Login

दुरावलेलं प्रेम भाग दोन

सायलीला लग्नाआधीचे दिवस आठवतात.

मागिल भागात आपण पाहिले की आदित्य उगाचच सायलीवर चिडचिड करत होता आणि तिला त्या मागचं कारण समजत नव्हतं, आता पाहूया पुढे,

सायलीने हळूच आरोहीला कुशीत घेतलं. ती अजूनही घाबरलेली दिसत होती.

"आई... बाबा माझ्यावर रागावले का?आधी तर ते किती छान बोलायचे."

आरोहीने निरागसपणे विचारलं.

ते ऐकून सायलीच्या हृदयात कालवाकालव झाली. तिने आरोहीच्या कपाळावर हलकेचं आपले ओठ टेकवले

"नाही गं परी... बाबा फक्त कामामुळे थोडे टेन्शन मध्ये आहेत... म्हणून बाकी ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. तू जास्त विचार नको करुस."

असं म्हणून तिने तिला थोपटायला सुरुवातीला केली. आरोहीला झोपवल्यानंतर सायली बाल्कनीत आली. आदित्य अजूनही तिथेच उभा होता. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली.

सायलीने धीर एकवटत विचारलं,

"आदित्य... तुला काय झालंय आहे ? आधीसारखा राहिला नाहीस तू. प्रत्येक गोष्टीवर इतका चिडतोस का?"

आदित्यने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं,

" मी चिडतो कि तू किरकिर करत राहतेस? झेपत नसेल तर नको करू ना जॉब. "

एवढं बोलून तो आत निघून गेला.

सायली त्याला पाहत राहिली. तिच्या मनात सतत हेच येत होत कि,

"नेमकं असं काय घडलं आहे कि आमच्या नात्यात इतका दुरावा आला असावा ?खरंच... हा तोच आदित्य आहे का, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं होतं?"


नकळत तिचं मन काही वर्षं मागे गेलं...


तिच नवीन नवीन लग्न झालेलं होत त्यामुळे घरभर आनंदाचं वातावरण होतं. सायली स्वयंपाकघरात पहिल्यांदाच आदित्यसाठी चहा बनवत होती.सवय नसल्यामुळे तिच्या हाताला किंचित भाजलं आणि तिच्या तोंडून हलकीसा आवाज बाहेर पडला.

"आई ssss ग......."

हा एवढंसा आवाज ऐकताच आदित्य धावत स्वयंपाकघरात आला.

"काय झालं? हात भाजला का?जपून करत जा कामे "

त्याने काळजीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर फुंकर मारत म्हणाला.

त्यावर सायली हसत म्हणाली,

"अरे... काही नाही. थोडंसंच भाजलं... त्यात काय.."

पण आदित्यने तिचं काहीच ऐकलं नाही. तो लगेच फर्स्ट-एड बॉक्स घेऊन आला. आधी तिच्या हातावर किस केल आणि मग तिच्या हातावर मलम लावत म्हणाला,


"सायली, तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. तुला काही झालं की मला सहन होत नाही. हे माहित आहे ना तुला मग स्वतःला जप जरा.."

सायली त्याच्याकडे पाहतच राहिली.

"एवढी काळजी करतोस माझी?"

ती लाजत म्हणाली. तस आदित्य तिच्या डोळ्यांत पाहत हसला.

"कारण तू माझं जग आहेस. तुला हसताना पाहिलं की दिवस कसा छान जातो माझा आणि तुझ्या डोळ्यांत एक अश्रू आला तरी माझा जीव कासावीस होतो.. हे कायमच लक्षात ठेव...."

तस सायलीने हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

त्या क्षणी तिला वाटलं होतं...हे प्रेम आयुष्यभर असंच राहील.


आरोहीच्या चुळबुळी मुळे सायली भानावर आली. तिच्या डोळ्यांतून एक अश्रू अलगद गालावर ओघळला.

"कुठे हरवलं ते प्रेम, आदित्य...? की मीच तुला समजून घ्यायला कमी पडले?"

ती स्वतःशीच पुटपुटली.

बाल्कनीत बसून असलेला आदित्यही आपल्या लॅपटॉपवर busy होता.पण त्याच्या मनातही वेगळंच काहीतरी सुरू होतं.


क्रमश :-
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →