"सुनिता.. ही भांडी घासून घे पटापट आणि मगच झोपायला जा.. सकाळपर्यंत वास येत राहतो भांड्यांचा.."
"अहो पण ताई मी तर मगाशीच घासली होती ... ही इतकी परत कुठून आली..?"
"अगं भरलं घर आहे हे ... खाणं पण होतच राहतं लोकांचं .. भांडी कशी आली म्हणून काय विचारतेस..?"
" पण ताई आता मला खूप थकवा आलेला आहे.. दिवसभर खूप काम झालेले आहे.. मी उद्या सकाळी लवकर उठून घासून टाकेन.."
"दोन वेळेचा स्वयंपाक आणि झाडू मारणे म्हणजे काम नव्हे... तुला आणि भाऊजींना फुकटचे या घरात ठेवले आहे ते नशीब समज...ते काही नाही भांडी आत्ताच्या आत्ता घासून टाक.."
मोठ्या जावेचे ते शब्द ऐकून सुनिताच्या डोळ्यात टचकन पाणी आले.. तिने कसेबसे बळ एकवटून भांडी घासली आणि न जेवताच खोलीत आली..
"काय ग.. डोळ्यात पाणी का तुझ्या??" मिलिंदने सुनीताला विचारले..
" आपल्याच घरात उपऱ्यासारखे राहत आहोत असे वाटते आहे... आप्पा आणि माईंनी असे का केले असेल??? दोन दोन मुले असताना सगळे घर एकट्याच्याच नावावर करावे असे त्यांना का वाटले असेल ??? मी तर माईंची शेवटी शेवटी किती सेवा केली.. तुम्हीही काही कमी केले नाही दोघांसाठी.. पण त्या दोघांनी आपल्याला स्वतःच्याच घरात परके केले.." असे म्हणत सुनिता मिलिंद च्या कुशीत शिरून रडू लागली..
" शांत हो सुनीता.. घर आप्पांचे होते त्यामुळे ते घर कोणाला द्यायचे तो सर्वस्वी निर्णय त्यांचा होता.. त्यांच्या निर्णयात बदल करायचा अधिकार मला अजिबात नाही.. दादा काय कोणी आपल्याला परका आहे का?? तू कशाला इतके माया वहिनीचे वाईट वाटून घेतेस..??"
"वाईट वाटून घेऊ नाहीतर काय करू ??? दिवसभर मला नोकरांसारखे राब राब राबवतात .. मी जेवले काय, खाल्ले काय याच्याशी त्यांना काही घेणे देणे नसते.. रात्रीचा अकरा वाजले तरी मला भांडी घासायला लावतात आणि वर बोलून दाखवतात, फुकटचे आम्ही तुम्हाला या घरात राहायला देतो म्हणून.."
"असे म्हणाल्या वहिनी..?"
"हो तर.. आता आपण काय घर खर्चाला पैसे देत नाही का??? आपल्या मुलाचे सुद्धा सगळे आपले आपण बघतो.. तर सतत फुकट खातो फुकट खातो हे कशाला ऐकून दाखवायचे..?"
ते ऐकून मिलिंद ला सुद्धा वाईट वाटले..
"तू आधी शांत हो.. मी योग्य वेळ बघून बोलतो दादाशी.."
सुधाकर देशमुख आणि नंदा देशमुख यांना सचिन आणि मिलिंद ही दोन मुले ... सर्वजण त्यांना आप्पा आणि माई म्हणत असत..
सचिन लहानपणापासूनच धर सोड वृत्तीचा आणि हट्टी होता.. नोकरीला लागल्यावर सुद्धा या नोकरीवरून त्या नोकरीवर तो दोन ते तीन महिन्यातच शिफ्ट व्हायचा.. त्यात त्याने लग्न सुद्धा स्वतःच्या मर्जीने केले..
तर या उलट मिलिंद.. अतिशय शांत , हुशार आणि संयमी.. त्याने स्वतःच्या हुशारीच्या जोरावर चांगली पदवी मिळवून बँकेत नोकरीला लागला.. घरातला बऱ्यापैकी खर्च तो उचलायचा.. त्याने आप्पा माईंच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.. सुनिता सुद्धा कामात अगदी चपळ आणि नम्र होती...
निवृत्तीनंतर आप्पा थकले होते.. माईंना सुद्धा काम करताना थकल्यासारखे व्हायचे... त्याचा बऱ्यापैकी भार सुनिता आणि मिलिंदने उचलला होता.. मिलिंद घर खर्च बऱ्यापैकी सांभाळून घ्यायचा.. तर सुनिता घरातली कामे सुद्धा न बोलता पटपट करायची.. माईंची, आप्पांची औषधे, त्यांना काय हवे नको ते सगळे बघायची..
तर सचिन नुसता उचापत्या करत असायचा.. त्याची बायको माया सुद्धा वरवरची कामे केल्यासारखे करायची आणि बाकी गोष्टी सुनीता वर ढकलून मोकळी व्हायची.. मिलिंद घर खर्च सांभाळायचा, त्यामुळे सचिन निश्चिंत होता..
अप्पांनी नुकतेच निवृत्त झाल्यानंतर पीएफ फंडातून आलेल्या पैशातून नवीन जागा घेऊन घर बांधले होते.. आणि सर्व कुटुंब तिकडे शिफ्ट झाले होते.. तिथे सुद्धा नवीन जागी नोकरी मिळवायला त्रास होत आहे म्हणून सचिन दिवसभर बाहेर फिरायचा .. आप्पा सतत सांगायचे,
"अरे सचिन, जरा मिलिंद कडून शिक काहीतरी.. लग्न झाले आता तुझे.. बायकोची, स्वतःची जबाबदारी उचल जरा.. आमचे बघू नकोस पण निदान स्वतः पुरते तरी कमव. एका कुठल्याही नोकरीमध्ये टिकत नाहीस.. आम्ही किती दिवस तुला पोसणार??"
"करतो हो मी काहीतरी अप्पा.. माझे स्वप्न मोठे आहेत.. मला मिलिंद सारखे आयुष्यभर नोकरी करत बसायच नाही.. मी काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात आहे.. तुम्ही सारखे विचारून डोक्यात जाऊ नका.."
यावर आप्पा गप्प बसायचे.. माईंना सचिनची आणि त्याच्या संसाराची काळजी लागलेली असायची.. जेव्हा केव्हा सचिनला गरज पडायची, तेव्हा त्या मिलिंद च्या मागे किंवा आप्पांच्या मागे लागायच्या,
"लागेल सचिनला आज ना उद्या नोकरी .. आत्ता पुरते तुम्ही मदत करा त्याला पैशांची.." असे म्हणून सतत त्याला पाठीशी घालायच्या आणि हेच सचिनला फावत असायचे..
आज सुनीताला ते सर्व आठवत होते.. आई वडिलांना आपले कमजोर मूल जास्त प्रिय असते, ते तिला आज पटायला लागले होते.. मिलिंद कितीही मेहनती असला तरी आप्पा आणि माईंचा ओढा सचिनकडे जास्त होता..
त्यांच्या संसाराची त्यांना जास्त काळजी होती.. पण त्यांनी कुठेतरी माझ्यावर आणि माझ्या मेहनती नवऱ्यावर अन्याय केला आहे असे तिला सतत वाटायचे..
त्यांच्या संसाराची त्यांना जास्त काळजी होती.. पण त्यांनी कुठेतरी माझ्यावर आणि माझ्या मेहनती नवऱ्यावर अन्याय केला आहे असे तिला सतत वाटायचे..
माई आणि आप्पा एक महिन्याच्या अंतराने हृदयविकाराच्या झटक्याने तीन महिन्यापूर्वी या जगातून निघून गेले..
ते गेल्यानंतर त्यांचे दिवस कार्य पूर्ण झाल्यानंतर, काही दिवसांनी वकील येऊन एक वकील पत्र वाचून गेला.. ज्याच्यामध्ये माईंनी स्वतःची सोन्याची बोरमाळ आणि कानातले सुनीताला दिले होते, तर आप्पांनी त्यांचे राहते घर सचिनच्या नावे केले होते .. वकिलानेही वकील पत्र डायरेक्ट घरच्यांच्या हातात दिले आणि त्यातल्या आप्पांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या बाबी वाचून दाखवल्या..
सचिनला तर आभाळच ठेंगणे झाले होते, तर मिलिंदला आणि सुनीताला मनातून फार वाईट वाटले होते..
त्यांनी निस्वार्थ भावनेने अप्पानी माई यांची सेवा केली होती.. त्यांना स्वतःला सगळी प्रॉपर्टी नको होती, पण निदान त्यांच्या हक्काचे छप्पर तरी त्यांच्या नावे ठेवायला हवे होते असे मिलिंद आणि सुनीताला वाटत होते...
" मी काय म्हणतो सचिन.. अरे सगळ्याच्या सगळ्या कामाचा भार सुनिताच्या खांद्यावर ढकलणे बरे नव्हे.. तिलाही बरेच काम पुरते.. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही.. घरात आपण सहा जण आहोत.. त्यातल्या त्यात आमचा चिंटू अजून खूपच लहान आहे.. त्याच्याकडे सतत लक्ष द्यावे लागते.. तर घरातल्या कामांची जबाबदारी मायावहिनी आणि सुनीता दोघींनी बरोबरीने उचलावी असे मला वाटते.."
सचिनने मिलिंदकडे रागाने बघितले आणि म्हणाला,
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
