Login

व्यासांच्या मानसकन्या भाग 25 याज्ञसेनी द्रौपदी

व्यासांच्या मानसकन्या
व्यासांच्या मानसकन्या भाग पंचविस
याज्ञसेनी द्रौपदी

वनवासात असताना माझा सारा सारा राग उफाळून वर आला. मी युधिष्ठिरला खूप बोलले. त्या काळातल्या पाच सर्वश्रेष्ठ क्षत्रिय योद्धांची ती दरिद्रावस्था मला सहन होत नव्हती. त्या असाह्यते मागे पतींच्या दारिद्र्याचा मला कंटाळा होता आणि मी भोगलोल होते असा नव्हता. पांडवांशी लग्न केले तेव्हाही ते दरिद्रीच होते पहिल्या रात्री तर मी त्यांच्या पाया गती जमिनीवरच झोपले होते तेही अत्यंत समाधानाने. वनवासातच माझं गृहिणी पण नेहमी खुलून दिसले सत्यभामेला पत्नीच्या कर्तव्याची कितीतरी रहस्य मी सांगितली आहेत.पण पांडवांचा स्वाभिमान आणि त्यांची महत्त्वकांक्षा फुलवणे मला अत्यावश्यक होते.

माझ्या वरामुळे युधिष्ठिर मुक्त झाला पण याची कधीही आठवण मी त्याला करून दिली नाही आणि माझ्या मनातला त्याने मला पणाला लावली हा रागही शेवटपर्यंत गेला नाही.

“दुर्योधनाचे काळीज खरोखरच लोखंडाचे बनलेला आहे तुझ्यासारख्या धर्म पर श्रेष्ठ माणसाला त्याने लागट बोलणे ऐकवली. गोड गोड बोलून त्याने तुला द्युवशता करिता बोलाविले. पहिल्या द्युताचा अनुभव गाठीला असूनही तू अनुद्युता करिता का तयार झालास? तू इंद्रप्रस्थाचा राजाधिराज आणि आज असा वनात चटईवर बसला आहेस तुला अशा स्थितीत बघून कुणाला संताप येणार नाही? भीमा सारखा राजपुत्र आणि अर्जुनासारखा धनुर्धर हे दोघे आज तहान भुकेने व्याकुळ आणि दीन झालेले आहेत. तुझे दोघे धाकटे बंधू धुळीत लोळत आहेत तरीही तुला संताप कसा येत नाही? मी द्रुपदाची मुलगी, पांडूची सून, धृष्टुद्युमनाची बहीण, आणि तुम्हा पाचानची राणी आज वनवासी झालेली पाहून तू इतका शांत कसा बसू शकतोस? भावांना या स्थितीत पाहूनही तुला खेद कसा होत नाही? क्षत्रियाला क्रोध हा आवश्यक आहे पण तुझं मात्र सारच जगावेगळ! तू शत्रूंना क्षमा करू नको क्षमा कुणाला करायची? पूर्वी ज्याने उपकार केले त्याचे अपराध क्षमा करावेत. निर्बुद्धांचे, आश्रितांचे अपराध क्षमा करावेत. अजानतेपणी केलेले अपराध क्षमा करावेत पण तो दुर्योधन सतत अपराध करतो आहे, तो लोभी आहे, पापी आहे, त्याला अजिबात क्षमा करू नको. क्षत्रियाने वेळ पाहून मृदू व्हावे तर कधी क्रोधाने जळावे. शांततेने जे साधते ते आक्रस्थळेपणाने नाही हे मला माहिती आहे पण शांत असायचे त्यावेळी शांतता दाखवावी आणि जिथे क्रोध हवा तिथे मवाळपणा काय कामाचा?”

एवढे बोलूनही युधिष्ठिरावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही.

“काय वाटेल ते झाले तरी क्षमा सर्वात श्रेष्ठ आहे हे तुलाही माहिती आहे पांचाली. हे सारं जग क्षमेवरच तर चालत आहे. मला राज्य द्या असं म्हणून मी लोभाने सद् सद् विवेक सोडणार नाही. तू एक गोष्ट लक्षात का घेत नाहीस सध्या आपला काळ कठीण आहे. भरत वंशाला उतरती कळा लागली आहे. ही ओहोटी आता पुढे थांबवता यायची नाही असे मला स्पष्ट दिसते आहे म्हणूनच मी कुठलाही उतावळेपणा करीत नाही.” युधिष्ठीराने काश्यपगाथेवर आधारलेले क्षमेचे सूत्र सांगताच मला आणखीनच चिड आली.

“तुझ्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या त्या भगवंताला माझा नमस्कार असो. धर्म म्हणे आपण त्याचे रक्षण केले की आपले रक्षण करतो. तुम्ही यज्ञयाग केलेत. दान दिले, सत्तेची बाजू कधीही सोडली नाही त्याचं फळ हेच का? माणसाच्या मागे जशी त्याची सावली जाते तसे तुम्हीही धर्माच्या मागे मागे गेलात त्याचं फळ काय तर हे असं दैन्य आणि दुःख?”

“द्रौपदी फळाची इच्छा मनात ठेवून मी कधीही धर्म केला नाही. जो हलकट असतो तोच धर्माचा सौदा करतो. देवाच्या बाबतीत तू शंका घेऊ नको. त्याला दोष तर अजिबात देऊ नको. जगात जर धर्माचं बोल राहिलं नाही तर हे जग बुडेल, तप, ज्ञान,दान, अध्यात्म विरक्ती आणि विद्या, व्रतवैकल्ये सारं निष्फळ होईल. भगवंताची करणी आघात असते म्हणून तू त्याच्या ठरवलेल्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नकोस.”

झाले गेले विसरून जाऊन मूकपणाने सारे सहन करणे हा मुळी द्रौपदीचा स्वभावाच नव्हता. वनवासात ती संतापाने जळली, तिने कडकड बोटे मोडली, शिव्या शाप दिले. युधिष्ठिराने आयुष्यभर खंत करीत बसून राहू नये म्हणूनच तिने बृहस्पतीनीतीतील अनेक वचने युधिष्ठिरला ऐकवली.

“ईश्वराला सुद्धा सृष्टीचे कर्म करावे लागते. जीवजंतूही जगण्यासाठीच अहोरात्र धडपड करतात. कच्च मडकं पाण्यात विरघळते त्याचप्रमाणे जो काही न करता नुसतं बसून राहतो तो नाश पावतो. माणसाला सतत प्रयत्न करावे लागतात. तिळात तेल असते. गायीत दूध असते. लाकडात आग असते पण त्यांना बाहेर काढायला योजना आणि प्रयत्न करावे लागतात. कर्म करावं लागतं. प्रयत्न करणाऱ्यांच्याच मागे परमेश्वर असतो. आळसाने बसणाऱ्याच्या कपाळी दारिद्र्य. पृथ्वी नांगरून बी पेरून मग पाहिजे तर शेतकऱ्याने मी माझे काम केले आता सारे पर्जन्य देवतेच्या हाती असे म्हणावे. समुद्र हटवता येतो पर्वत फोडता येतो पण त्या करता लागते ती प्रयत्नांची जोड. तुम्ही पाच बंधू मिळून काहीही करू शकता तुमच्यासमोर त्या दुर्योधनाची काय कथा?”

शेवटी युधिष्ठिराने निक्षून सांगितले,”मी वनवासाची प्रतिज्ञा केली आहे ती सभेत मी सत्य सोडणार नाही प्राणाहून मला माझी प्रतिज्ञा प्रिय आहे. तुम्ही मला शेतकऱ्याचा दृष्टांत देता ना? मग शेतकरी जशी फळाची वाट पाहतो तशी जरा वाट पहा. क्षत्रिय जसा क्रोधाने आणि शस्त्राने शोभून दिसतो तसाच त्याने संयमही अंगी बाळगावा.”

याच वनवासात जयंद्रथाने द्रौपदीचे हरण केले. धर्म, भीम, अर्जुन कुणीही घरी नव्हते. अशावेळी तिला पळवण्यात आलं. पांडवांनी पाठलाग करून तिला सोडवलं. जयद्रथ पळून गेला. युधिष्ठिराने तो बहिणीचा नवरा म्हणून त्याला क्षमाही केली पण द्रोपदीला हे मान्य नव्हतं. तिने भीम आणि अर्जुनाला त्याच्या मागे पिटाळलं. त्याला धरून युधिष्ठापुढे क्षमा मागायला लावली. नंणदेचा पती म्हणून स्वतःच्या अपमानाचा सूड म्हणून त्याचा वध करण्याऐवजी भीमाला त्याचे पाच पाठ काढून त्याला सोडून द्यायला लावलं.

वनवास संपल्यावर द्रौपदीचा अज्ञातवास फारच दुःखाचा गेला. रानात ती पांडवांची बायको. एका वेळची राणी अशी होती. पण ज्यादासीपणातून तिने दिवटा च्या वेळी स्वतःला मुक्त करून घेतले होते, तसेच दासी पण तिला अज्ञातवासात आले. जवळजवळ तसलीच विटंबना व्हायची वेळ आली होती.

द्रोपदी वरची संकटे तिच्या जवळच्या माणसांनी आणलेली आणि नवऱ्याने स्वतःवर ओढवून घेतलेल्या निष्क्रियतेमुळे आलेली. द्रोपदी पाचांची पत्नी असूनही अनाथासारखी होती तिचं माहेर श्रीमंत असूनही वनवासात कुणीही तिची मदत करू शकत नव्हतं. तिच्या पाठीशी पाच बलदंड पती आणि शूर भाऊ पाठीराखे असूनही ती मात्र असाह्य होती. तिच्या संतापाचं, दुःखाचं, दैन्याचं खरं कारण हेच आहे. कितीतरी वेळा तिची विटंबना तिचे नवरे आणि सासरे मोकाट्याने पहात होते. काही प्रतिकार करणे त्यांना शक्य नव्हते किंवा त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. पहिल्या विटंबनेतून ती जणू दैवी चमत्काराने वाचली तर विराट पर्वत भिमाने तिला गुप्तपणे सोडवलं.

प्रिया, सुंदरी, पतिव्रता आणि पंडिता या चार भूमिकात द्रौपदीचं व्यक्तिमत्व सहज रेखाटता येतं. द्रोपदी ही तेजस्विनी. होती मानिनी होती. तरी पण शालीनपणाचे अवगुंठण तिने टाकले नव्हते. कुलीन स्त्रीचे गृहस्थाश्रमातले बंदिस्त जीवनात तिने शिरोधार्य मानलं होतं. पण द्युताने तिच्यातली धगधगती ज्वाला आणखीनच त्वेषाने पेटली.


©® राखी भावसार भांडेकर.


संदर्भसूची

1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय, लेखक रणजित देसाई.

3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.

4. युगांत, इरावती कर्वे.

5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.

6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.

7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.

8. पर्व, एस.एल. भैरप्पा