Login

त्रस्त गृहीणी भाग 13 युद्धाचा परिणाम थेट गॅसवर

त्रस्त गृहीणी
त्रस्त गृहिणी भाग तेरा

युद्धाचा परिणाम थेट गॅसवर

तिकडे इराण इजरायल अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि माझा नवरा सतत टीव्हीवर युद्धांच्या बातम्या बघत होता. पण मला मात्र रोज संध्याकाळी टीव्हीवर येणाऱ्या कौटुंबिक मालीकां मध्ये जास्त उत्सुकता असल्याने अमेरिकेचे क्षेपणास्त्र इराणवर पडून युद्धाचा भडका होण्यापूर्वीच माझ्या रागाचा पारा चढुन मीच शाब्दिक क्षेपणास्त्र नवऱ्यावर डागले.

मी “तुम्ही कधी इस्राईल किंवा इराणला गेला आहात का?”

नवरा “नाही.”

मी “मग तुमचा काही प्लॅन आहे का तिथे व्यवसाय करण्याचा?”

नवरा “नाही.”

मी “मग आपण तरी तिथे जाऊन राहणार आहोत का?”

नवरा “नाही ग.......”

मी “मग तुमचे कुणी नातेवाईक इस्राईल/इराण मध्ये आहेत का?”

नवरा “नाही रे बाबा!!!!”
.
.
.
मी “मग द्या तो टीव्हीचा रिमोट माझ्याकडे.”

नुकताच मी टीव्ही सुरू केला आणि सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

“आजूबाजूच्या सुना उन्हाळी वाळवण करत आहेत आणि आमच्या घरी डेली सोप बघणं सुरू आहे. सुगरण सुन मिळायला नशीबच लागतं.”

मला सासूच्या या बोलण्याचा भयंकर संताप आला आणि मग मी टीव्ही बंद करून माझ्यात कोप भवनात (बेडरूम मध्ये) गेले.

या जगात कामवाली मावशी बाई म्हणू नका, नवरा म्हणू नका , मुलं म्हणू नका कोणी कोणी माझं काही एक ऐकत नाही. पण एक मात्र अशी वस्तू माझ्याकडे आहे की मी जे म्हणेल ते सगळं ती निमुट ऐकते आणि ती वस्तू म्हणजे माझ्या हातातला स्मार्टफोन.

सासूचे शब्द माझ्या कानात तप्त लावा रसासारखे घुमत होते आणि मग मी माझ्या हातातल्या स्मार्टफोनला आज्ञा दिली की वेगवेगळे उन्हाळी पदार्थ कसे बनवायचे ते सांग. माझ्या बोलण्याची खोटी की लगेच मधुरा म्हणू नका ,सरिता म्हणू नका ,कविता म्हणू नका ,अशा सगळ्या सुगरणी माझ्यासमोर ‘हुकूम मेरे हाका’ म्हणत मान झुकवून तयार होत्या. आणि त्यांच्या तोडीस तोड रणबीर ब्रार, विकास खन्ना, आणि कुणाल कपूर यासारखे निष्णात बल्लवाचार्य माझी आज्ञा ऐकण्यासाठी हातात डाव, पळ्या, सराटे, चिमटे, झारे घेऊन युद्धाला जसे सैनिक तयार असतात तसे पदार्थ तयार करण्यासाठी एका रांगेत उभे होते.

आणि मग मी एखाद्या युद्धातूर राणीच्या ऐटीत वेगवेगळे वाळवणाचे पदार्थ करायला घेतले. रोज सकाळी उठून कधी बटाट्याचे वेफर्स तर, कधी उपवासाच्या चकल्या तर, कधी कुरडया, कधी तांदळाचे पापड तर कधी गव्हाच्या चिकाचे, कधी साबुदाणा बटाटा पापड, तर कधी ज्वारीचे पापड असा नुसता धडाका लावून दिला.

माझी सासू तर माझ्या या कामाचा सपाटा पाहून तोंडात बोट घालून, आवासून बघत होती. इतके सगळे पदार्थ बनवत असताना ती मध्ये मध्ये मला काहीतरी सांगायची पण मी तिकडे काना डोळा करून अजिबात लक्ष दिलं नाही. मी करत असलेल्या वाळवणाच्या पदार्थांचा धडाका बघून शेवटी तिची दातखिळी बसली. आणि गुढीपाडव्याच्या सकाळी मी स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला तर गॅस सुरूच होईना. सिलेंडर हलवलं, बर्नर ठोक ठाक केलं पण काही उपयोग नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की आज सणाच्या दिवशी माझ्या सिलेंडरने मला दगा दिला आहे. तसंही आपल्या भारताला दगाबाजी चा शापच आहे! त्या क्षणी मला असं वाटलं ‘दे माय धरणी ठाय.’

मी तुम्हाला सांगते या भूतलावर आमच्या गृहिणींचे दुःख कुणी कुणी समजून घेऊ शकत नाही. 2016 मध्ये नोटाबंदी झाली त्यामुळे नवऱ्याने यूपीआय वापरणं सुरू केलं. आणि त्याच्या खिशावर माझं डल्ला मारणं अचानक बंद झालं. त्यानंतर लगेच 2020 मध्ये ताळेबंदी झाली आणि माहेर दुरावलं. हेही नसे थोडके म्हणून आता गॅस कपात सुरू झाली. तुम्ही सांगा वाचक हो आमच्यासारख्या गरीब, बिचाऱ्या, दुबळ्या, हतबल,अबला, गृहिणींसाठी या क्रूर, निष्ठुर, निर्दयी, पाषाण हृदयी, दुनियेत कोणीच कैवारी नाही का?

एकतर लग्नाळू मुलांना लग्नाकरिता मुली मिळणं फार कठीण त्यातच इकडून तिकडून मुलगी मिळाली तर लग्नातली संकट काही टळत नाहीत

2016 मध्ये भावाचं लग्न ठरलं तेव्हा गॅसही होता, लग्नासाठी पाहुणे होते ,पण माझ्याजवळ भावाला आहेर देण्यासाठी कॅश नव्हती.

2020 मध्ये गॅसही होता, कॅशही होती पण लग्नात पाहुणेच नव्हते.

आणि आता 2026 मध्ये कॅश आहे, लग्नासाठी पाहुणे आहेत, पण लग्नातल्या जेवणावेळी करिता मेला गॅस नाही.

आता तुम्हीच सांगा मी काय करू.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.