Login

थोरली सून (मुखवट्या मागची नाती)

माणसाचा मुखवट्या मागचा खरा चेहरा कधी ना कधी नक्कीच उजेडात येतो
मुखवट्या मागची नाती.

थोरली सून

“एवढा लसुण कशासाठी सोलते आहेस?” स्वयंपाक घरात लसुण निवडणाऱ्या रमाला मोठी जाऊ उषा विचारत होती.

“ताई मागच्या आठवड्यात तुमच्या सुमितच्या शाळेच्या डब्याकरिता मी थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी केली होती, तेव्हा मधल्या भाऊजींना ती खूप आवडली होती. दोन दिवसातच त्यांनी ती फस्त केली. कालच मला भाऊजी म्हणत होते की भरपूर लसूण घालून त्यादिवशी केली होती तशी शेंगदाण्याची चटणी कर, म्हणूनच लसूण सोलते आहे.” रमाने, उषाला सांगितले.

“मधल्या भाऊजींचं हे बरं आहे. कमवायची दमडी नाही आणि चालले कोंबडी खायला. खायला काळ नी भुईला भार! यांना घरी बसून काय होतं म्हणायला की शेंगदाण्याच्या चटणीत भरपूर लसूण घाल! शेंगदाणे काय रुपये किलो आहेत माहिती आहे का तुला? आणि लसणाचा भाव? मधल्या भाऊजींना घरी बसून नुसतं चांगलं चुंगलं खायला हवं. एक पैसा कमावून कधी घरात आणत नाहीत. दे तो निवडलेला लसण इकडे मी आलं-लसणाची पेस्ट करून ठेवते. संध्याकाळच्या भाजीला कामात येईल.” मोठी जाऊ उषा फणकाऱ्याने बोलली. तिने लगेच निवडलेला लसुण आणि आल्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवून दिली.

“रमा, हे एवढे उडदा-मुगाचे पापड का भाजून ठेवलेस? आज काही आपल्या घरी सण नाही आहे.” रात्रीचा स्वयंपाक रमा करत होती तेव्हा लगेच उषाने तिला टोकलं.

“खिचडी कढी सोबत पापड असले की मजा येते. आई पण दुपारीच म्हणाला होत्या की 'दोन दिवस झाले तोंडाला काही चव नाही तर रात्री खिचडी सोबत मुगाचे पापड भाजशील.' लहान जाऊ रमा, उषाला सांगत होती.

“आईने सांगितलं आणि तू लगेच केलं!”शब्दात शक्य तितका उपरोध आणत उषा बोलली. “आईंना काय जातंय म्हणायला की रात्री मुगाचे पापड भाजून ठेव! पापड किती महाग झालेत माहिती आहे का त्यांना? मला तर आईंचं हेच कळत नाही की दर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्या तोंडाची चवच कशी जाते? उतार वयात त्यांना पापड पचवायला जमणार आहे का? उद्या परत त्यांचं टुमणंं सुरू होईल,’उषा पोटात जरा गॅस धरल्यासारखा वाटतो आहे. तुझ्याकडे असेल तर एखादी गोळी किंवा चूर्ण दे बाई. नसेलच काही तर एखादी गोळी डॉक्टरलाच विचार.’ “तोंडावर यांचा ताबा नाही आणि उतरत्या वयात काही पचत नाही, तरीही यांना जिभेचे चोचले पुरवायचे आहेत. यानंतर पापड भाजताना किती भाजायचे ते मला विचारल्याशिवाय भाजू नकोस.” उषा रागारागाने, तणतणत स्वतःच्या खोलीत निघून गेली.

रमाला मात्र उषाच्या वागण्याचा काहीच अर्थ बोध होत नव्हता. उषा तोंडावर सासू आणि लहान दिराबरोबर गोड गोड बोलत होती पण त्यांच्या माघारी मात्र खडे फोडत होती. सासूला आणि मधल्या दिराला मात्र उषाच्या मनात काय सुरू आहे याची काडी मात्र कल्पना नव्हती.

त्यानंतर 15 एक दिवसात उषाने घरी पावभाजीचा बेत केला. नेहमीच्या सवयीप्रमाणे मधल्या दिरांनी पावभाजीवर यथेच ताव मारला.

“वाह उषा वहिनी वा! आजची पावभाजी तर एक नंबर झाली आहे. खरंच तुमच्या हातच्या पावभाजीची सर तर बाहेर हॉटेलात मिळणाऱ्या पावभाजीलाही नाही.” मधले दीर मुक्तकंठाने उषाची प्रशंसा करत होते.

“चला भाऊजी तुमचं आपलं काहीतरीच! तुम्हीच पाव आणून दिलेत म्हणून हा बेत तडीस गेला. आपल्या घरात तुमच्याशिवाय कोण इतक्या चवीने खातं? तुमच्या मोठ्या भावाला तर नोकरीतून फुरसत मिळत नाही. आणि लहान भाऊजी तर आधीपासूनच त्यांच्या कोर्ट केसेस मध्ये व्यस्त असतात. घरातल्या बाईनं कितीही मनापासून पदार्थ बनवले तरी जोपर्यंत कोणी मनापासून दाद देत नाही, तोपर्यंत करायचा हुरूपही येत नाही.” उषा मानभावी पणाने बोलली.

“रमा तव्यावर पाव शिकताना त्यावर थोडा पाव भाजीचा मसाला ही टाक छान चव येते. मधल्या भाऊजींना तसेच मसाला पाव आवडतात बरं! आई तुम्हाला देऊ का अजुन थोडी पावभाजी?” लहान जाऊ रमाला सूचना देता देता, उषा सासूच्या समोर समोर करत होती.

“अग पण मी इतकी तिखट पावभाजी खात नाही. त्रास होतो बाई मला!” सासुबाईंचा सूर जरा तक्रारीचाच होता.

“होय मला माहिती आहे की तुम्हाला आजकाल जास्त तिखट सहन होत नाही म्हणूनच मी रमाला तुमच्यासाठी थोडी फिक्की पावभाजी करायला लावली आहे. रमा आईंसाठी काढून ठेवलेली ती साधी पावभाजी दे बरं.”

सासू आणि मधले दीर पावभाजी खाऊन टीव्ही बघायला गेले. इकडे स्वयंपाक घरात परत उषाची टकळी सुरू झाली.

“माहित नाही मधल्या भाऊजींनी आणि सासूबाईंनी मागच्या जन्मी कुठलं पुण्य केलं होतं! इतकं आरामदायक जीवन आजकाल लहान मुलांच्या नशिबी सुद्धा नसतं. मोठा मुलगा आणि लहाना मुलगा कमावून आणणार आणि ही दोघं घरात बसून मस्त आयतं खाणार. बरं खा त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण खाण्याला काही सुमार? जिभेला गोड लागलं म्हणून आपल्या मागे कोणीतरी जेवणारं आहे याचा काही विचारच नाही! आता ही उरलेली पावभाजी काय पोळी सोबत खायची? सगळे पाव तर मायलेकानचे मिळून फस्त केले.” उषाची खूप चिडचिड होत होती कारण पावभाजीसाठी आणलेले पाव संपले होते. तिं आणि रमाचं जेवण बाकी होतं.

उषाच्या मनात काय सुरू आहे हे रमाला अजिबात कळत नव्हतं. उषा घरात सासूशी आणि मध्याल्या दिरांशी तोंडावर गोड गोड बोले, पण माघारी मात्र ती त्यांची सतत निंदा करी. रमा नवीनच लग्न होऊन सासरी आली होती. उषाने रमाच्या नवऱ्याचा ही विश्वास संपादन केला होता. घरातल्या लहान-मोठ्या कुरबुरी मला सांगायच्या नाही असं रमाच्या नवऱ्याने तिला निक्षून सांगितल्याने ती त्याला काही सांगूही शकत नव्हती आणि उषाचं हे असं दूटप्पी वागणं रमाला कळत नव्हतं.

घरातला किराणा, वाणसामान, सासूचं औषध-पाणी, आठवड्याचा भाजीपाला आणि इतर सगळी लहान मोठी बाहेरची काम उषाच करत होती. रमा त्या शहरात नवीन होती. शिवाय सासूचा उषावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे मोठ्या जावेबद्दल आपण कुणाला काही सांगितलं तरीही ते पटणार नाही हे रमाला कळत होतं.

“उषा, दोन दिवस झाले मला उन्हाळी लागल्यासारखं वाटते आहे. चहा मध्ये, चहाचा मसाला टाकणं बंद कर बाई! आणि दुपारी मला होमिओपॅथीच्या डॉक्टर कडे घेऊन चल.” सासूबाईंनी उषाला सांगितले.

सासू आंघोळीला गेल्यानंतर स्वयंपाक घरात उषाची परत किरकिर सुरू झाली.

“कितीदा सांगितलं आहे उतरत्या वयात काही खाण्याच्या गोष्टी सोडून द्या पण नाही…यांना चहाच्या मसाल्याने त्रास होतो आहे तर आता सगळ्यांनीच अळणी चहा प्यावा असं यांचं फर्मान! जरा काही दुखलं खुपलं की यांना लगेच डॉक्टरकडे जायचं असतं! जरा म्हणून कळ सोसत नाही. पैसे का इथे झाडाला लागलेत?” उषाच्या तोंडाचा पट्टा सुरू होता.

उषाने काही बाही क्षुल्लक कारण सांगून सासूला डॉक्टरकडे नेण्याचे टाळलं. उषाला सासूसाठी आणि मधल्या दिरांसाठी होणारा खर्च खूप क्षुल्लक वाटे. पण स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या सगळ्या हौशी ती पूर्ण करे.

सासूबाईंना दोन दिवसांपासून जरा सर्दी खोकला झाला होता. उषाने त्यांना घरचंच खोकल्याचे औषध आणि काढा करून दिला. पण नेहमीप्रमाणे डॉक्टरकडे नेलं नाही. उषाच्या भिशी पार्टीची सहल दोन दिवसांकरिता जवळच्याच एका फार्म हाऊसवर जाणार होती. अर्थातच त्याकरता उषाने स्वतःकरिता दोन नवे ड्रेस, एक स्लीपर आणि एक सॅंडल विकत घेतली. वेगवेगळ्या क्रीम्स आणि शाम्पू तर ती सतत आणतच राही. ठरल्याप्रमाणे ती सहलीला निघून गेली.

“रमा, दोन दिवस झाले तोंडाला अजिबात चव नाही. सुमितच्या डब्यासाठी तू उद्या आलूचा पराठा करणार आहेस ना मी पण खाईन एखादा.” सासूबाईंनी रमाला रात्रीच सांगून ठेवलं. रमानेही त्याकरिता होकार दिला.

दुसऱ्या दिवशी उषाचा मुलगा, सुमित आलूचा पराठा घेऊन शाळेत गेला. रमाने सासूबाईंना आलूचा पराठा दिला. तर मधल्या दिराच्या फर्माईशीनुसार उरलेल्या आलूच्या भाजीचे तिने आलू वडे केले. घरी ही ते आलू वडे सगळ्यांना आवडले.

दोन दिवसानंतर उषा सहलीहून परत आल्यानंतर, मधल्या दिराने रमाचं कौतुक केलं तर उषाच्या तळपायाच्या मस्तकात गेली.

“वहिनी, रमाने तुम्ही नसताना खूप छान आलू वडे केले बरं का! आम्ही तर त्यादिवशी मस्त वडापाव खाल्ला.”

“उषा तुझ्यासारखीच रमाच्या हाताला चव आहे बरं.” सासुबाई अगदी सहज बोलून गेल्या.

“हो बरोबर आहे ना! आता तर तुम्हाला रमाच्याच हातचं खायला आवडेल. मी काय आता जुनी झाली ना! तसंही धाकटे भाऊजी, तुमचा लाडाचा लेक आणि त्याची बायको तुमची लाडाची सुनबाई! मी काय फक्त ओझ्याचा बैल!” उषाने घरी आल्या आल्या चिडचिड सुरू केली.

रमा मात्र या सगळ्या प्रकाराने अगदी भांबावून गेली होती. उषा असं का वागते आहे ते तिला अजिबात कळत नव्हतं.

नेहमी शांत असणाऱ्या उषाच्या नवऱ्याने मात्र त्यादिवशी उषाची चांगलीच कान उघडणी केली.

“घरी आल्या आल्या तुझं काय सुरू झालयं उषा हे? आईने आणि मधल्याने रमाचं थोडं कौतुक केलं तर तुझा एवढा जळफळाट का होत आहे? आणि तुला काय वाटतं तू आईशी आणि माझ्या मधल्या भावाशी कशी वागतेस ते मला माहिती नाही? की मी घरात जास्त लक्ष घालत नाही म्हणून घडणाऱ्या गोष्टी माझ्या ध्यानात येत नाहीत? तुला तुझ्या सगळ्या हौशी मौजी पूर्ण करायच्या असतात, कर! त्या पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे पण म्हणून तुला मी माझ्या भावाला आणि आईला बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. तुला कपडे घेण्याकरिता, मेकअपचे सामान घेण्याकरिता, पैसे खर्च झाले असे वाटत नाही , पण आईने जरा काही डॉक्टरकडे जायचा विषय काढला की तू लगेच कपाळावर आठ्या पाडतेस आणि नाकमुरडतेस. या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतात बरं का! तू घरात सगळ्यांच्या तोंडावर गोड गोड बोलतेस पण तुझ्या मनात काय आहे हे मी पुरेपूर ओळखून आहे. यानंतर जर तू असं डुप्लिकेट वागलीस ना तर याद राख! गाठ माझ्याशी आहे!! तु, माझ्या आई आणि भावाविषयी फोनवर कुणाकुणाला काय काय सांगतेस हे मला चांगल्याने माहिती आहे. आता तू या घरातली केवळ मोठी सून नसून मोठी जाऊ पण आहेस. त्यामुळे फक्त तुझच कौतुक होईल आणि सगळीकडे तुलाच मान मिळेल हा आप्पलपोटा भाव मनातून काढून टाक. रमाला लहान बहीण म्हणून तिच्याशी आधी जशी मिळून मिसळून राहत होती तशीच रहा.” उषाच्या नवऱ्याने तिला चांगल्याच कडक शब्दात समज दिली.

उषा दात ओठ खात स्वतःच्या खोलीत निघून गेली. पण आता तिला तिच्या नवऱ्याची चांगलीच जरब बसली होती.

*******************

बरेचदा दोन-तीन भावांच्या एकत्र कुटुंबात या गोष्टी घडत असतात. घरातील एखादी व्यक्ती सगळ्यांशी तोंडावर गोड गोड बोलत असते पण माघारी मात्र तिच्या मनात सगळ्यांविषयी खूप राग असतो. पण म्हणतात ना सत्य कधी ना कधी उजेडात येतं.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →