Login

राजनंदिनी भाग एक

राजा विरभद्रचा इतिहास
काही वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवर अधर्माचं सावट पसरायला लागलं होतं, तेव्हा देव आणि दैत्य यांच्यात एक भीषण युद्ध पेटलं होतं, जसं की प्राचीन काळातील देव-दैत्य संग्राम पुन्हा जिवंत झालं होता..

आकाशात वज्रास्त्र चमकत होतं, तर भूमीवर अग्निचे ज्वाळा उसळत होते. समुद्र उफाळले होते, पर्वत हादरत होते इतके कि जणू काही सृष्टीचा अंत जवळ आला होता.

देवराज इंद्र आपल्या ऐरावतावर उभे राहून देवसैन्याला आदेश देत होते,


“दैत्यांना थांबवा! त्यांच्या अधर्माचा अंत आजच झाला पाहिजे. पुन्हा त्यांनी स्वर्गाकडे पाहण्याची हिंमतही करू नये!”


त्यांच्या हातातलं वज्रास्त्र आकाश चिरत दैत्यांवर कोसळत होतं.

तर दुसऱ्या बाजूला, दैत्यांचा सेनापती अंधकासुर क्रोधाने गर्जत होता,


“आमचा अंत कधीच होणार नाही… आम्ही अंधारातून पुन्हा जन्म घेऊ! आणि या वेळी फक्त स्वर्ग नव्हे, संपूर्ण सृष्टी आमच्या अधीन असेल!”


त्याच्या डोळ्यांत क्रोधाची ज्वाला पेटली होती.

काही दिवस ते अनेक युगांसारखं भासणारं  युद्ध चालूच राहिलं. देवांनी ब्रह्मास्त्र आणि इतर दिव्य अस्त्रांचा वापर करून अखेर दैत्यांना मागे हटवलं.

शेवटी देवांचा विजय झाला, पण तो पूर्ण नव्हता...

कारण अंधकासुर, आपल्या पत्नी व मुली समवेत, युद्धभूमीवरून अदृश्य झाला होता.

तो पृथ्वीवर आला आणि गडद अंधारात लपून बसला... कुणालाही न कळता...

इकडे देवांनी विजयाचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली, स्वर्गात आनंदाचे नगारे वाजू लागले...

पण त्याच वेळी अंधकासुर शांतपणे आपली शक्ती वाढवत होता, अंधारात. प्रतिशोधासाठी तो भडकत होता... आपल्या मुलीला तयार करत होता....


*****************************



काळ पुढे सरकला…

हजारो वर्षांनंतर, पृथ्वीवर सूर्यगड नावाचं एक समृद्ध आणि संपन्न राज्य फुलून आलं होतं. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत विसावलेलं, गिरीजा नदीच्या शांत आणि स्वच्छ काठावर वसलेलं ते राज्य जणू स्वर्गाचा एक तुकडाच भासत होतं.


सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण राज्य सोन्यासारखं झळाळून निघायचं. शेतांमध्ये पिकलेली सोनरी धान्यं मंद वाऱ्यासोबत डोलायची. पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण प्रसन्न होऊन जायचं आणि राज्यातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान, सुरक्षितता आणि आनंद स्पष्ट दिसायचा.

सूर्यगड राज्यामध्ये केवळ संपन्नता नव्हती, तर एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आपुलकीही होती.
इथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा…जणू संपूर्ण राज्य एक मोठं कुटुंबच होतं.
अशा या संपन्न राज्यावर राज्य करत होते, राजा वीरेंद्र आणि राणी देवयानी.

न्यायप्रिय, पराक्रमी आणि प्रजेवर अपार प्रेम करणारे हे दोघं…प्रजेसाठी ते केवळ राजा-राणी नव्हते, तर आई-वडिलांसारखे आधारस्तंभ होते. राजा वीरेंद्र प्रत्येक निर्णय घेताना प्रजेचा विचार करायचे,
तर राणी देवयानी प्रजेच्या सुखदुःखात स्वतः सहभागी व्हायची.

सगळं काही सुरळीत होतं…
शांतता, आनंद आणि समृद्धीने नटलेलं सूर्यगड खरंच आदर्श राज्य होतं…


पण…या शांततेच्या आड एक भयंकर अभद्र सावली हळूहळू आकार घेत होती…त्या समृद्ध सूर्यगडावर अनेक वर्षांपासून आंधकासुराची वाईट नजर होती.
तो होता अंधाराचा अधिपती…सत्ता, सूड आणि विनाश यासाठी जगणारा…पण किती ही प्रयत्न करून पण सूर्यगडवर तो कधीच आक्रमण करू शकला नव्हता. त्यामागे एक कारण होतं,एक दैवी वरदान.

फार वर्षांपूर्वी, राजा वीरेंद्रच्या पूर्वजांमध्ये एक पराक्रमी आणि तेजस्वी राजा होऊन गेला होता, राजा वीरभद्र.
तो अत्यंत शूर, धर्मनिष्ठ आणि परम भक्त होता. प्रजेच्या सुखासाठी तो स्वतःच्या सुखाचाही त्याग करायला तयार असायचा.

एकदा, आपल्या राज्याच्या रक्षणासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी, त्याने कठोर तपस्या करण्याचा संकल्प केला…

दिवस-रात्र उपवास, ध्यान आणि उपासना करून त्याने स्वतःला पूर्णपणे देवीच्या चरणी अर्पण केलं…

त्याच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन, एके दिवशी पार्वती माता त्याच्या समोर प्रकट झाल्या.

माता प्रेमाने म्हणाल्या,

“बाळ वीरभद्र, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे… सांग, तुला काय हवं आहे?”


त्यावर राजा वीरभद्र नम्रतेने म्हणाला,

“माते, माझ्या राज्यावर कधीही संकट येऊ नये… माझी प्रजा सदैव सुखी आणि सुरक्षित राहो…”

त्याचं उत्तर ऐकून पार्वती मातेने स्मित केलं…,

कारण एवढ्या मोठ्या तपस्येनंतरही त्याने स्वतःसाठी काहीही मागितलं नव्हतं…

त्या म्हणाल्या,

“तुझी इच्छा पूर्ण होईल, वीरभद्रा…”

आणि त्यांनी त्याला एक दिव्य आशीर्वाद दिला,
कारण एवढं प्रसन्न होऊन देखील राजा विरभद्र ह्याने स्वतःसाठी काहीही न मागता प्रजेसाठी मागितलं होत.


“विरभद्रा, जोपर्यंत या राज्यातील प्रजा एकमेकांशी प्रेमाने, हेवेदावे न करता आणि एकजुटीने राहील…तोपर्यंत या राज्याची सुरक्षितता अबाधित राहील.”


त्या दिवसापासून सूर्यगड राज्यावर एक अदृश्य संरक्षणकवच निर्माण झालं. कोणतीही वाईट शक्ती त्या राज्याच्या सीमेत प्रवेश करू शकत नव्हती…

म्हणूनच आंधकासुर कितीही प्रयत्न करत असला,
तरी तो सूर्यगडला स्पर्शही करू शकत नव्हता…

पण काळ बदलत होता…

आंधकासुर लपून बसून विचार करायचा,

“हे कवच तोडायचं कसं…?”


वर्षानुवर्षे विचार करत करत,
त्याच्या मनात एक भयंकर योजना आकार घेऊ लागली होती....

पण त्याला माहीत नव्हतं की…

राजा वीरभद्रने त्या वेळी केवळ राज्याच्या रक्षणासाठीच वर मागितला नव्हता…तर त्याने एक गुप्त वर देखील मागितला होता…

तो पुन्हा नम्रतेने म्हणाला होता,

“माते, जर कधी अधर्म पुन्हा वाढला…आणि माझं राज्य पुन्हा संकटात आलं…तर माझ्या वंशात अशी एक दिव्य कन्या जन्माला येऊ दे…जी स्वतः तुमच्या शक्तीचा अंश असेल…”


पार्वती मातेने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं… आणि म्हणाल्या,

“विरभद्रा तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या वंशात एक दिव्य कन्या जन्माला येईल…आणि तीच अंधाराचा, अधर्माचा अंत करेल…”

क्षणभर थांबून त्या पुढे म्हणाल्या,

“पण, वीरभद्रा… ती कन्या तेव्हाच जन्माला येईल…
जेव्हा तुझ्या वंशातील राजा स्वतः मला तिच्यासाठी आर्ततेने हाक मारेन…आणि जेव्हा अधर्म मर्यादेपलीकडे वाढलेला असेल…”

त्यावर विरभद्र नम्रतेने झुकला आणि तथास्तु म्हणून माता अंतर्धान पावल्या.


त्या दिवशी दिलेलं ते वरदान…काळाच्या गर्भात दडलं…

पण आता…वेळ आली होती...अंधार पुन्हा जागा होत होता आणि नियती हळूहळू त्या दिव्य कन्येच्या जन्माकडे वाटचाल करत होती…"कारण जेव्हा जेव्हा वाईट शक्ती वाढतात, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी एक दैवी शक्ती जन्माला येते…”



क्रमश :-



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →