मागील भागात आपण पाहिलं कि, आदित्यच्या बदललेल्या स्वभावामुळे सायली खूप अस्वस्थ झाली होती. नातं वाचवण्यासाठी तिने स्वतःमध्ये अनेक बदल केले, पण आदित्यच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्याच्या बदलामागचं कारण शोधण्यासाठी ती त्याच्या कॉलेजमध्येही गेली. मात्र तिथे आदित्य सहकाऱ्यांसोबत अगदी आनंदात आणि निवांत असल्याचं तिला दिसलं. त्यामुळे सायलीचा गोंधळ आणखी वाढला. नेमकं सत्य काय आहे, हे जाणून घेण्याचा तिने निर्धार केला...आता पाहूया पुढे,
रात्रीचे जवळपास दोन वाजले होते त्यात सायलीला अचानक जाग आली. तिने शेजारी हात फिरवला, पण तेव्हा आदित्य बेडवर नव्हता.
तशी ती दचकून उठून बसली. तिने बाहेर डोकावलं तर स्टडीरूममधून लॅपटॉपच्या स्क्रीनचा थोडाफार प्रकाश दिसत होता.
हळूच ती तिकडे गेली. एवढ्या रात्री कोण येईल म्हणून बेफिकीरपणे स्टडीरूमचं दार अर्धवट उघडं ठेवून आदित्य खुर्चीवर बसून लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये पूर्णपणे हरवला होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. कधी तो स्वतःशीच हसत होता, तर मध्येच भराभर टायपिंग करत होता.
सायली त्याच्या अगदी मागे जाऊन उभी राहिली. ती इतकी जवळ आली होती, तरीही आदित्यला तिची चाहूलही लागली नाही. तो एका डेटिंग अॅपवर एक नाही, तर तीन-चार वेगवेगळ्या मुलींशी चॅट करण्यात इतका गुंग झाला होता की त्याला आजूबाजूचं काहीच भान नव्हतं.
आपसूकच सायलीची नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळली.
एका प्रोफाइलच चाट ओपन होत आणि त्यावर लिहिलं होत,
"Hi Beautiful ❤️ मला तुझी स्माईल खूप आवडली आपण उद्या एका जवळच्या कॅफेमध्ये भेटायचं का?तुझ्याशी बोललं की सगळी टेन्शन निघून जात माझं...."
त्याने एवढा मेसेज सेंड केला आणि लगेच दुसऱ्या मुलीची चाट ओपन केली... तो एवढं सराईत करत होता कि सायलीला प्रश्न पडला.. बापरे हे कधीपासून चालू असेल ह्याच??
त्याच एका मुलीशी फ्लर्टिंग, दुसरीला भेटायचं ठरवणं, आणि तिसरीसोबत हसत-खेळत गप्पा चालू होत्या.
हे सगळं पाहून सायलीच्या पायाखालची जमीन सरकली.
तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळून गालावर आले.
तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळून गालावर आले.
"म्हणजे... इतके दिवस मी आपल्या नात्यासाठी झटत होते... आणि तू दुसऱ्याच मुलींमध्ये रमला होतास?"
ती मनातच चरफडली...पण एवढं होऊनही तिने एकही शब्द उच्चारला नाही.
डोळ्यांतले अश्रू पुसत ती शांतपणे स्टडीरूममधून बाहेर पडली. त्या रात्री ती उशी तोंडावर घेऊन कितीतरी वेळ रडत राहिली. पण आदित्यला याची देखील चाहूल लागली नाही.
सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणेच सायली लवकर उठली. तिने आदित्यसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता आणि डबा तयार केला. जणू रात्री काहीच घडलं नव्हतं, अशा रीतीने शांतपणे ती सगळं करत होती, आवरत होती पण मनात खूप सारे प्रश्न होते.
आदित्य तयार होऊन बाहेर आला,
"आज मला थोडं लवकर निघायचं आहे... आणि एका स्टुडन्ट्सच्या नोट्स द्यायच्या आहेत...,"
एवढंच बोलून त्याने नाश्ता केला आणि तो घराबाहेर पडला.
इकडे लगेचच सायलीने त्याच्या गाडीचा पाठलाग केला.
काही वेळातच आदित्य एका कॅफेसमोर थांबला. तस तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. काही मिनिटांतच एक मुलगी कॅफेत आली, व आदित्य तिच्यासमोर बसला. दोघे हसत बोलत होते.
सायलीने हे सगळ बाहेरून पाहिलं.तिच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले..पण तिने आरोहीचा हात घट्ट धरला आणि कॅफेमध्ये प्रवेश केला. आदित्य अजूनही त्या मुलीसोबत बोलण्यात इतका रमला होता की त्याला सायली आल्याचंही जाणवलं नाही.
