Login

8 जुन, जागतिक मैत्री दिन

मैत्री ही नात्यांची राणी आहे, आणि मित्र हे आयुष्याचे खरे धन आहेत. सर्व मित्रमैत्रिणींना जागतिक मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
"8 जुन" मैत्री : जगाला जोडणारा सर्वात सुंदर धागा...!
सुनिल पुणेTM 93598 50065

जगात अनेक नाती जन्माने मिळतात, काही नाती समाजाच्या चौकटीत बांधली जातात, तर काही नाती काळाच्या ओघात निर्माण होतात. पण एक नातं असं आहे, जे ना रक्ताचं असतं, ना कोणत्याही बंधनाचं ते म्हणजे मैत्रीचं नातं. मैत्री ही फक्त दोन व्यक्तींमधील ओळख नसते; ती दोन मनांची, दोन विचारांची आणि दोन आत्म्यांची जवळीक असते. म्हणूनच जगात कोणतीही भाषा, कोणताही धर्म, कोणताही देश असो, मैत्रीची भावना सर्वत्र सारखीच असते. हसताना सोबत हसणारे अनेक मिळतात, पण रडताना खांद्यावर हात ठेवून उभे राहणारे जे असतात, त्यांनाच खरे मित्र म्हणतात.

भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आजही जगासाठी आदर्श मानली जाते. राजवाड्यात राहणारा कृष्ण आणि गरिबीत दिवस काढणारा सुदामा, पण त्यांच्या मैत्रीत कधीही श्रीमंती गरिबीचा भेद आला नाही. कारण खरी मैत्री माणसाची परिस्थिती पाहत नाही, ती त्याचं मन पाहते.

आजच्या डिजिटल युगात हजारो "फ्रेंड्स" एका क्लिकवर मिळतात, पण मन मोकळं करण्यासाठी एखादा खरा मित्र मिळणं हीच खरी संपत्ती आहे. सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंट्स काही क्षणांचा आनंद देतात, पण आयुष्यातील संकटात सोबत उभा राहणारा मित्र आयुष्यभराचं बळ देतो.
खरी मैत्री स्वार्थावर उभी नसते. जिथे स्वार्थ संपतो, तिथेच मैत्रीची खरी सुरुवात होते. मित्र म्हणजे तो, जो आपल्या यशात टाळ्या वाजवतो आणि अपयशात हात धरून पुन्हा उभं राहायला शिकवतो. जो आपल्याला आपल्या चुका सांगण्याचं धाडस करतो आणि योग्य मार्ग दाखवतो.

जगातील सर्व युद्धं, संघर्ष आणि मतभेद जर एका गोष्टीने कमी होऊ शकतात, तर ती म्हणजे मैत्रीची भावना. कारण मैत्री माणसाला माणसाशी जोडते, मनाला मनाशी जोडते आणि जगाला शांततेचा संदेश देते.
म्हणूनच मित्रांची संख्या किती आहे यापेक्षा, तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत किती मित्र तुमच्या सोबत राहतात हे अधिक महत्त्वाचं असतं. पैसा, पद, प्रतिष्ठा आणि संपत्ती यांना मर्यादा असतात; पण खऱ्या मैत्रीची किंमत अमूल्य असते.

जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने एकच संदेश "जग जिंकायचं असेल तर शक्तीची गरज असते, पण माणसं जिंकायची असतील तर मैत्रीची गरज असते."

मैत्री ही नात्यांची राणी आहे, आणि मित्र हे आयुष्याचे खरे धन आहेत.

सर्व मित्रमैत्रिणींना जागतिक मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सुनिल पुणेTM 93598 50065, topsunil@gmail.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →