बाळंतवेड.. -1
"अगं ऊठ की ! बाळ केव्हाचं रडतंय पाळण्यात आणि तू खिडकीत उभी ? आई आहेस ना तू त्याची ? की आम्हीच सांभाळायचं सगळं या वयात ?"
इंदुमतीबाईंनी पाळण्यातल्या नातवाला उचलून कडेवर घेतलं आणि सुनेकडे बघितलं. अमृता खिडकीपाशी तशीच उभी होती. बाहेर बघत. जणू तिला आवाजच ऐकू आला नव्हता.
बाळ दोन महिन्यांचं होतं. पहिलटकरणीचं बाळंतपण, सगळं सुखरूप पार पडलं होतं. मुलगा झाला म्हणून पेढे वाटून झाले होते. आणि तरी या घरात काहीतरी बिनसत चाललं होतं, आणि ते काय हे कुणालाच सांगता येत नव्हतं.
अमृता बदलली होती. गरोदरपणात बाळाच्या कपड्यांचे रंग ठरवणारी, पाळण्याच्या डिझाईनवरून नवऱ्याशी लुटुपुटूचं भांडणारी अमृता, बाळ झाल्यापासून विझत गेली होती. बाळ रडलं की ती उठायची, पण यंत्रासारखी. दूध पाजायची, पण नजर भिंतीकडे. कुणी बाळाचं कौतुक केलं की ओठांवर हसू आणायची, पण ते हसू डोळ्यांपर्यंत पोचायचं नाही.
रात्री केदारला जाग यायची तेव्हा ती जागीच असायची, छताकडे बघत. "झोप ना," म्हटलं की "येत नाहीये" एवढंच उत्तर.
घराने याचे अर्थ आपापल्या परीने लावले.
"आळस. दुसरं काय ?" इंदुमतीबाईंचं निदान ठरलेलं होतं.
"हल्लीच्या मुलींना बाळंतपण म्हणजे सुट्टी वाटते. आमच्या वेळी बारा दिवसांत चुलीपुढे उभ्या राहायचो आम्ही."
"माहेरची आठवण येत असेल," केदारच्या मावशीने तर्क दिला.
"पण तिकडे तरी कशी पाठवणार ? हिच्या वडिलांचं आजारपण चालू, आई त्यातच अडकलेली."
"बाळाकडे बघत नाही नीट," ही तक्रार मात्र वाढत चालली होती. परवा बाळाला ताप आला तेव्हा रात्रभर इंदुमतीबाईच जाग्या होत्या. अमृता उठली, बसली, आणि परत जाऊन झोपली.
"दगडाची आहे का ही ?" सासूबाई सकाळी केदारजवळ फुटल्या. "पोटचा गोळा तापाने फणफणतोय आणि हिला झोप?"
अमृताच्या माहेरचा रोज फोन यायचा. आई विचारायची, "बाळ काय करतंय ? तू जेवतेयस ना नीट ?" आणि अमृता "हो आई, सगळं छान" म्हणून फोन ठेवायची. वडिलांच्या आजारपणात अडकलेल्या आईला अजून एक काळजी द्यायची नाही, एवढंच तिला कळत होतं. फोन ठेवला की ती बराच वेळ मोबाईलकडे बघत बसायची. "सगळं छान" हे खोटं रोज बोलावं लागतं, तेव्हा ते किती जड होत जातं, हे तिचं तिलाच माहीत.
केदार दोन्ही बाजूंनी पिचत होता. बायकोला विचारावं तर "काही नाही, बरी आहे मी" पलीकडे उत्तर नाही. आईला समजवावं तर "तूच बायकोचा बैल झालायस" हे ऐकून घ्यावं लागायचं.
एकदा त्याने अमृताला थेट विचारलं होतं, "तुला बाळ आवडत नाही का ग ?" आणि अमृताने त्याच्याकडे अशा नजरेने बघितलं होतं की त्याला प्रश्न मागे घ्यावासा वाटला होता. त्या नजरेत राग नव्हता. भीती होती.
एका रात्री त्याने आईला विचारलंही, "आई, अमृताला डॉक्टरांकडे नेऊ का ? बरं वाटत नाहीये तिला." इंदुमतीबाई भाजी चिरता चिरता म्हणाल्या, "कसलं डॉक्टर ? अंगात आळस भरलाय, त्याला औषध नसतं. चार कामं अंगावर पडली की आपोआप ताळ्यावर येईल." केदार गप्प बसला.
आईचा अनुभव मोठा, आपल्याला काय कळतं, म्हणून त्यानेही स्वतःची शंका गिळली.
बारशाच्या दिवशी कहर झाला. घरभर पाहुणे, बाळाचं नाव ठेवलं गेलं, "अथर्व". बायका आळीपाळीने बाळाला घेत होत्या, "अगदी आईच्या वळणावर गेलाय हो" म्हणत होत्या. आणि विधीच्या ऐन वेळी अमृता उठून आतल्या खोलीत निघून गेली. दहा मिनिटं झाली, परत आली नाही. इंदुमतीबाई तणतणत आत गेल्या तर सून बाथरूमच्या दाराशी उभी, चेहरा पांढराफटक, अंग थरथरतंय.
"अगं काय नाटक चाललंय तुझं ? बाहेर पन्नास माणसं.."
"चक्कर आली जरा. आले मी," म्हणून अमृता चेहऱ्यावर पाणी मारून बाहेर आली आणि हसरा मुखवटा चढवून फोटोत उभी राहिली. फोटोत सगळे हसत होते. फोटो काढणाऱ्या स्टुडिओवाल्याला काय माहीत, की एका हसण्याखाली त्या दिवशी काय दडलं होतं.
आणि त्या रात्री, साडेतीन वाजता, केदारला अचानक जाग आली.
शेजारची जागा रिकामी होती. पाळण्यात अथर्व कुरकुरत होता. आणि गॅलरीचं दार उघडं होतं.
शेजारची जागा रिकामी होती. पाळण्यात अथर्व कुरकुरत होता. आणि गॅलरीचं दार उघडं होतं.
केदार ताडकन उठला. गॅलरीत अमृता कठड्यापाशी उभी होती. थंड वाऱ्यात, नुसत्या गाऊनवर, केस मोकळे. तो धावत गेला.
"अमृता ! अगं काय करतेयस इथे ? थंडी बघ किती.."
ती वळली. रडत नव्हती. आणि तेच भयंकर होतं. कोरड्या, थकलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितलं.
"केदार.. मला खरं सांगायचंय तुला. कुणाला सांगू नकोस, पण मला.." तिचा आवाज विझत गेला.
"केदार.. मला खरं सांगायचंय तुला. कुणाला सांगू नकोस, पण मला.." तिचा आवाज विझत गेला.
"मला अथर्वला बघितलं की काहीच वाटत नाही रे. काहीच. आतून सगळं बधिर झालंय. सगळे म्हणतात आई आई.. कसली आई मी ? जिला स्वतःच्या बाळाचं रडणं ऐकून पान्हा फुटत नाही, तळमळ होत नाही, ती आई ?" तिने त्याचा हात घट्ट धरला. "केदार, मी वाईट आई आहे ना रे ? खरं सांग.. मी वाईट आहे ना ?"
