Login

आरसा दोन नात्यांचा भाग १

आरसा दोन नात्यांचा भाग १
आरसा दोन नात्यांचा
भाग १

" रूपा , हे काय आहे ? तुला हजार वेळा सांगितलंय की फाईल्स लावताना त्या तारखेनुसार लावत जा. आज क्लायंट समोर माझा केवढा अपमान झाला असता तुला कल्पना आहे ? साध्या साध्या गोष्टी कशा समजत नाहीत ग तुला ?" अद्वैतने ऑफीसची बॅग सोफ्यावर फेकत रागाने विचारलं.

रूपा किचनमधून बाहेर आली. दिवसभर ऑफीसचं काम उरकून ती आता रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तिने शांतपणे फाईल पाहिली.ती म्हणाली,

" सॉरी अद्वैत, घाईघाईत राहिलं असेल कदाचित. मी आता नीट लावून देते."

" सॉरीने काय होतं ? प्रॅक्टिकल व्हायला शिक. तुझी हीच अडचण आहे, कामात गांभीर्य नसतं. मी सांगतोय म्हणून तुला सुधारण्याची संधी मिळतेय, दुसरं कुणी असतं तर काढून टाकलं असतं तुला कामावरून." अद्वैत कपाळावर आठ्या घालत बोलतच होता.

रूपाने निमूटपणे त्याचे शब्द ऐकून घेतले. तिला अद्वैतचा स्वभाव माहीत होता. तो शिस्तप्रिय होता, अभ्यासू होता. पण एक जुनी वाईट सवय होती. ती म्हणजे रूपाच्या प्रगतीसाठी तिला नेहमी टोकत असे. रूपाला वाटायचं की, अद्वैत आपल्या चुका दाखवतोय म्हणजे त्याला आपली काळजी आहे. ती त्याची प्रत्येक टीका मार्गदर्शन म्हणून स्वीकारायची.

" बरं बाबा, पुढच्या वेळी नाही होणार चूक." असं म्हणत तिने हसून वाद मिटवला.

रूपा आणि अद्वैत दोघेही एकाच आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करायचे. अद्वैत सीनियर होता, तर रूपा त्याच्या टीममध्ये होती. घरात आणि ऑफीसमध्येही अद्वैतचं बॉस असणं रूपाने मान्य केलं होतं.

काही दिवसांनंतर, फर्मला एका मोठ्या मॉलचं डिझाइन सबमिट करायचं होतं. अद्वैत रात्रभर जागून त्याचं स्ट्रक्चरल मॉडेल तयार करत होता. रूपाने त्याला कॉफी नेऊन दिली. तिने सहज लॅपटॉप स्क्रीनकडे पाहिलं. तिचे डोळे विस्फारले. तिने बारकाईने कॅल्क्युलेशन्स पाहिले.

" अद्वैत, हे बघ ना... इथे बीमचं लोड कॅल्क्युलेशन करताना कदाचित थोडी गल्लत झाली आहे का ? जर हे डिझाइन असंच गेलं, तर पुढे जाऊन स्ट्रक्चरल स्टेबिलिटीला प्रॉब्लेम येऊ शकतो." रूपाने अतिशय मृदू आवाजात, त्याला मदत करण्याच्या हेतूने सांगितलं.
अद्वैतने झटकन मान वर केली. त्याच्या डोळ्यांत राग उतरला होता.

" काय म्हणालीस ? गल्लत झालीये ? रूपा, तू मला शिकवणार का आता लोड कॅल्क्युलेशन कसं करायचं ते? दहा वर्ष झालीत मला या क्षेत्रात. तुझं अजून नीट लायसन्स पण आलं नाहीये आणि तू माझ्या कामात चुका काढतेयस ? "

" तसं नाही अद्वैत, मी फक्त तुला सावध करतेय. एकदा क्रॉस चेक कर ना, त्यात काय जातंयना? चूक कुणाकडूनही होऊ शकते." रूपाने समजावण्याचा प्रयत्न केला.

" रूपा बस कर आता! रात्रीच्या वेळी घरात वाद नको निर्माण करू. तुला माझ्या चुका काढण्यात खूप आनंद मिळतो का ? मी तुझ्या चुका दाखवतो कारण मला तुला घडवायचं असतं, पण तू माझी चूक दाखवतेयस याचा अर्थ तुला माझा अपमान करायचा आहे. बायकांनी आपली मर्यादा ओळखून राहावं. तू जेवण बघ, डिझाइन मी बघून घेईन. " अद्वैत तावातावाने बोलला. तो त्याचा लॅपटॉप घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेला.

रूपा तिथेच सुन्न उभी राहिली. तिला जाणवलं की, जेव्हा अद्वैत तिच्या चुका काढतो, तेव्हा ती समंजस पत्नी असते, पण जेव्हा ती त्याची चूक दाखवते, तेव्हा ती वाद करणारी ठरते. अद्वैतला स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवयच नव्हती. त्याच्यासाठी त्याची पत्नी ही केवळ त्याच्या सूचनांचे पालन करणारी एक व्यक्ती होती. पण त्याला बरोबरीने सल्ला देणारी जोडीदार नव्हती.

दुसऱ्या दिवशी अद्वैतने तेच डिझाइन ऑफीसमध्ये प्रेझेंट केलं. रूपाला मनात धाकधूक होतीच. तिने पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पण अद्वैतने तिला
"तू फक्त गप्प बस" असं नजरेनेच खुणावलं.

मिटींग सुरू झाली. मोठे कन्सल्टंट्स आले होते. अद्वैत आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देत होता. इतक्यात चीफ इंजिनिअरने प्रेझेंटेशन थांबवलं.

" मिस्टर अद्वैत, वेट! हे बीम कॅल्क्युलेशन चुकीचं वाटतंय. जर हे असं राबवलं तर अख्खी बिल्डिंग कोलॅप्स होईल. एवढी मोठी चूक तुमच्याकडून अपेक्षित नव्हती!"

पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. अद्वैतचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने चोरून रूपाकडे पाहिलं. रूपाची नजर खाली झुकलेली होती. त्याचा अहंकार त्याला सर्वांसमोर कोसळताना दिसत होता. ज्या गोष्टीसाठी रूपाने त्याला घरी सावध केलं होतं, त्याच गोष्टीमुळे आज त्याचा सर्वांसमोर अपमान झाला होता.

घरी आल्यावर अद्वैत खूप अस्वस्थ होता. तो चिडचिड करत होता, वस्तू आदळआपट करत होता. रूपाने त्याला पाणी दिलं, पण त्याने ग्लास बाजूला झटकला.

" का ग ? तुला खूप आनंद झाला असेल ना आज.? तुला माहीत होतं की माझं चुकणार आहे, तू मुद्दाम मला सर्वांसमोर उघडं पाडलंस." अद्वैत ओरडला.

रूपाला आता शांत राहणं अशक्य होतं. तिने त्याच्याकडे जाब विचारणाऱ्या नजरेने पाहिलं. ती म्हणाली,

" अद्वैत, मी तुला कालच घरी सांगितलं होतं. पण तुला माझी मदत ही मदत वाटलीच नाही, तर भांडण, वाद वाटला. तुला आवडत ना चुका मान्य करणारी माणसं ? मग आज तू तुझी चूक का मान्य करत नाहीयेस ?"

अद्वैत निरुत्तर झाला, पण त्याचा पुरुषी अहंकार अजूनही पूर्णपणे विरघळला नव्हता. काय करेल अद्वैत ?

© ® वेदा

क्रमशः...

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →