Login

दारूप्रेमीच किंगमेकर

हेच ते लोक आहेत जे मोफत दारू पिले तर सरकार बदलतात आणि विकत घेऊन पिले तर अर्थव्यवस्था सांभाळतात!
दारू पिणारेच खरे किंगमेकर!....मदिरा लेख सुनिल पुणेTM 93598 50065

देशात अनेक प्रकारचे किंगमेकर असतात. काही राजकारणात, काही उद्योगात, काही समाजकारणात. पण एक असा वर्ग आहे ज्याला ना पद्मश्री मिळते, ना राज्यसभा; तरीसुद्धा त्यांचा देशाच्या राजकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव असतो.

हा वर्ग म्हणजे 'दारूप्रेमी नागरिक'!

होय, हेच ते लोक आहेत जे मोफत दारू पिले तर सरकार बदलतात आणि विकत घेऊन पिले तर अर्थव्यवस्था सांभाळतात!

निवडणुकीच्या काळात दारूप्रेमी मतदार हा राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. प्रचारसभांमध्ये नेत्यांची भाषणे किती ऐकली जातात माहीत नाही, पण काही ठिकाणी "व्यवस्था" कशी आहे याची माहिती मात्र क्षणार्धात गावोगाव पोहोचते.

मतदानाच्या दिवशी हेच लोक लोकशाहीचा उत्सव साजरा करतात आणि निकालानंतर म्हणतात, "सरकार आम्हीच आणलं!"

सरकार कोणाचंही असो, त्यांचं योगदान मात्र कायम असतं.

कारण निवडणूक संपल्यानंतर ते नियमितपणे दारू विकत घेऊन सरकारी तिजोरी भरण्याचं काम सुरू ठेवतात. अर्थमंत्री कितीही योजना आखोत, पण महसूल विभागाच्या मनात दारूप्रेमी नागरिकांबद्दल एक वेगळाच आदर असतो.

महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार जमा झाला की सरकारच्या महसुलात त्यांचं योगदानही सुरू होतं. घरचं बजेट डळमळलं तरी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेबद्दलची त्यांची बांधिलकी मात्र ढळत नाही!
पण दारूप्रेमींची खरी प्रतिभा अर्थकारणात नाही...तर
ती आहे गणितात!
एका क्वॉटरमधून तीन पेग अगदी समान प्रमाणात भरण्याची कला हा मानवजातीच्या उत्क्रांतीतील सर्वात मोठा शोध मानला पाहिजे.

ना मोजमापक...
ना स्केल...
ना बीकर...
ना गणित!
फक्त बाटली हातात घ्यायची आणि तीन पेग असे भरायचे की एक थेंबही कमी-जास्त होणार नाही.
शास्त्रज्ञ आजही अणू मोजतात, ग्रहांचे अंतर मोजतात, प्रकाशाचा वेग मोजतात; पण क्वॉटरचे तीन समान पेग कसे तयार होतात याचं रहस्य अजून उलगडलेलं नाही.

काही अनुभवी मंडळी तर बाटलीकडे पाहूनच सांगतात,
"अरे अजून दीड पेग शिल्लक आहे!"
त्यांच्या या कौशल्यापुढे आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेलाही घाम फुटेल.
खरं तर सरकारने अशा व्यक्तींसाठी "राष्ट्रीय पेग मापन अकादमी" सुरू करावी. तिथे अभियंते, गणितज्ञ आणि सांख्यिकी तज्ज्ञ यांना प्रशिक्षण द्यावं.
कारण जिथे विज्ञान संपतं, तिथून काही दारूप्रेमींचं गणित सुरू होतं!

अर्थात, हा सगळा विनोदाचा भाग आहे. दारूचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असते. पण समाजातील विसंगतींकडे मिश्किल नजरेने पाहण्याची मजा काही वेगळीच असते.

म्हणून पुढच्या वेळी एखादा मित्र अभिमानाने म्हणाला,
"देशासाठी मीही काहीतरी करतो!" तर त्याला फक्त एवढंच विचारा

"सरकार बदलण्यात हातभार लावलास की अर्थव्यवस्था सांभाळण्यात?" विनोद बाजूला ठेवला तर लोकशाही मतदानाने चालते आणि अर्थव्यवस्था सर्व नागरिकांच्या योगदानाने. पण मिश्किलपणे पाहिलं तर दारूप्रेमी स्वतःला 'किंगमेकर' म्हणवून घेण्यात अजिबात कमी पडत नाहीत!

मदिरालेख सुनिल पुणेTM 93598 50065, topsunil@gmail.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →