या गर्तेतून त्यांना बाहेर काढण्याचं, आणि स्वतःची काहीही चूक नसताना झालेल्या अपमानाचा उट्टे फेडण्याचं काम द्रौपदी करत राहिली.
द्रौपदी ही पतीव्रता आहे पण स्वतःविषयी, स्वतःच्या मान-अपमानाविषयी ती अत्यंत जागृत आहे. अर्जुनावर तिने प्रेम केलं परंतु तिचा अपमान झाल्यानंतर मात्र ती शांत बसली नाही. तिने अर्जुनाला दिव्यास्त्रांच्या प्राप्ती करिता उद्युक्त केलं. किचकाने अपमान केल्यानंतर ती अर्जुनाकडे न जाता भीमाकडे गेली. कृष्ण जेव्हा शांती प्रस्ताव घेऊन हस्तिनापुरला जात होता तेव्हाही तिने त्याला एवढेच सांगितलं,”कृष्णा, सत्ता, धन, राज्य, सैन्य, दास दासी, भूमी, गोधन, अश्वधन, गजशाळा, बुलंदी राज महाल यापेक्षाही या जगात जर काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे सत्य, धर्म आणि स्त्रीचं पावित्र्य!”
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
***********************************
