कर्जाची नाती
भाग १
"आई, अगं रडू नकोस. रोहनच्या एमबीएची ॲडमिशन फी भरायचीय ना? तू काळजी नको करू. मी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत एक लाख रुपये त्याच्या खात्यात जमा करते. कसंही करून मी सोय करेन, पण आपल्या भावाचं शिक्षण थांबता कामा नये." अंजलीने फोनवर आईचे सांत्वन केले. बाकीचं बोलून फोन ठेवला.
बाजूलाच बसलेला तिचा पती सुमित वर्तमानपत्र बाजूला ठेवत म्हणाला,
"अंजली, पुन्हा? गेल्याच महिन्यात तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी आपण दागिने गहाण ठेवले आहेत. आता पुन्हा रोहनसाठी एक लाख? आपली स्वतःची घराच्या हप्त्याची ओढाताण चालली आहे, तुला माहिती आहे ना?"
अंजली सुमितच्या जवळ जात म्हणाली,
"सुमित, प्लीज... हे शेवटचं. रोहन एकदा शिकून मोठा झाला ना, की तो सगळं सावरून घेईल. मोठी बहीण म्हणून माझं हे कर्तव्य नाही का ? आई-बाबांकडे आता काहीच उरलं नाहीये. मी जर आज पाठीशी उभी नाही राहिले, तर उद्या लोक माझ्याकडेच बोट दाखवतील."
"सुमित, प्लीज... हे शेवटचं. रोहन एकदा शिकून मोठा झाला ना, की तो सगळं सावरून घेईल. मोठी बहीण म्हणून माझं हे कर्तव्य नाही का ? आई-बाबांकडे आता काहीच उरलं नाहीये. मी जर आज पाठीशी उभी नाही राहिले, तर उद्या लोक माझ्याकडेच बोट दाखवतील."
अंजलीने सुमितला कसेबसे पटवले. स्वतःच्या ऑफिसमधून पीएफचे पैसे काढले, थोडे इकडून तिकडून उसने घेतले आणि रोहनची फी भरली. ही अंजलीची आजची गोष्ट नव्हती. लग्न झाल्यापासून गेल्या सात-आठ वर्षांत तिने माहेरची प्रत्येक धुरा स्वतःच्या खांद्यावर वाहिली होती.
सुमित स्वभावाने चांगला होता, म्हणून त्यानेही आजवर अंजलीच्या या माहेरला साथ दिली होती. रोहनला चांगली नोकरी लागली, बहिणीचे लग्न झाले, बाबांचे ऑपरेशन झाले.या प्रत्येक प्रसंगात अंजली एक भक्कम भिंत बनून उभी राहिली होती.
काळ कोणासाठी थांबत नाही. तीन वर्षे उलटली. रोहनला आता एका मल्टिनॅशनल कंपनीत दीड लाखाचा पगार होता. अंजलीची धाकटी बहीणही आपल्या संसारात सुखी होती. पण नियतीचा फेरा असा फिरला की, ज्या सुमितने आजवर अंजलीच्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली, त्याच्याच व्यवसायाला उतरती कळा लागली.
भागीदारीतल्या एका चुकीच्या व्यवहारामुळे सुमितवर कोर्टाची केस झाली आणि त्याला काही दिवसांतच दहा लाख रुपयांची तातडीने गरज भासू लागली. अन्यथा, त्यांचे राहते घर जप्त होणार होते.
अंजली पूर्णपणे हादरली होती. सुमित मानसिक दडपणाखाली होता. अंजलीने आजवर जे काही जमवले होते, ते माहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यातच खर्च झाले होते. आता तिच्याकडे स्वतःचे म्हणायला काहीच नव्हते.
" सुमित, तू घाबरू नकोस. मी आहे ना? ज्या रोहनला मी मुलाप्रमाणे वाढवलं, ज्याच्या करिअरसाठी मी पदरमोड केली, तो नक्कीच मला मदत करेल. मी आजच त्याच्याशी बोलते." अंजलीने आत्मविश्वासाने सांगितले.
तिने रोहनला फोन लावला. रोहनने फोन उचलला, पण त्याचा आवाज नेहमीसारखा उत्साही वाटला नाही.
"हॅलो रोहन... अरे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे. सुमितच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झालाय. तातडीने पाच लाख रुपये हवे होते. घराचा लिलाव थांबवण्यासाठी एवढी मदत हवीय. मी तुला वर्षभरात टप्प्याटप्प्याने परत करेन." अंजलीने एका दमात आपली अडचण सांगितली.
पलीकडून थोडा वेळ शांतता होती. मग रोहनचा कोरडा आवाज आला,
" ताई... पाच लाख? तू हे काय बोलतेयस? तुला माहितीये ना, मी गेल्याच महिन्यात नवीन फ्लॅट बुक केलाय. त्याचे हप्ते सुरू झालेत. आणि पुढच्या आठवड्यात मी आणि माझी बायको फिरण्यासाठी सिंगापूरला जातोय. त्याचं बुकिंग आधीच झालंय. आता अचानक मी पाच लाख कुठून देऊ?"
अंजलीला वाटलं तिला ऐकायला काहीतरी चूक झालीय.
"रोहन, अरे घर जाईल आमचं. सिंगापूरची ट्रीप नंतर करता येईल ना? मी तुला आजवर कधी काही मागितलं नाही रे..."
"ताई, तू आजवर जे केलंस ते तुझं कर्तव्य होतं. तू मोठी बहीण होतीस. पण आता माझाही स्वतःचा संसार आहे. आई-बाबांना मी दरमहा पैसे देतोच आहे. आता तुझ्या वैयक्तिक अडचणींसाठी मी माझ्या गुंतवणुकीला हात लावू शकत नाही. तू सुमित दाजीना सांगायला हवं होतं ना, की झेपेल तेवढंच करावं." रोहनने फुकटचे सल्ले द्यायला सुरुवात केली.
अंजलीच्या हातातील फोन गळून पडला. ज्याच्या फीसाठी तिने स्वतःच्या लग्नाचे दागिने गहाण ठेवले होते, तोच आज तिला कर्तव्याची आठवण करून देत होता. तिने आईला फोन केला, तिला वाटलं आई तरी रोहनला समजवेल.
"अंजली, अगं तो म्हणतोय ते ही बरोबरच आहे ना ? नवीन लग्न झालंय त्याचं, त्यालाही सुखात राहू दे. आणि अगं पैशांचं काय ? पैसा ही हाताची मळ असतो ग. नाती महत्त्वाची. तू सुमितच्या घरी कोणाकडे तरी मागून बघ ना." आईच्या या उत्तराने अंजलीच्या काळजाचे पाणी झाले.
'पैसा ही गोष्ट हाताचा मळ असते' आणि 'पैशांची काही किंमत नसते' हे म्हणणारे लोक आज तिला पैशाची खरी किंमत दाखवून देत होते. रिकाम्या हाताने जेव्हा आपण आपल्याच रक्ताच्या माणसांकडे बघतो, तेव्हा त्या नात्यांच्या पलीकडे असणारी पैशांची भिंत किती उंच असते, याची जाणीव तिला झाली होती.
रात्रीचे दोन वाजले होते. सुमित शेजारी शांत झोपला होता, पण अंजलीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिला जाणीव झाली होती की, गरज पडल्यावर जेव्हा आपण कोणाकडे हात पसरतो, तेव्हाच कळतं की पैशांची आणि माणसांची खरी किंमत काय असते. आता प्रश्न फक्त पाच लाखांचा नव्हता, तर उध्वस्त झालेल्या विश्वासाचा होता.
