Login

दुरावलेलं प्रेम अंतिम भाग

सायली आदित्यला माफ करते

मागील भागात आपण पाहिलं कि सायलीने आदित्यला दुसऱ्या मुलीसोबत कॅफेमध्ये रंगेहात पकडलं. घरी आल्यानंतर तिने त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. आदित्यने आपली चूक मान्य करत, डेटिंग अॅपवर मुलींशी बोलत असल्याची कबुली दिली. सायलीने त्याला खूप ऐकवलं त्यावर त्याने सायलीची मनापासून माफी मागितली. आता सायलीसमोर सर्वात कठीण प्रश्न उभा होता, आदित्यला आणखी एक संधी द्यायची की कायमचं त्याच्यापासून दूर जायचं? आता पाहूया पुढे,

एक घोट चहाचा घेऊन म्हणाली...

"आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या डोक्यावरून वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं होत . त्यामुळे वडिलांची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही, ह्याची जाणीव व दुःख मला चांगलं माहीत आहे. म्हणूनच तुझी कितीही चूक असली, तरी मी आरोहीला तिच्या वडिलांपासून कधीच दूर करणार नाही."

आदित्यच्या डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबतच नव्हते.. त्याच्या चुकीची जाणीव त्याला झाले हे तिला चांगलंच समजलं होत.. तेवढं ओळखत होती ती त्याला...

ती अजूनच पुढे म्हणाली..,

"आता तूच विचार कर... उद्या तुझ्या कॉलेजमध्ये हे सगळं समजलं, तर काय होईल? तुझी नोकरी गेली तर या मुली तुझ्यासोबत उभ्या राहतील का? तुझ्या आजारपणात, अडचणीत, दुःखात त्या तुझी काळजी घेतील का?"

आता ती त्याच्या अगदी समोर उभी राहिली.

"ज्यांनी काही दिवसांच्या गोड बोलण्याने तुला भुरळ घातली, त्या आयुष्यभर साथ देतील, असा खरंच तुला विश्वास आहे?"

ह्यावर आदित्यकडे काहीच उत्तर नव्हतं, कदाचित एवढा पुढचा विचार त्याने केलंच नव्हता. हे पाहून सायलीने एक दीर्घ श्वास घेतला.

"भानावर ये, आदित्य. अजून वेळ गेलेली नाही. एका क्षणाच्या मोहासाठी तुझं कुटुंब, तुझी मुलगी, तुझे आई-वडील आणि तुझी वर्षानुवर्षे कमावलेली प्रतिष्ठा गमावू नकोस."

हे ऐकून आदित्यकडे उत्तर देण्यासाठी एकही शब्द उरला नव्हता. त्याने फक्त मान खाली घातली...


सायलीचं एक-एक वाक्य आदित्यच्या मनावर घाव घालत होतं. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग हळूहळू तिच्यासमोर येऊन म्हणाला,

"सायली... मी तुझा गुन्हेगार आहे. तू मला कोणतीही शिक्षा दिलीस तरी ती मला मान्य आहे. पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे... माझा पाय अजूनही तू समजतेस तेवढा घसरला नव्हता."

सायलीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं.

"म्हणजे?"

आदित्यने मान खाली घातली.

"म्हणजे हो... मी त्या मुलींशी बोलत होतो. त्यांच्या मेसेजची वाट पाहायचो, त्यांच्या सोबत हसायचो... पण त्या पैकी कुणाशीच कधीच शारीरिक जवळीक साधली नाही. माझ्या आयुष्यात तू आणि आरोही आहात, ही जाणीव माझ्या मनातून कधीच गेली नव्हती. पण माझा अहंकार, माझा मूर्खपणा... यामुळे मी चुकीच्या वाटेवर चालायला सुरुवात केली."

ते ऐकून सायलीचं मन क्षणभर हेलावलं, पण तिच्या विश्वासघात झाल्याची भावना मात्र कमी झाली नाही.

"आदित्य... विश्वासघात फक्त शरीराने होत नाही... मनानेही होतो. ज्या क्षणी तू दुसऱ्या मुलीकडून आनंद शोधायला लागलास, त्या क्षणी माझा नवरा माझ्यापासून दूर गेला होता."

ते ऐकून आदित्यच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

"मला माफ कर... रोज तुझा चेहरा पाहूनही मी तुझ्या डोळ्यांतलं दुःख पाहिलंच नाही.. एवढा मी त्यांच्यात गुरुफटलो होतो . एकीकडे तू नातं वाचवण्यासाठी झगडत होतीस... आणि मी ते मोडण्यात धन्यता मानत होतो."

एवढं बोलून तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला.

"प्लीज, एक शेवटची संधी दे. मी स्वतःला बदलून दाखवेन. माझ्या चुका माझ्या कृतीने सुधारून दाखवेन. मला माझी बायको आणि माझी मुलगी कधीच गमवायची नव्हती.. तेव्हाही आणि आताही ."

सायलीने डोळे मिटले. तिच्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य तरळून गेलं. त्यांचा प्रेमविवाह, पहिली भेट, लग्न, आरोहीचा जन्म... आणि आता हा विश्वासघात.

काही क्षणांनी ती शांतपणे म्हणाली,

"आदित्य... आज मी तुला माफ करत नाहीये... कारण इतक्या मोठ्या जखमा एका 'सॉरी'ने भरत नाहीत."

ते ऐकून आदित्यचं हृदय पुन्हा धडधडलं.त्याला खूपच जास्त पश्चाताप होत होता.

पण तो काही बोलणार तेवढ्यात सायली पुढे म्हणाली,

"पण मी तुला एक संधी देतेय... माझ्यासाठी नाही... आपल्या आरोहीसाठी. माझ्या डोक्यावर वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. त्या रिकाम्या जागेची वेदना मला आजही जाणवते. म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात तिचे बाबा असावेत, हे मी तिच्याकडून हिरावून घेणार नाही.. तेवढी स्वार्थी मी नाही.. आजपासून तू माझा विश्वास पुन्हा जिंकायला सुरुवात करशील. विश्वास काय असा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि जर पुन्हा एकदाही अशी चूक केलीस... तर त्या दिवशी मी मागे वळूनही पाहणार नाही तर बोलण्याची सुद्धा संधी न देता आहे त्या कपड्यांवर बाहेर काढेन.. मग नंतर तुझा आणि आमचा संबंध संपलेला असेल.. हे कायमच लक्षात ठेव..."

तिने त्याच्याकडे बोट दाखवत ठाम आवाजात म्हटलं,


त्यावर आदित्यने रडत तिचे हात आपल्या कपाळाला लावले.

"मी वचन देतो सायू तुला ... आपल्या आरुची शपथ यापुढे मी असा नवरा आणि बाप बनेन, कि ज्याचा तुला पुन्हा अभिमान वाटेल."

ते ऐकून सायलीने हात अलगद सोडवून घेतला.

"वचन नको, आदित्य... आता मला फक्त तुझ्यातला बदल पाहायचा आहे."

त्या क्षणी दोघेही रडत होते... पण त्यांच्या अश्रूंचा अर्थ वेगळा होता.

सायलीच्या डोळ्यांत तुटलेल्या विश्वासाची वेदना होती...
आणि आदित्यच्या डोळ्यांत स्वतःच्या चुकीचा पश्चात्ताप होता.

सायलीने आदित्यला एक संधी दिली खरी, पण त्यांच्या नात्यातील दुरावा एका दिवसात नाहीसा झाला नाही.

आदित्यने त्या दिवसापासून डेटिंग अॅप कायमचं डिलीट केलं. त्याने आपले सर्व सोशल मीडिया पासवर्ड सायलीला दिले. ऑफिसमधून थेट घरी यायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी तो पूर्ण वेळ आरोहीसोबत घालवू लागला.

सायली मात्र आधीसारखी सहज त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती. ती त्याच्याशी नीट बोलायची, पण तिच्या मनातली भीती अजूनही कायम होती.

एके दिवशी आदित्यने सायलीला त्यांच्या पहिल्या भेटीच्या ठिकाणी नेलं.

त्याने शांतपणे तिचा हात हातात घेतला.

"सायली... त्या दिवशी मी तुझा विश्वास तोडला होता. आज मला समजलं आहे की विश्वासाशिवाय प्रेम अपूर्ण असतं. तू मला एक संधी दिलीस... आता आयुष्यभर मी ती संधी सार्थ ठरवेन."

सायलीच्या डोळ्यांत पाणी आलं.

"आदित्य... तुझ्या चुका मी विसरणार नाही. पण जर तू खरंच बदलला असशील, तर कदाचित एक दिवस त्या जखमा भरून निघतील."

तेवढ्यात आरोही धावत आली आणि दोघांचे हात एकत्र धरत म्हणाली,

"आई... बाबा... आता पुन्हा कधी भांडू नका... तुम्ही दोघे मला हवे आहात.."

तस दोघांनीही तिला मिठीत घेतलं.

त्या दिवशी सायलीने आदित्यला पूर्णपणे माफ केलं नव्हतं...

पण तिने त्याला पुन्हा एकदा विश्वास कमावण्याची संधी दिली होती.

काही महिन्यांनंतर...

आदित्य पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार नवरा आणि प्रेमळ बाबा झाला होता. त्याने कृतीतून स्वतःला बदलून दाखवलं.

सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ते जुनं हसू परतलं होतं.
तात्पर्य काय तर काही नाती तुटत नाहीत... ती फक्त भरकटतात... दुरावतात... गैरसमजामुळे... तेव्हा योग्य वेळी पश्चात्ताप, विश्वास आणि प्रेम एकत्र आले, तर ती नाती पुन्हा नव्याने फुलू शकतात....

कथा कशी वाटली नक्की कळवा.. काही जणांचे मत होते कि सायलीने आदित्यला माफ करू नये.. अगदी मलाही तेच वाटत एक स्त्री म्हणून.. पण खरं सांगू कधी कधी माफ करून टाकावं पण आंधळा विश्वास मात्र ठेऊ नये..कारण अशी सवय लागलेली माणसे काही बदलत नाही... आता कथेतला आदित्य बदलला... पण खऱ्या आयुष्यातल्या आदित्य बदलेल कि नाही माहित नाही... पण एक संधी तो सुद्धा डिसर्वे करतो.. जर नाते खूप पुढे गेले नसेल तर....

समाप्त




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →