लग्नाचा साइड इफेक्ट !
भाग १
" लग्न ठरण्यापूर्वी जेव्हा तू मला हॉटेलमध्ये भेटायला यायचास, तेव्हा तुझा तोरा एखाद्या देखण्या मोरासारखा असायचा गौरव!
डोक्यापासून पायापर्यंत सगळं कसं अगदी कडक. आणि साखरपुडा झाल्यावर तर तू असा फिरायचास, जणू पूर्ण जंगलाचा वाघ तूच आहेस. मग लग्न झाल्या-झाल्या अचानक या वाघाचं... म्हणजे अशा मवाळ प्राण्यात रूपांतर कसं झालं?"
डोक्यापासून पायापर्यंत सगळं कसं अगदी कडक. आणि साखरपुडा झाल्यावर तर तू असा फिरायचास, जणू पूर्ण जंगलाचा वाघ तूच आहेस. मग लग्न झाल्या-झाल्या अचानक या वाघाचं... म्हणजे अशा मवाळ प्राण्यात रूपांतर कसं झालं?"
रसिकाने आरशात पाहत आपले कानातले काढता काढता खोचक स्वरात विचारले.
ऑफिसच्या बॅगमधून लॅपटॉप काढून चार्जिंगला लावणारा गौरव थबकला. त्याने कपाळावर आलेला घामाचा थेंब पुसला. एक दीर्घ श्वास घेतला.
" रसिका, माणसाला मोर होऊन नाचायला आणि वाघ होऊन डरकाळी फोडायला पाठीवर कोणतंही ओझं नसावं लागतं. एकदा का संसाराच्या गाडीला जुंपलं, की मोराचे पिसारे गळून पडतात आणि वाघाचा फक्त भारवाहक प्राणी होतो, ज्याला रोजच्या भाषेत गाढव असं म्हणतात!"
" हं... टोमणे मारायला तर तुमचे हात कोणी धरू शकत नाही. मी फक्त एवढंच म्हणाले होते की, पुढच्या महिन्यापासून घराचा मेंटेनन्स आणि लाईट बिल तुम्ही तुमच्या पगारातून द्या. माझ्या पगारातून मला आरडी (RD) सुरू करायची आहे. शेवटी भविष्याची काळजी नको का करायला?" रसिकाने तोंड फुगवून बेडवर बसत म्हटले.
गौरव काही बोलणार, तितक्यात दरवाजावर थाप पडली. बाहेरून अलकाबाईंचा म्हणजे गौरवाच्या आईचा आवाज आला,
" गौरव, अरे आलास का बाबा? रसिका, चहा ठेवलाय का ग त्याच्यासाठी ? दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसून डोळे लाल झालेत त्याचे. जरा आल्याचा चहा दे त्याला करून."
रसिकाने हलकेच डोळे फिरवले. ती हळू आवाजात कुजबुजली,
" बघा, तुमच्या आईंना फक्त तुमचाच पुळका. मीही नऊ तास नोकरी करून आलेय, पण सून काय मशीन आहे ना!"
गौरवने शांत राहणेच पसंत केले. तो उठला. मोबाईल बघत बाहेर हॉलमध्ये आला. अलकाबाई तिथे सोफ्यावर बसून भाजी निवडत होत्या. गौरवला पाहताच त्या म्हणाल,
" गौरव, जरा इकडे बस रे. तुझ्याशी बोलायचं होतं. ते तुझ्या बाबांच्या औषधांची नवी स्ट्रिप आणायची आहे आणि या वेळेस डॉक्टरांनी काही नव्या टेस्ट लिहून दिल्यात. त्याला थोडे जास्त पैसे लागतील. ते तुझ्याकडे विचारत होते..."
"हो आई, मी उद्या सकाळीच लॅबवाल्याला घरी बोलवून टेस्ट करून घेतो. तू काळजी नको करू." गौरवने हसून सांगितले.
"आणि ऐक ना... रसिकाचा पगार झाला असेल ना या वेळेस? तिला म्हणावं घरखर्चासाठी या नऊ-दहा हजारांची नड आहे, तेवढी पूर्ण कर. दरवेळी तू एकटाच सगळं कसं करणार? आता तीही कमावती आहे ना !" अलकाबाईंनी हळूच मूळ मुद्दा काढला.
गौरवच्या पोटात गोळा आला. आत बेडरूममध्ये रसिका तिच्या पगारातून बचतीचे बेत आखत होती, तर बाहेर आई घरखर्चाचा हिशोब मांडत होती. दोघांच्या मधोमध गौरव उभा होता.ज्याला स्वतःचे हक्क माहिती नव्हते, पण दोघांची कर्तव्ये मात्र अगदी अचूक तोंडपाठ होती.
रात्री जेवणाच्या टेबलावर अपेक्षेप्रमाणे शांतता पसरली होती. रसिकाने ताटात भाजी वाढताना भांडी थोडी जास्त आवाजात आदळली.जे अलकाबाईंच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही.
"काय गं रसिका, आज भाजीवर काही राग आहे का तुझा?" अलकाबाईंनी डाळ वाढून घेताना विचारले.
"राग कशाचा असणार सासूबाई? दिवसभर काम करून आल्यावर थकवा येतो, दुसरं काही नाही." रसिकाने सडेतोड उत्तर दिले.
"नोकरी तर माझा गौरवही करतो. उलट त्याचा ताण जास्त असतो. पण तो कधी चिडचिड करत नाही." अलकाबाईंनी आपल्या लेकाची बाजू लावून धरली.
" कारण गौरवला घरी आल्यावर चहा मिळतो आणि मला घरी आल्यावर स्वयंपाकघरात शिरावं लागतं, हाच तो फरक!" रसिकाचा आवाज थोडा चढला.
" अरेरे! आधुनिक काळातल्या मुलींना नात्यांपेक्षा अधिकारांची भाषा जास्त समजते. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना इतका हिशोब नसतो करायचा." अलकाबाईंनी सुनावले.
"आई! रसिका! प्लीज... शांत बसा."
गौरवने दोघींच्या समोर हात टेकले होते. त्याचं जेवण तसंच अर्धवट राहिलं होतं.
गौरवने दोघींच्या समोर हात टेकले होते. त्याचं जेवण तसंच अर्धवट राहिलं होतं.
रात्री उशिरा, जेव्हा अख्खं घर शांत झालं, तेव्हा गौरव बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. गार वारा सुटला होता. खिशातल्या मोबाईलवर लागोपाठ दोन मेसेज आले. पहिला मेसेज बँकेचा होता.
'होम लोनचा हप्ता कट झाला आहे.' आणि दुसरा मेसेज ऑफिसच्या बॉसचा होता.
'उद्या सकाळी आठ वाजता क्लायंट मीटिंग आहे, प्रेझेंटेशन तयार ठेवा.'
'होम लोनचा हप्ता कट झाला आहे.' आणि दुसरा मेसेज ऑफिसच्या बॉसचा होता.
'उद्या सकाळी आठ वाजता क्लायंट मीटिंग आहे, प्रेझेंटेशन तयार ठेवा.'
गौरवने अंधारा आकाशाकडे पाहिले. अविवाहित असताना तो मित्रांमध्ये किती राजासारखा जगायचा. साखरपुडा झाल्यावर रसिकाच्या प्रत्येक हट्टाला हो म्हणणारा तो वाघ होता. पण आज... आईच्या अपेक्षा, बायकोचे अधिकार, घराचे हप्ते आणि ऑफिसची नोकरी या सगळ्याच्या ओझ्याखाली तो फक्त एक राबणारा प्राणी बनला होता.
त्याच्या नकळत त्याच्या मनात विचार आलाच ,
" वाघाची डरकाळी तर कधीच विरून गेली... पण या संसाराच्या पाठीवरचं ओझं वाहता वाहता माझं गाढव कधी झालं, हे माझं मलाच समजलं नाही!"
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
