त्रस्तगृहिणी भाग बारा
नामकरण सोहळा
आपल्या मराठी लोकांचं बरं असतं बाळाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी बाळाचं नाव ठेवतात.(नंतर आयुष्यभर आपण सगळेच कुणाला ना कुणाला नाव ठेवतच असतो आणि कुणी ना कुणी आपल्यालाही नाव ठेवतच असतं आणि त्याचं कुणालाच काहीच वाटत नाही. जणू एकमेकांना ठेवणं हा आपला जन्मसिद्ध हक्क असतो.) अहो नाव ठेवतात म्हणजे बाळाचा नामकरण विधी करतात.
मी सहजच एकदा फोनवर बोलता बोलता मैत्रिणीला म्हटले की आजकालचा नामकरण सोहळा म्हणजे या जेनझींचा नुसता धुमाकूळ असतो! तेवढ्यात माझ्या खनपटीला बसलेल्या माझ्या आज्जी सासूबाई मला म्हणाल्या, “झी टीव्ही ने कुठली नवीन वाहिनी सुरू केली का ग जेनझी नावाची?”
आता मी त्यांना काय सांगणार होते की जेनझी हे प्रकरण काय आहे?
आजकाल कानावर इतकी चित्र विचित्र नाव येतात ना की ती नाव उच्चारतानाही जिभेला पीळ पडून ती बिचारी जीभच जणू अगदी पिळवटुन निघते.
मनात नसतानाही या जेनझी मम्मी पप्पांच्या मुलांच्या नामकरण सोहळ्याला जावंच लागतं. तिथली नाव पण कसली, ‘मंत्र, श्रीजख,ज्ञाज्ञिज्ञु….. ‘ अजून कितीतरी.
मध्ये तर अगदी जेंझी नावांचं फॅडच आलं होतं. कदाचित अशी चित्र विचित्र नाव ठेवण्याची ही फॅशन अजून तरी पुढील काही वर्ष तशीच राहील असं मला वाटतं.
तर झालं असं की मी आपली सहजच समाज माध्यमांवर बोटं फिरवत होती तर एक लग्नाची पत्रिका माझ्या दृष्टीस पडली आणि त्यातल्या वराचं नाव होतं ‘ऋग्ध्रिव्य’ मला तर ते नीट वाचता येई ना त्याच्या आई-वडिलांनी ते नाव पंचवीस तीस वर्षांपूर्वी कुठून शोधून ठेवलं असेल ते त्याचे आई-वडिलांचा जाणो. पण नंतर मला एक प्रश्न पडला की त्या मुलाला तरी त्याच्या लहानपणी स्वतःचं नाव सांगता आलं असेल का? बर हे नाव वाचल्यानंतर माझ्या दृष्टीस अशी अनेक नावे पडायला लागली आणि त्यावरची रिल्स आणि शॉर्टसही!
नंतर एक दोघ्या मैत्रिणींशी बोलल्यानंतर कळलं की आई आणि वडील दोघांच्या नावाचं एकत्र करून हे असली नाव ठेवलेली असतात. म्हणजे बघा पहिले बाहेरची लोक इतरांना नाव ठेवायची आता आई-वडील स्वतःच्या मुलांना नाव ठेवायला लागेली.
म्हणजे बघा आई प्रेरणा आणि वडील मंगेश तर मुलाचं नाव प्रेग्नेंश!
आईचं नाव पूजा आणि वडिलांचे नाव मंगेश असेल तर मुलाचं नाव पुंगेश?
एका ठिकाणी तर गुणेश बाबा आणि रेखा नावाच्या आईने त्यांच्या मुलाचे नाव गुरे ठेवलं बापरे!!
‘ह्रुद्यान’ हे नाव वाचून तर मला उद्यान हा शब्द आठवला, ‘श्रीजस्व’ राजे लोकांच्या खजिनाला राजस्व म्हणायचे पण श्रीजस्वचा अर्थ काय असावा?
‘ऋनई’ हे नाव ऐकून मला एकदम लाल किल्ल्यावर बसून स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेला शहनाई वादन करणारे उस्ताद बिस्मिल्ला खांन आठवले.
‘पर्जन्य’ याच्या वेळी गरोदरपणात होणाऱ्या आईने टीव्हीवर हवामानाचा अंदाज जास्त बघितल्यामुळेच कदाचित या लेकराचं हे नाव ठेवले असावे असा मी कयास लावला.
‘लव्यांश’ आणि ‘राध्या’ या नावाबद्दल तर माझी तर्कबुद्धी धारातीर्थी पडली!
वयुन, अतर्क्य, वायु, ही असली नाव म्हणजे….. काही न बोललेलं बरं
मला सुषमा नाव माहिती होतं, सुष्मिता सेन वरून सुष्मिता नावही माहिती होतं, रेशमा हे तर बऱ्यापैकी ज्ञात असलेलं नाव आहे पण श्लेष्मा????
त्या लेकराच्या आईला मी विचारलं की या नावाचा अर्थ तुला माहिती आहे का? तर ती म्हणाली नाही मग मी तिला म्हटलं की अगं श्लेष्मा म्हणजे शेंबूड!
माझ्या मुलाच्या वर्गात एका मुलाचं नाव अर्ष आहे. कदाचित त्याच्या आईला हे माहिती नसावं की अर्ष म्हणजे मुळव्याध.
एका विनोदी शॉर्ट मध्ये तर या जेंझी जोडप्याने त्यांच्या मुलाचं नाव ‘अर्धांगवायू’ ठेवलं होतं. काय तर म्हणे अर्धांगवायू हा संस्कृत शब्द आहे नंतर त्यांना कळलं की अर्धांग वायू म्हणजे पक्षाघात.
आपल्या मुलाच्या नावाचा अर्थ पक्षाघात आहे असं बघून त्यातली आई चिडते आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही माझ्या मुलाचं नाव ‘अपानवायू’ का ठेवलं नाही?
मंडळी आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा अपानवायू या शब्दाचा अर्थ.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर
सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा