व्यासांच्या मानसकन्या भाग तेवीस
याज्ञसेनी द्रौपदी.
तोरण स्फटिका या द्युतगृहात युधिष्ठिर आणि इतर पांडव अधोवदन बसले होते. द्युतामध्ये धर्मराज स्वतःसह आपल्या भावांना हरले होते. गोधन, राज्य, संपत्ती आधीच त्यांनी द्युतपटावर लावली होती. शकुनीच्या चिथावणीवर अखेरचा डाव म्हणून,युधिष्ठिराने पांचालीला पणाला लावलं आणि सर्वस्व गमावून बसला.
या घाणेरड्या विजयाने उन्मत झालेल्या दुर्योधनाने प्रतीकमीला आज्ञा दिली.
दुर्योधन -"प्रतीकामी अंतःपुरात जा आणि आमची दासी द्रोपदीला आमच्या सेवेसाठी घेऊन ये".
प्रतिकामी एकटाच परतल्याचे पाहून चिडून दुर्योधनाने विचारलं-
दुर्योधन-"प्रतिकाम्या कुठे आहे आमची दासी?
प्रतिकामी-"युवराज, महाराणी द्रोपदी राज्यसभेत येऊ शकत नाहीत".
दुर्योधन-"येऊ शकत नाही म्हणजे काय? ती आता महाराणी नाही".
प्रतिकामी-"युवराज द्रौपदी एक वस्त्रा रज:स्वला आहेत. नुकतेच ऋतुस्नात होऊन त्या आपल्या केसांना उदवून केशरचना करीत आहेत.”
प्रतिकामी (युधिष्ठिराकडे वळून)-"महाराज युधिष्ठिर द्रौपदीने आपल्याला एक प्रश्न विचारला आहे!”
दुर्योधन (रागाने)-"कुठला प्रश्न?"
प्रतिकामी-" महाराज युधिष्ठिर तुम्ही द्रौपदीला द्युतात स्वतः हरल्यावर पणाला लावले की आधी? "
युधिष्ठिर- "प्रतिकर्मा पांचालीला सांग, आता ही वेळ प्रश्न उत्तराची नाही. तू एक वस्त्रा रज:स्वला असलीस तरी राज्यसभेत तीला यावच लागेल."
युधिष्ठिराचे बोल ऐकून प्रतीकर्माचे डोळे विस्फारले, श्वास रोधला गेला. समस्त राजसभा श्वास रोखून स्तब्ध झाली, परंतु द्युताची धुंदी चढलेल्या दुर्योधनाने, दु:शासनाला आज्ञा दिली-
दुर्योधन -"दु:शासना जा त्या रूपगर्विता अहंकारी द्रौपदीला केसांना धरून फरपटत या राजसभेत घेऊन ये. "
दु:शासनाने खरेच ऋतुस्नात द्रौपदीच्या केसांना धरून तिला फरफटत राज्यसभेत आणले. आपल्या हाताची नाजूक बोटं तिने राज्यसभेच्या द्वाराच्या छिद्रात रुतवली, पायाच्या टाचा महाद्वाराच्या उंबरठ्याला अडकवल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. दृष्ट दु:शासन तिच्या केसांना हिसडे देत तिला राज्यसभेत घेऊन आला. द्रौपदीची ही विकल,असाहय अवस्था बघून भीम मात्र गरजला……
दु:शासनाने खरेच ऋतुस्नात द्रौपदीच्या केसांना धरून तिला फरफटत राज्यसभेत आणले. आपल्या हाताची नाजूक बोटं तिने राज्यसभेच्या द्वाराच्या छिद्रात रुतवली, पायाच्या टाचा महाद्वाराच्या उंबरठ्याला अडकवल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. दृष्ट दु:शासन तिच्या केसांना हिसडे देत तिला राज्यसभेत घेऊन आला. द्रौपदीची ही विकल,असाहय अवस्था बघून भीम मात्र गरजला……
भीम-"दु:शासना द्रोपदीचे केस तु ज्या घाणेरड्या हाताने धरलेस, ते हात मी तुझ्या धडावेगळे केल्याशिवाय राहणार नाही."
परंतु युधिष्ठिराच्या तिरप्या नेत्रकटाक्षा बरोबर भीम खाली बसला. युधिष्ठिराचे हे वागणे पाहून द्रौपदी भानावर आली, तिने निश्चयपूर्वक आपली मान वर केली,एका हाताने केस सावरीत,दुसऱ्या हाताने अपुऱ्या वस्त्रातील लज्जा झाकण्याचा प्रयत्न करीत ती उभी राहिली. आपल्या पतींची दीनवाणी अवस्था बघून ती संतापाने उसळली. रक्तलांछित अर्धवस्त्र अवस्थेत ती भिष्माचार्याकडे वळली.
द्रौपदी-"पितामह तुम्ही तरी मला न्याय द्या! सर्व हरल्यानंतर, स्वतःला पणाला लावून जो स्वत:च दास बनला आहे, त्याला पत्नीला पणाला लावण्याचा काय अधिकार?पितामह आता तुम्हीच सांगा मी हरले काय?”
पितामह- "हे सुभगे आता माझ्याकडे हो किंवा नाही चा प्रश्नच उरत नाही. तुझ्या पतीनं राज्यसभेत कबुल केलं आहे की, तुझ्या समवेत त्याचे चार बंधू आणि तो कौरवांचा दास आहे."
पितामहांच्या या वागण्याने आणि बोलल्याने द्रौपदी मटकन खाली बसली. विजयाच्या धुंदीत विवेक विसरलेला दुर्योधन दु:शासनाला म्हणाला…….
दुर्योधन-"दु:शासना माझ्या या दासीला माझ्या मांडीवर बसव. (त्याने स्वतःची मांडी उघडी केली.)
रागाने संतप्त भिमाने त्याच क्षणी आणखी प्रतिज्ञा केली……
भीम -"ज्या दू:शासनाने द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला, त्याचं वक्षस्थळ नखाग्रांनी फोडून मी त्याचं रक्त प्राशन करीन अन, उन्मत्तपणे भरसभेत उघडी मांडी दाखविणाऱ्या दुर्योधनाची मांडी माझ्या गदेने छिन्नविछिन्न करून टाकीन. "
दुर्योधन-"सेवकांनो पाहता काय? माझ्या राज्यसभेत माझेच दास मला मारण्याच्या प्रतिज्ञा करीत आहेत. त्यांची राजवस्त्र आणि आभूषण काढून घ्या".
युधिष्ठिराने राजवस्त्रे काढली त्याचे अनुकरण इतर पांडवांनी केले. पतिची ती केविलवाणी अवस्था पाहून द्रौपदीने आपले मुख झाकून,डोळ्यांवर हात ठेवले.
त्याच क्षणी कर्ण गरजला…..
कर्ण - "दु:शासना सांग त्या याज्ञसेनीला दासांना उत्तरीयाचा अधिकार नसतो.”
कर्ण - "दु:शासना सांग त्या याज्ञसेनीला दासांना उत्तरीयाचा अधिकार नसतो.”
“मी दासी नाही मी उत्तरीय काढणार नाही.” यज्ञवेधीतल्या लखलखत्या ज्वालेसारखे द्रौपदीचे रूप दिसत होते.
दुर्योधनाला अधिकच चेव चढला “या माझ्या दासीचे पांचालीचे उत्तरीय खेच! राजहंसी कशी असते ते आज सुतपुत्राला बघायचं आहे. सामान्य स्त्री पेक्षा राजस्त्री केवढी वेगळी असते ते मला आज जाणून घ्यायचं आहे".
दुर्योधनाच्या या वाक्यासरशी सारेच भान हरपले! दु:शासनाने पुढे टाकलेले पाऊल पाहताच द्रौपदी भयाने व्याकुळ होऊन मागे सरकली, आणि संतापाने थरथरणारे भीष्म गरजले………
पितामह-"थांब दु:शासना पुढे पाऊल टाकू नकोस, जोवर हा भीष्म इथे उभा आहे तोवर अबलेला विवस्त्र करण्याचं धाडस कोणीही करू नये. दु:शासना मागे फिर ही माझी आज्ञा आहे."
त्याच क्षणी दु:शासन थांबला आणि दुर्योधन गरजला…
दुर्योधन-"पितामह तुम्ही या राज्याचे राजे नाही, केवळ रक्षक आणि सेवक आहात. नको त्या आज्ञा देऊ नका!"
दुर्योधनाच्या या वाक्याने पितामह सुन्न झाले. त्यांचा आवेश ढासळला, सर्वांगाला कंप सुटला, दुर्योधनाने मर्माघात केला होता. पितामह राज्यसभा सोडून जाऊ लागले…
विकर्णाने द्रोपदीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला पण दुर्योधन आणि इतरांनी त्याला गप्प केले.
दुर्योधनाने दु:शासनाला संकेत केला, तो द्रौपदीकडे वळला. द्रौपदीने आपले अंकुश आणि वस्त्राचा पदर पकडून संपूर्ण राज्यसभेत प्रत्येकाकडे मदतीची याचना केली पण, त्या कुरुंच्या सभेत एका अबलेचं शील रक्षणाचं सामर्थ्य कुणाकडेच नव्हतं.
अखेरीस पांचाली ध्रुतराष्ट्र महाराजांच्या सिंहासनाच्या पायऱ्यांवर डोक आपटू लागली तिचा आक्रोश,किंचाळ्यानी राज्यसभा थिजून गेली. ती याज्ञसेनी एवढेच बोलली…..
द्रौपदी -"जिच्यात वृद्ध नाहीत ती सभा नव्हे, जे धर्म सांगत नाही ते वृद्ध नाहीत, ज्यांच्यात सत्य नाही तो धर्म नव्हे आणि ज्याच्यात कपट दुष्टावा आहे ते सत्य नव्हे. "
दु:शासनाने द्रौपदीच्या पदराला हात घातला आणि त्या पतिव्रतेने स्वतःचे सजल नेत्र बंद केले. रागाने थरथरणारी तेजाची ती ज्योत आता सर्व जाळून भस्म करेल असंच वाटत होतं. तेवढ्यात कुंतीच्या आधाराने गांधारी त्या सभेत आली. तिने धृतराष्ट्राची चांगलीच कान उघडणी केली.
“आज कुरूंच्या या सभेत कुलवधू पांचालीला ऋतुमती असताना माझ्याच धाकट्या मुलाने अपमानाने खेचत आणलं, सम्राट धृतराष्ट्र, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महामंत्री विदुर असताना कुलवधूचा हा अपमान का सहन केला गेला? एका स्त्रीचे दुःख दुसरी स्त्री जाणू शकते म्हणून मला माझ्या भावनातून आज या अन्यायकारक सभेत यावं लागलं. कुलवधूचा अपमान म्हणजे पृथ्वीचा अपमान, धरणीचा अपमान, मातेचा अपमान, महाराज धृतराष्ट्र तुमची पत्नी म्हणून नव्हे तर या हस्तीनापुर ची एक सामान्य नारी आणि नागरिक म्हणून मी तुम्हाला न्याय मागते माझ्या सुनेच्या अपमान करणाऱ्यांना कुठला दंड द्याल तुम्ही? की मी आता या पापासाठी देहांत शासन घेऊ?"
त्यावेळी धृतराष्ट्राचा सद् सद् विवेक जागृत झाला आणि त्याने द्रौपदीला तीन वर मागण्याची विनंती केली.
“द्रोपदी तुझ्या रूपात आज कुरुवंशाचा स्वाभिमान घायाळ होता होता राहिला. जे झालं ते विसरून जा. मोठे सासरे म्हणून नव्हे तर वडील म्हणून मी तुला माझ्याकडून तीन वर देतो तुला जे असेल ते मागून घे.”
पहिल्या वरात तिने धर्माला धास्यातून मुक्त केले. दुसऱ्या वराने तिने इतर चौघांना मुक्त केले. “माझे नवरे शस्त्रास्त्रांसह मुक्त झाले एवढेच मला पुरेसे आहे. असे म्हणून तिने तिसरा वर मागितलाच नाही.
वर मागण्याची तिची पद्धत. अभिषिक्त राजा म्हणून धर्माला अधिमुक्त करण्याची तिची तत्परता. बाकीच्यांना शस्त्रांसह मुक्त करणे एवढेच मागून बाकी कशाचाही लोभ न धरणे यांनी तिने आपलाच नव्हे तर पांडवांनाही अप्रतिष्ठेतून बाहेर काढले.
या प्रसंगाला उद्देशून करण जे म्हणाला ते लक्षात घेण्यासारखे आहे.
“पांचानाम् पांडूपुत्रानाम् नौवरेषा द्रौपदी भवेत.”
खोल समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या, अप्रतिष्ठेमध्ये बुडून गेलेल्या पांडवांना पांचालीने एखाद्या नावेप्रमाणे तीराला आणून पोहोचविले.
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
***************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा