कायम अशीच समजून घेशील ना!
आज श्रेया काही कामानिमित्त लंच टाइम मध्ये खाली उतरली होती. तिचे काम झाल्यावर ती लगबगीने ऑफिसमध्ये परतत होती इतक्यात तिची नजर रस्त्यपलीकडच्या पार्किंग मधून बाईक काढून ती स्टार्ट करणाऱ्या राजनकडे गेली. आपल्या नवऱ्याला बघून श्रेया खुश झाली. श्रेयाने पाहिलं की त्याच्या अंगावर युनिफॉर्म आहे. राजनने हा कोणता युनिफॉर्म घातला आहे. त्याबद्दल विचारण्यासाठी ती त्याला हाक मारणार इतक्यात तो निघून गेला. खरं तर राजनला घराबाहेर पडलेलं पाहून श्रेयाला आनंदच झाला होता. गेला महिनाभर तो घरातच तोंड लपवून बसला होता. श्रेयाच्या मनात आलं राजन खूपच हळवा आणि प्रेमळ आहे. एक तर तो स्वतः दुसऱ्याला लागेल असं कधी बोलत नाही आणि त्याला दुसरं कोणी असं बोललं तर खूपच वाईट वाटायचं. श्रेयाला तो दिवस आठवला. नेहमी राजन श्रेयाच्या नंतर घरी परतायचा. नेहमीप्रमाणे श्रेयाने आपल्याजवळच्या चावीने लॉक उघडून घरात प्रवेश केला तेव्हा राजन सोफ्यावर विचारांत गढून गेलेला दिसला. त्याचा चेहरा उतरलेला दिसत होता. श्रेया काळजी वाटून त्याच्या जवळ बसली.
"राजन दिवेलागणीच्या वेळी असा उदास का बसला आहेस. काय झालं? तुझा चेहरा पण दुःखी दिसतोय. तुला बरं वाटत नाही का. चल आपण पटकन डॉक्टर कडे जाऊया."
राजनचे डोळे पाणावले. त्याने दीर्घ श्वास घेतला.
"श्रेया काय सांगू सगळं संपलंय आता. आज कंपनीने माझ्यासह अजून चार जणांना अचानक डच्चू दिला. आता मी काय करू! इतक्या मोठ्या पगाराची किंबहुना नवीन नोकरी तरी ह्या परिस्थितीत मला कोण देणार? सगळीकडेच कामगार कपात चालू आहे. मी आता बेरोजगार झालो ही भावना मला सहन होत नाही."
"अरे इतकंच ना! मिळेल तुला नवीन नोकरी आणि तोपर्यंत माझा पगार आहेच ना. आपण आपल्या राहणीमानात थोडी तडजोड करू. आहे काय आणि नाही काय! उलट एका अर्थी तुला थोडा आराम मिळेल. मी तर म्हणते आता संधी मिळाली आहे तर थोडा आराम कर. पुढे बघू."
श्रेयाच्या अशा आश्वासक बोलण्यामुळे राजन थोडा सावरला. नवीन नोकरीसाठी तो जोमाने प्रयत्न करत होता. नोकरी गेल्यावर सुद्धा तो सगळीकडे मोकळेपणाने फिरत होता. कर्णोपकर्णी सोसायटीत, नातेवाईकांमध्ये त्याची नोकरी गेल्याचे सर्वांना कळलं. एक दोन महिन्यानंतर लोक त्याला टोमणे मारू लागले,
"तुझं बरं आहे रे, बायको कमावते आणि तू आराम करतोय." कोणी म्हणायचं,"
"हा सर्वात नशिबवान. नोकरी गमावली तरी ऐट बघा. म्हणतात ना ' गिरे तो भी तंगडी ऊपर ', अशी बायको मिळायला भाग्य लागतं."
"राजन आता बायकोला सर्व हातात आयतं आणून देत असेल."
ह्या सगळ्याचा राजनच्या संवेदनशील मनावर परिणाम होऊ लागला. तो नोकरी मिळावी म्हणून खूप प्रयत्न करत होता पण यश मिळत नव्हते. एका संध्याकाळी श्रेया ऑफिसमधून आल्यावर राजन म्हणाला,
"एव्हढे प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही. असं वाटतंय कुठेतरी निघून जावं. बाहेर पडल्यावर सगळ्यांचे टोमणे सहन होत नाहीत. घराबाहेर जाण्यापेक्षा घरातच बसून राहायला हवं."
"हे बघ राजन तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस. "कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना ". समाज आहे तिथे किडे असायचेच. सगळेच जण सकारात्मक विचार करणारे नसतात. आपल्याकडे पूर्वापार हेच चालत आलं आहे पुरुषाने कमावण्यासाठी बाहेर पडायचं आणि स्त्रीने घरातली कामं करायची. ह्यात थोडा बदल झाला की लगेच नावं ठेवायची. मी जोपर्यंत खंबीर आहे तोपर्यंत तू लोकांचं मनावर घेऊ नकोस. कोणताही आतताई निर्णय घेऊ नकोस. मला तू कायम माझ्याबरोबर हवा आहेस."
लोकांना टाळण्यासाठी त्यानंतर राजन घरातच राहू लागला होता. त्यामुळे आज राजनला बाहेर बघून श्रेयाला आनंद झाला होता. ती घरी आल्यावर राजनला म्हणाली,
"आज किती दिवसांनी मी तुला बाहेर पाहिलं माझ्या ऑफिस जवळ. मी तुला हाक मारणार तर तू निघून गेलास. इंटरव्ह्यू द्यायला गेला होतास का?"
"श्रेया मी गेले दहा दिवस बाहेर पडतोय. तुला मुद्दाम सांगितलं नाही. मला एक नवीन नोकरी मिळाली आहे पण मी ती केलेली कदाचित तुला आवडणार नाही. आता माझ्यामुळे तुला लोकांचे टोमणे ऐकावे लागतील ह्याची मला भीती वाटतेय."
"राजन असं कोड्यात बोलू नकोस. तुला नोकरी मिळाली त्याचा मला आनंदच होईल ना! शेवटी तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे, नाही का!"
"मी खूप ठिकाणी माझ्या पात्रतेप्रमाणे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला गं पण मला हवी तशी नोकरी कुठेच मिळाली नाही. माझी आताची नोकरी एका कुरिअर बॉयची आहे. तुझ्या नवऱ्याने अशी नोकरी केलेली तुला नक्कीच आवडणार नाही. तुझ्या मैत्रिणी, नातेवाईक तुला हिणवतील म्हणून मी तुला सांगितलं नाही. तुला लागेल असं कोणी बोललेलं मला आवडणार नाही."
"राजन तुझ्या श्रेयाला हेच ओळखलंस का तू! आपलं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. माझी मतं तुला माहित नाहीत का! अरे वेड्या, मी लोकांच्या बोलण्याला काही किंमत देत नाही. आपण काही चुकीचं करत नाही. मग त्यांचा विचार का करायचा? प्रामाणिकपणे केलेलं कोणतेही काम हलक्या दर्जाचं नसतं. ' कठोर परिश्रमाला पर्याय नाही ' हे ब्रीदवाक्य आपण नेहमी वाचतो ना. उलट मला तुझा अभिमान वाटतो की तू मोठ्या हुद्द्यावर काम केलं आहेस तरी तू ह्या कामाला तयार झालास. नाहीतर आपण आजुबाजूला बघतो ना कमी शिक्षण असलं तरी "हे फालतु काम मी करणार नाही" अशी माणसं असतात अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली."
"खरंच न श्रेया तू हे मनापासून बोलतेस की मला वाईट वाटू नये म्हणून माझी समजूत घालतेस."
"अरे नाही रे मी तुला लिहून देऊ का तू हे काम करायला माझी हरकत नाही. हे बघ दिवस बदलतात यावर माझा विश्वास आहे. तुला आज न उद्या तुझ्या योग्यतेप्रमाणे नोकरी मिळेलच. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि समोर आलेल्या सत्याचा स्वीकार कर. मेहनतीला पर्याय नाही हेच निर्विवाद सत्य आहे."
"मी खरंच खूप नशिबवान आहे मला तुझ्यासारखी समजूतदार आणि माझ्यावर विश्वास ठेवणारी बायको मिळाली."
"चल तुला नोकरी मिळाली ना आज मी मस्त तुझ्या आवडीचा काजू घालून गोडाचा शिरा करते."
खरंच एकमेकांचे जोडीदार असे समजूतदार असतील तर लोकांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देतं. लोक दोन्ही बाजूंनी बोलायला तयार असतात. त्यांचं बोलणं ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देण्यातच हित आहे, पटतंय ना तुम्हाला.
©️®️सीमा गंगाधरे
