Login

अहंकाराचा आरसा भाग १

अहंकाराचा आरसा भाग १
अहंकाराचा आरसा

भाग १

"शर्वरी, माझा निळा शर्ट अजून इस्त्री होऊन का आला नाहीये ? आणि चहा काय मी स्वतः बनवायचा का आता ? तुला साध्या वेळेच्या नियोजनाच्या गोष्टी कधी कळणार आहेत कोण जाणे !"
साकेतने बेडरूममधून ओरडतच हॉलमध्ये एन्ट्री घेतली. त्याच्या आवाजात नेहमीचाच तो अधिकार आणि थोडासा दुसऱ्याला तुच्छता दर्शवणारा होता.

शर्वरी सोफ्यावर बसून आरामात लॅपटॉपवर काम करत होती. तिने साकेतकडे पाहिले सुद्धा नाही. तिने शांतपणे चहाचा घोट घेतला. तिची कीबोर्डवर बोटं चालवत म्हणाली,

" साकेत, शर्ट कपाटात आहे, फक्त त्याला इस्त्री नाहीये. तुला हवं असेल तर इस्त्री करून घे. कोपऱ्यात टेबल मांडलेल आहे, दोन मिनिटांत करून घे. आणि चहाचं म्हणशील तर, भांडं गॅसवरच आहे, तुला हवी तितकी साखर टाकून तू स्वतःसाठी करून घेऊ शकतोस. मी माझं काम करतेय."

साकेत जागच्या जागी थबकला. त्याला वाटलं होतं की त्याचं ओरडणं ऐकताच शर्वरी धावत बेडरूममध्ये जाईल, शर्ट शोधून देईल. आयता त्याला चहाचा कप हातात देईल. पण आज चित्र वेगळं होतं.

" काय म्हणालीस ? मी शर्टला स्वतः इस्त्री करायची ? शर्वरी, तुला भान आहे का तू कोणाशी बोलतेयस ? मी दिवसभर ऑफिसमध्ये मरमर मरतो. घरी आल्यावर मला साध्या सुखाच्या गोष्टींसाठीही तरसावं लागणार असेल, तर तुझ्या असण्याचा उपयोग काय?" साकेतचा आवाज अधिकच चढला.

शर्वरीने लॅपटॉप बाजूला ठेवला. ओढणी सावरत ती उभी राहिली. तिने साकेतच्या डोळ्यांत थेट डोळे घालून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, उलट एक विलक्षण शांतता होती.

"साकेत, उपयोग हा शब्द तू वस्तूंसाठी वापरतोस की माणसांसाठी ? मी तुझी पत्नी आहे, तुझ्या रिमोट कंट्रोलवर चालणारी मशीन नाही. तू ऑफिसमध्ये काम करतोस, तसंच मी सुद्धा करते. तुला थकवा येतो, मलाही येतो. पण तुझा अहंकार तुला सांगतो की तुझा थकवा माझ्या थकव्यापेक्षा मोठा आहे. आजपासून या घरात तुझा साहेबी थाट चालणार नाही."

" म्हणजे तुला आता घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटू लागलंय का ? मग कशाला हवी होती नोकरी ? घरी बसून घर सांभाळायचं होतं ना !" साकेतने आपला नेहमीचा जुना मुद्दा बाहेर काढला.

शर्वरी उपरोधिक हसली.

" जबाबदारी ही दोघांची असते साकेत. तू जेव्हा ऑफिसमधून येतोस, तेव्हा तू दिवसाच्या कामातून रिटायर होतोस, पण मी ऑफिसमधून आल्यावर माझी दुसरी शिफ्ट सुरू होते. हे विषमतेचं नख आपल्या नात्याला रोज ओरखडे ओढतंय. तुला जर वाटत असेल की मी तुझी सेवा करावी, तर तुलाही माझ्या कामाचा सन्मान करावा लागेल. जोपर्यंत तू स्वतःची छोटी छोटी काम स्वतः करत नाही, तुझे सॉक्स स्वतः शोधत नाहीस, तोपर्यंत तुला या घरात चहाचा कपही सन्मानाने मिळणार नाही."

साकेत रागाने लाल झाला. त्याने कपाटातून शर्ट बाहेर काढला. पहिल्यांदा स्वतःच इस्त्री करायला घेतला. पण संतापामुळे त्याच्या हातून शर्टला एक मोठी सुरकुती पडली.

" बघ, तुझ्या या वागण्यामुळे माझं काम कसं बिघडतंय ते! तुला खूप आनंद होतोय ना मला असं काम करताना पाहून?"

शर्वरीने बाल्कनीकडे वळताना मागे वळून पाहिलं. ती शांतपणे म्हणाली,

" आनंद नाही साकेत, पण तुला आज जाणीव होतेय की तू ज्याला साधं काम समजतोस, त्यासाठी किती मेहनत लागते. उद्या सकाळी मला लवकर मिटींगला जायचं आहे, त्यामुळे उद्याचा नाश्ता तू बनवणार आहेस. मी माझं नियोजन केलंय, तू तुझं बघून घे."

साकेतला वाटलं होतं शर्वरी आता रडत बसेल किंवा रागावून माहेरी निघून जाईल. त्याला सवय होती की इगो दुखावला की समोरच्याने माघार घ्यावी. पण शर्वरीने घर सोडलं नव्हतं, उलट तिने घरात राहूनच साकेतच्या अहंकाराचा उंबरठा अडवला होता. तिने साकेतला त्याच भाषेत उत्तर दिलं होतं, जी भाषा साकेत वर्षानुवर्षे तिच्याशी बोलत होता.

रात्री जेवणाच्या टेबलावर पुन्हा तोच तणाव होता. साकेत वाट पाहत होता की शर्वरी जेवण वाढायला येईल. पण शर्वरीने स्वतःचं ताट वाढलं. ती जेवायला बसली.

" माझं ताट कुठे आहे?" साकेतने विचारलं.

"तिथेच आहे साकेत, जिथे माझं ताट होतं. तू वाढून घेऊ शकतोस. भांडी आहेत. अन्न गरम आहे, सांभाळून वाढ," शर्वरीने सहजपणे सांगितलं.

साकेतच्या लक्षात आलं की, शर्वरी आज Tit for Tat जशास तसं खेळतेय. तिने त्याला आरसा दाखवायला सुरुवात केली होती. साकेतला जाणवलं की, घर सोडून जाणं सोपं असतं, कारण तिथे प्रश्न सुटत नाहीत, फक्त टाळले जातात. पण शर्वरीने घरात राहून त्याला भिडण्याचा निर्णय घेतला होता. नात्यातलं नख वाढलं होतं. शर्वरीने ते नख कापायला सुरुवात केली होती, पण ती बोट कापायला तयार नव्हती.

साकेत जेवायला बसला, पण त्याला अन्नाची चव लागत नव्हती. त्याला सतत शर्वरीचे शब्द आठवत होते.
" तुझा अहंकार तुला सांगतो की तुझा थकवा माझ्या थकव्यापेक्षा मोठा आहे."

पहिल्यांदाच साकेतला आपल्या वागण्याचा विचार करायला भाग पडलं होतं. पण अहंकार अजूनही पूर्णपणे विरघळला नव्हता. उद्याचा दिवस त्याच्यासाठी अजून मोठे धडे घेऊन येणार होता. काय करेल शर्वरी ?

©® वेदा

क्रमशः...

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →