Login

तोडगा भाग-२

समांतर रेषा जरी एक होत नसतील तरी दोन जग एकत्र येऊन समस्येवर तोडगा निघेल का सांगणारी अनोखी कथा!
शीर्षक: तोडगा भाग-२

कधी कधी आपल्याला जी स्वप्न पडतात उठल्यावर ती विसरायला सुद्धा होतात, परंतु नभाचे तसे नव्हते . एकदा स्वप्न बघितले की ते नेहमी आठवणीत राहायचे. तिला तिने जे जग स्वप्नामध्ये बघितलेलं होतं ते खरंच वास्तवात असेल की नाही याबद्दल तिला कुतूहल निर्माण झाले होते.

थिएरी ऑफ युनिवर्सबद्दल वाचत असल्याने त्याबद्दल इंटरनेटवर शोधण्यास तिने सुरुवात केली होती आणि त्यातून तिला शब्द समजला आणि तो म्हणजे समांतर जग!

समांतर जग म्हणजे अशी वैज्ञानिक कल्पना आहे की एक वेगळे जग अस्तित्वात आहे जे हुबेहूब असेच असते फक्त त्याच्यामध्ये थोडेफार बद्दल झालेले असतात; परंतु त्या दुनियेत जाता येते की नाही त्याबद्दल अजून पुरावे मिळाले नव्हते.

पाण्याची समस्या गंभीर झाली आहे त्याचे निराकरण आपल्याला अशा काही समांतर दुनिया असेल तर तिथून मिळेल का? हा प्रश्न नभाच्या मनात डोकावला होता.

मी काय विचार करत बसले, असं काही खरं नसतं आणि जर का असतं तर कोणी ना कोणीतरी तिथे जाऊन या समस्या दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता. कदाचित मी जास्तच वाचल्यामुळे म्हणून मी असं विचार करत असेल. असं स्वतःशीच बोलून ती झोपी गेली होती.

"आपण त्या जवळच्या मंदिरात जाऊया. त्या मंदिराबद्दल खूप काही मी ऐकलं आहे आणि तिकडे कालचक्र सुद्धा आहे. मला एकदा ते सर्व बघायचे आहे." नभाची आई तिला सकाळी उठल्यावर म्हणाली.

" अगं असं काही नसतं. हे सगळं खोटं असतं. तुला आधी पण सांगितलं आहे, त्यामुळे तू काही तिथे जाऊ नकोस." नभाला मात्र हे सर्व काही आध्यात्मिक गोष्टी पटत नसायच्या त्यामुळे तिने आईला सांगितलं.

" हे असं करतेस ना, म्हणूनच नेहमी तुझ्या कामांमध्ये अडथळे येत असतात. आता तुला नोकरी सोडायची आहे, तरी सुद्धा तू ती सोडू शकत नाही; का तर तुझी जोपर्यंत रिप्लेसमेंट मिळत नाही, तोपर्यंत तुला कॉलेजनी नोकरी सोडण्यास मनाई केली आहे. या गोष्टीला आता पाच ते सहा महिने झाले आहेत." तिची आई तिचीच तक्रार तिच्याकडे करत म्हणाली .

" त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा काय संबंध आहे ?  मला ना खरंच तुझं काही कळत नाही. ठीक आहे, तू म्हणत आहेस त्या मंदिरामध्ये आपण या शनिवारी जाऊया. "  असे म्हणून तिने तूर्तास तो विषय बंद करण्याचे ठरवले.

" हे बघ हा,  आता तू शनिवारी यायला तयार झाली आहेस. जर तू शनिवारी माझ्यासोबत आली नाहीस, तर मग मी तुला बघतेच आणि तुला आधीच सांगून ठेवते काही कारण नको की माझे एक्सट्रा लेक्चर आहे किंवा मैत्रिणीला भेटायला जायचं आहे."  आईलाही तिची सर्व कारणे तोंडपाठ असल्याने म्हणाली.

आईला आपली सर्व कारणे पाठ झालेली आहे, त्यामुळे आता दुसरे कोणते कारण शोधायचे म्हणून आपण तिला घेऊन मंदिरात जायचे, याचा विचार करत नभा कॉलेजला जायला तयार झाली.

एका अपघातात नभाचा लहान भाऊ आणि तिचे वडील वारले होते. त्यामुळे नभा आणि तिची आई या दोघीच त्या घरामध्ये राहत होत्या. तसेच नभाने आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. कारण एकदा लग्न झाल्यावर आपल्या आईला कोण सांभाळणार हा प्रश्न  तिच्या पुढे यक्ष म्हणून उभा होता. आईने खूप वेळा समजूनही तिने लग्न करण्यास नकार दिला होता, त्यामुळे आईने सुद्धा आता तिच्या मागे लागणे सोडून दिले होते.

आजही आपण थोडावेळ पुस्तक वाचू. त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन अजून आपल्याला काही माहिती समजते का असे विचार नभाच्या मनामध्ये येत होते. आजचे लेक्चर झाल्यावर लायब्ररीमध्ये जाऊन आपण ते पुस्तक वाचायचा असा तिने निर्धार केला होता.

नभाला दोन लेक्चर झाल्यानंतर लंचसाठी वेळ होता. डबा खाण्यासाठी वेळ होता आणि त्याच्यानंतर तिसरे लेक्चर चालू असताना तिचे शिकवण्यामध्ये लक्ष होते, परंतु जसे लेक्चर संपले तसे पुन्हा तिला समांतर दुनिया खुणावत होती. त्यामुळे तिने आज डब्बा न खाता लायब्ररीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

" अगं , नभा कुठे जातेस ?" मागून तिची मैत्रीण आवाज देत होती.

नभाने ऐकून पण दुर्लक्ष केलं होतं, कारण जर ती पूर्वासोबत बोलत बसली असती तर, पूर्ण लंच टाईम तिथेच गेला असता आणि थोडाफार तिला वाचण्यासाठी मिळणारा वेळसुद्धा त्यातच वाया गेला असता, म्हणून तिने आपल्या पावलांची गती वाढवली आणि मोठ- मोठे पावले टाकत लायब्ररीमध्ये गेली.

" मॅम, सॉरी ते बुक आता अवेलेबल नाही. कारण एका सरांनी ते इशू करून एका आठवड्यासाठी घेऊन गेलेत." डिजिटल एन्ट्री करणाऱ्या लायब्ररीयन यांनी सांगितले.

" मग दुसरे पुस्तक सुद्धा उपलब्ध नाहीये का ?" तिला वाटले कदाचित अजून त्याची एक कॉपी असेल म्हणून तिने विचारले.

" नाही मॅम, ते एकच पुस्तक होते आणि दुसरे आहेत पण त्याची काही पानं निखळून पडल्यामुळे ते पुन्हा बायडिंगसाठी दिले आहेत आणि त्याला यायला अजून काही दिवस लागतील." त्यांनी त्या पुस्तकाबद्दल सांगितलं.

" बरं, ठीक आहे." असे म्हणून नाराजीनेच ती लायब्ररीमधून बाहेर पडली.


क्रमशः

© विद्या कुंभार

अष्टपैलू लेखक स्पर्धा

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →