"पृथ्वी, नको असं करू. घर तुटायला मी कारणीभूत ठरेन." पण पृथ्वीने तिचा हात हातात घेऊन सांगितले, "काव्या, हे घर तोडणं नाही, तर तुला जिवंत ठेवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे."
पुढे.....
भाग 4
दुसऱ्या बाजूला अनुराधाबाई आपल्या खोलीत एकट्याच बसून थरथरत्या हातांनी विचार करत होत्या. त्यांचा स्वाभिमान आणि ताठरपणा आता भीतीमध्ये बदलला होता
पृथ्वी हा त्यांचा सर्वात लाडका मुलगा होता. तो जर घर सोडून कायमचा निघून गेला, तर आपलं काय होईल आणि घराचे काय होईल, घर सगळं तुटेल. या विचाराने त्यांच्या अंगावर काटा आला.
त्याच वेळी त्यांचे पती, देवप्रसाद खोलीत आले. त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने अनुराधाबाईंना सांगितले, "अनुराधा, तुझ्या अहंकाराने आज भरलेलं घर उद्ध्वस्त केलं.
त्या मुलीने तुला आई मानलं, पण तू तिला साधं माणूस मानायला ही तयार नाहीस. घरासाठी आयुष्य पणाला लावलं; पण तू मात्र सुनेच्या नात्याला कधी न्याय दिला नाहीस.
आज मुलगा हातचा चालला आहे. लक्षात ठेव, जर मुलाला जवळ ठेवायचं असेल, तर सुनेला आधी मनापासून आपलं मानावं लागेल. तिच्यावर प्रेम करावं लागेल. नाहीतर आयुष्यभर एकटेपणाचे अश्रू गाळत बसावे लागेल."
पतीचे हे परखड शब्द अनुराधाबाईंच्या थेट काळजाला भिडले. त्यांना रात्रभर झोप लागली नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर काव्याचे हसरे रूप, तिने घेतलेली काळजी, आजारपणात तिने केलेली सेवा आणि स्वतः केलेले अन्याय एकामागून एक तरळू लागले. पश्चात्तापाच्या आगीत त्यांचा अहंकार जळून खाक झाला.
दुसऱ्या दिवशी सूर्य मावळतीला झुकला होता. तिन्हीसांजेची वेळ झाली होती—दिवस आणि रात्रीच्या मिलनाची, तुळशीपुढे दिवा लावण्याची ती मंगल वेळ होती.
पृथ्वी आणि काव्या आपले सामान घेऊन हॉलमध्ये आले. काव्याने जड पावलांनी सासऱ्यांच्या पायांना स्पर्श केला. सर्वांचे डोळे भरून आले होते.
तेवढ्यात देवघरातून दिवा लावून अनुराधाबाई थरथरत्या पावलांनी पुढे आल्या. त्यांनी थेट काव्याच्या पुढ्यात जाऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अनुराधाबाईंच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
अत्यंत गहिवरलेल्या आवाजात त्या म्हणाल्या, "काव्या, मला माफ कर बेटा! माझ्या आंधळ्या अहंकारामुळे मी तुला ओळखू शकले नाही. तू या घराची खरी लक्ष्मी आहेस आणि मी मात्र तुलाच दुखावत राहिले.
पृथ्वी, बाळा, माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा मला या घराला देऊ नकोस. मला माझी चूक समजली आहे. जर मुलाला घरात ठेवायचं असेल, तर सुनेला सन्मानाने आणि प्रेमाने नांदवावं लागतं, हा धडा मला मिळाला आहे.
अनुराधाबाईंनी काव्याला मायेने जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सासूचे हे बदललेले रूप पाहून काव्याचेही डोळे भरून आले. तिने लगेच सासूचे हात धरले, "आई, नका असं बोलू. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. मला फक्त तुमचे प्रेम हवे होते."
घरातील तणावाचे काळे ढग पूर्णपणे विरून गेले होते. पृथ्वीने सामानाची बॅग बाजूला ठेवली आणि आईच्या खांद्यावर हात ठेवला. घराच्या अंगणात तिन्हीसांजेचा मंद, पवित्र प्रकाश पसरला होता.
आयुष्यातील अहंकाराचा अंधार ओसरून, ‘झालेल्या तिन्ही सांजां’च्या साक्षीने घरात पुन्हा एकदा प्रेम, आदर आणि समाधानाचा नंदादीप अखंड तेवत राहिला.
