व्यासांच्या मानसकन्या भाग एकोणीस
सुकुमार माद्री
सुकुमार माद्री
हिमालयाच्या पायथ्याशी असलेला बर्फाच्छादित मद्र देशाच्या राजाची लाडकी लेक मी माद्री! माझे वडील शूर क्षत्रिय राजे. जसं युद्ध कलेचे शिक्षण त्यांनी माझ्या थोरल्या भावाला शैल्याला दिलं तेच शिक्षण मीही घेतलं. मला युद्ध कलेपेक्षा सारथ्यकलेत जास्त आवडही होती आणि गतीही.
विविध अश्वांच्या रथाला वेगाने दौडवणे, रथपरीक्षा करणे, कुठल्या प्रवासाकरिता कुठला अश्व योग्य राहील या सर्व बाबींचे शिक्षण मला मिळालं. रथविद्येत निपुण असलेली मी सौंदर्यात तसुभरही कमी नव्हते! त्यामुळेच एखाद्या उच्च राजघराण्यात माझा विवाह व्हावा अशी माझ्या भावाची मनापासून इच्छा होती. हस्तीनापुर नरेश, सम्राट पांडूने दिग्विजय करिता जेव्हा आमच्या राज्यावर आक्रमण केले तेव्हा युद्धापूर्वीच माझ्या वडिलांच्या सल्ल्याने माझ्या भावाने त्यांचं मांडलिकत्व पत्करलं.
आमच्या प्रदेशात मिळणारं पुष्कळ पशुधन आणि मला, त्याच्या रथाचं सारथ्य करण्यास सांगून त्याने युद्धभूमीवर पांडूची भेट घेतली. शैल्याच्या रथाचं सारथ्य एक स्त्री करते आहे हे बघून सम्राटाला फारच आश्चर्य वाटलं. आणि माझं सौंदर्य बघून तो माझ्यावर मोहित झाला हेही वेगळं सांगायला नको.
राजाने पशुधन स्वीकारलं त्याचवेळी, माझ्या भावाने शैल्याने माझी ओळख सम्राटाला करून दिली.
“हे आर्य, ही माझी धाकटी बहीण माद्री, ही रथविद्येत निपुण असून तिला अश्वपरिक्षेत विशेष गती आहे. माझी आणि माझ्या वडिलांची इच्छा आहे की तुम्ही हीचं पाणिग्रहण करावं.”
राजा माझ्या अनुपम सौंदर्यावर पुरता भाळला होता. पडत्या फळाची आज्ञा मानून त्याने माझ्याशी विवाह करण्यास लगेच होकार दिला.
“हे नृप श्रेष्ठा! तू माझ्या बहिणीचा मोठ्या मनाने स्वीकार केलास याबद्दल मी तुझा ऋणी आहे, पण आमच्या या डोंगराळ प्रदेशात मुलींना आहेर न देता तिच्या सासर कडची मंडळीच तिच्या माहेरच्यांना भेटवस्तू देतात.” शैल्यानं आमच्या प्रदेशातील रीत राजाला सांगितली.
सम्राट पांडूने नकार देणे शक्यच नव्हते. त्याने लगेच हस्तीनापुरी दूत पाठवून भीष्मांची अनुज्ञा मागितली आणि हस्तीनापुरहून पुष्कळ द्रव्य, सुवर्ण, रत्नजडित आभूषणे, तलम रेशमी वस्त्र, गोधन आणि पशुधन सारं माझ्या वडिलांना देऊन राजाने माझं पाणिग्रहण केलं आणि आमचा विवाह संपन्न झाला.
मी सुकुमार होते, लावण्यवती होते पण युद्धाच्या वेळी आवश्यक असणाऱ्या रथविद्येत निपुण होते हे मात्र माझ्या विवाहाच्या वेळी माझे वडील आणि माझा भाऊ साफ विसरले. कुरु वंशाच्या मोठ्या नावाला भुलुन त्यांनी आधीच विवाहित असणाऱ्या पांडूच्या पदरी मला बांधले.
“मोठ्या राजघराण्यातल्या कर्तुत्ववान राजाला अनेक राण्या असतात. त्याचा वंश वाढवण्यासाठी तो हे सारं करत असतो.” पांडूसह विवाहाला मी मनापासून तयार नाही हे कदाचित माझ्या भावाने ताडलं होतं. म्हणूनच तो मला असं काहीतरी गुळमुळीत सांगून माझी भलावण करत होता.
एक रूपसुंदर, नवयौवना स्त्री स्वतःच्या वैवाहिक आयुष्याची जी काही सुंदर स्वप्ने रंगवीत असते, ती माझी त्याच क्षणी जळून राख झाली होती. एवढा दिग्विजय करणारा कुरुवंशातला सम्राट पांडू, प्रकृतीने मात्र मला फारच किरकोळ वाटला. त्याच्या बाहूंमध्ये युद्ध जिंकण्याचं बळ होतं पण चेहरा मात्र अगदीच निस्तेज. एक स्त्री असून मला जे दिसलं ते माझ्या बापाला आणि भावाला का जाणवलं नाही हाच प्रश्न माझं मन पोखरत होता.
वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला प्रमाण मानून मी पांडूची अर्धांगिनी होऊन हस्तीनापुरात आले. राजरस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी सम्राटाचा उच्च रवाने जयजयकार करीत होती. मुख्य प्रवेशद्वारावर सुवासिनींनी मंगल तिलक करून आमचं नगरीत स्वागत केलं पण माझी नजर शोधत होती ती राजाच्या पट्टराणीला माझ्या सवतीला-कुंतीला.
राजप्रसादाच्या मुख्य द्वारावर राजघराण्यातल्या इतर स्त्रियांसमवेत ती मला सामोरी आली. पांडूकडे तिची बघणारी नजर मला आत पर्यंत चीरत गेली. माझे औक्षण करून, रत्नजडित सुवर्ण कंठा तिने मला दिला आणि माझं राजप्रसादात स्वागत केलं. या सगळ्या गोष्टी ती केवळ औपचारिकता म्हणून करत होती हे माझ्या नजरेतून सुटलं नाही. इतर राजस्त्रीया जेव्हा सामोरे आल्या तेव्हा ती पटकन तिच्या प्रसादात निघून गेली. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनात अपराध भाव निर्माण झाला. कुरू साम्राज्याची राणी म्हणून स्वतः दिमाखात त्या प्रासादात प्रवेश करायचा की कुंतीचा हक्क हिरावला म्हणून मनात खंत घेऊन आयुष्यभर जगायचं हा निर्णय सर्वस्वी माझा होता. स्वागताच्या वेळी कुंती मागच्या पावलांनी तिच्या प्रसादात निघून गेली, हे राजाच्या नजरेतून सुटले नाही आणि त्याने लगेच माझ्यासाठी वेगळा महाल बांधला. राजाच्या या कृतीने मी खरोखरच मोहरून गेले. त्यानंतर पूर्णवेळ राजा माझ्याजवळ होता. मीही मला माहिती असलेल्या आमच्या प्रदेशातल्या अनेक प्रणयक्रीडांनी त्याला फुलवण्याचा, खुलवण्याचा प्रयत्न केला. पण मुळात राजाचं पुरुष बलच अपुरं होतं. त्याला मीही काही करू शकत नव्हते.
दीड दोन मासा नंतर राजा आणि कुंतीने वनात जाण्याचा निर्णय घेतला. मी एका क्षत्रिय राजाची राजकन्या, कुरु साम्राज्याच्या सम्राटाची राणी, माझं राजप्रसादातलं वैवाहिक आयुष्य मात्र दोन महिन्यांचं! खरंच का सौंदर्य नेहमी शापित असतं, की राजाच्या पट्टराणीचा हक्क मी हिरावला म्हणून हे माझं कर्मफळ होतं? हे कर्म तरी माझं कुठे होतं? बापाच्या आणि भावाच्या राजकीय महत्त्वकांक्षांच्या पटावरचं केवळ मी एक प्यादं ठरली होती.
राजाने स्वकर्तृत्वाने जी ला स्वयंवरातून जिंकून आणलं होतं, सासरी येताना जी ने बैलगाड्या भरभरून सुवर्ण, अश्व, गज, गोधन, पशुधन, रत्नजडित सुवर्ण अलंकार, द्रव्य आणि अगणित दासदासी सोबत आणल्या होत्या, त्या कुंतीने सम्राटासह जाण्याचा निर्णय घेतल्यावर, मी त्या राजप्रसादात राहण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नाही म्हटले तरीही मी राजाची परिक्रिया पत्नी होते.
राजाने ही थोरलीकडून माझ्याकरिता वानप्रस्थाची संमती मिळवली. ज्या राजरस्त्यावरून अल्पकाळापूर्वी मी मोठ्या थाटामाटात कुरु साम्राज्यात आले होते त्याच राजमार्गावरून मी, सम्राट आणि कुंती आज अनवाणी वानप्रस्थाला निघालो होतो. नगरजन ‘लवकर परत या, आम्ही वाट पाहतो आहोत’ अशा विनवण्या करीत होते.
हिमावत पर्वताच्या पायथ्याशी आल्यानंतर ऋषी आणि तपसव्यांच्या सानिध्यात राजाचं अस्वस्थ मन जरा शांत झाल्यासारखं मला वाटलं. एकदा राजा आणि थोरली काहीतरी वार्तालाप करत होते.
“कुंती, कुरु साम्राज्याला वारस हवा. ज्येष्ठ बंधू धृतराष्ट्राला मुलगा होण्यापूर्वी जर आपल्याला पुत्र झाला तर तोच कुरु साम्राज्याचा उत्तराधिकारी होईल.”
“आर्यपुत्र, तुमचं म्हणणं मला रुचते आहे पण कालच ऋषींनी तुमची नाडी बघून सांगितलं आहे की तुमचं वीर्यबल पाहिजे तेवढं अजूनही सक्षम झालं नाही. त्यामुळे काही वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.”
“मी असा ऐकलं आहे की तुझ्याकडे देवाहूती नावाचा अभिचार मंत्र आहे. त्या मंत्राचा वापर करून, ज्याप्रमाणे माझा आणि ज्येष्ठ बंधू धृतराष्ट्राचा जन्म झाला त्याचप्रमाणे तू ही मला पितृत्वाचे दान दे. बीज क्षेत्र न्यायाने ते मुल माझंच म्हटलं जाईल.”
राजाला स्वतःच्या मुलाची घाई झाली होती. कुंतीही त्याच्या शब्दाबाहेर नव्हती. तिने तिला मिळालेल्या अभिचार मंत्राचा वापर करून आधी धर्म, मग भीम आणि अर्जुनाच पितृत्व सम्राटाला दिलं.
त्या उजाड ओसाड माळरानावर आमच्या कुटी बाहेर तीन मुलं बागडत होती. असूया म्हणून नव्हे, पण स्त्री सुलभ मातृत्व आता मलाही हवहवसं होतं. मलाही वाटत होतं की माझ्या उदरातून मला माता म्हणणार, मला सहस्त्र हाताने स्पर्श करणार माझं बाळ हवं. त्याबद्दल मी सम्राटाला विनंती केली. मला वाटलं कदाचित सम्राट त्या करीता होकार देणार नाही. विवाह नंतर सम्राटाने माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नव्हता ती आठवण माझ्या मनात ताजी होती. पण राजाने चटकन संमती दिली. त्याच्या म्हणण्यावरूनच कुंतीने तिचा अभिचार मंत्र मला दिला.
सुंदर असूनही, सक्षम असूनही, कुरु साम्राज्याचा सम्राट माझ्यावर भाळलेला असूनही, मला मातृत्वाचे दान मिळालं ते कुंतीच्या उपकारानं!
आमच्या मुलांच्या बाल लीला बघण्यात आणि त्यांचं करण्यात माझा आणि कुंतीचा अख्खा दिवस सरून जाई. नैसर्गिक स्वच्छ वातावरणात, ऋषींच्या आयुर्वेदिक वनौषधींनी सम्राटांची चर्या आता पूर्वीपेक्षा फारच सतेज दिसत होती.
एकदा भल्या सकाळी पिण्याचे पाणी भरण्याकरिता मी ओढ्यावर गेले होते. स्नान करून पाण्याचा घडा घेऊन मी कुटीकडे परतत होते. पूर्वेकडून उगवणारे लालबुंद सूर्यबिंब आणि माझ्या पुढ्यात अवचित आलेले सम्राट! मी एकदम बावरले, घाबरले, कमरेवरचा घडा हिंदकळला थोडे जल माझ्या कपड्यांवर सांडले आणि घडा हातातून निसटून फुटला.
मी सम्राटांना विनवले, निकराचा प्रतिकारही केला पण सारे व्यर्थ! त्यांचं स्वतःच्या भावनांवर आणि कृतीवर नियंत्रण नव्हते आणि तेव्हाच घात झाला. माझ्याशी संग करण्याच्या नादात सम्राट गतप्राण झाले. मी घाबरले, रडले, ओरडले माझा आक्रोश ऐकून कुंती तिथे आली आणि मला नको नको ते बोलली.
“धन्य आहेस बाल्हीकी! माझ्यापेक्षा कितीतरी पटीने धन्य आहेस! समागमाचा आनंद ज्या तोंडावर ओसांडून वाहत आहे असं नवऱ्याचं सुख तुला मिळालं!” जणू त्याक्षणी कुंतीचा जळफळाट झाला होता. मी राजाला निकराचा प्रतिकार केला, हे ती समजूनच घेत नव्हती. माझ्यामुळे तिला वैधव्य आलं होतं, माझ्यामुळे आमची मुलं अनाथ पोरकी झाली होती, तिच्याच दिलेला अभिचार मंत्राने मला मुलं झाली होती, ती त्यांचा योग्य सांभाळ करेल असा विश्वास वाटल्यानेच मी राजासह सहगमन केले. त्यावेळी माझ्या कानावर कुंतीचे शब्द माझ्या कानी आले ‘रती, मती, गती साऱ्यातच तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरलीस माद्री!”
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
********************************
