Login

व्हेन रेन फेल्ट लाइक यू...भाग 6

जेव्हा तो पावसासरखा वाटू लागला..

भाग 6


निरवीने फोन बाजूला ठेवला पण तिची धडधड काही कमी होत नव्हती.


ती वारंवार लायब्ररीच्या दरवाज्याकडे बघत होती , कधी तो आत येतोय असं वाटायचं, तर कधी कुणीतरी दुसरंच आत यायचं.

मनात वेगळीच फिलिंग सुरू होती.


स्वतःलाच समजत नव्हतं ती एवढी नर्व्हस का होत होती?

तिने पुन्हा पटकन पाण्याची बाटली उचलली आणि एक घोट घेतला. नंतर स्वतःला शांत करण्यासाठी कानात एअरफोन्स टाकले.


तिची आवडती प्लेलिस्ट सुरू झाली…

मंद गाणं कानात वाजू लागलं तसं तिचं मन जरा शांत झालं.
ती पुन्हा पुस्तक उघडून बसली खरी… पण लक्ष मात्र एकाही शब्दावर नव्हतं.


मध्ये मध्ये नकळत तिची नजर पुन्हा दरवाज्याकडे जात होती.


दुसरीकडे…


आरव लायब्ररीमध्ये प्रवेश करणार होता,
इतक्यात दोन-तीन ज्युनिअर मुलांनी त्याला आवाज दिला.

“आरव…”

तो थांबला.

“काय रे?” तो सहज म्हणाला.

"त्या फुटबॉल ट्रायल्स बद्दल विचारायचं होतं…” त्यांच्यातला एक मुलगा म्हणाला.


आरव शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत उभा राहिला. मध्ये मध्ये काही सांगत होता, कुणाच्या खांद्यावर हात ठेवत हसत बोलत होता.


त्याचा तो सहज स्वभावच असा होता… सीनियर असूनही तो सगळ्यांशी अगदी मोकळेपणाने बोलायचा.


पण बोलता बोलता त्याची नजर वारंवार लायब्ररीच्या दिशेने जात होती.


“आरव… आणि प्रॅक्टिस किती वाजता ठेवायची?” एकाने पुन्हा विचारलं.


“उद्या संध्याकाळी… मी ग्रुपवर मेसेज टाकतो.” आरव म्हणाला.


“ओके....” ते तिघे निघून गेले.


आरवने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा लायब्ररीच्या दरवाजाकडे चालू लागला.



त्याच्या ओठांवर नकळत हलकंसं हसू आलं होतं.
काही सेकंदातच त्याने लायब्ररीचं दार हलकंसं उघडलं..


आरव शांतपणे लायब्ररीत शिरला,
त्याच्या बुटांचा हलकासा आवाजही त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. आत आलेल्या काही मुलींनी क्षणभर त्याच्याकडे वळून पाहिलं… पण तो कुणाकडेही लक्ष न देता पुढे चालत होता.


लायब्ररीमध्ये नेहमीसारखी शांतता होती… फक्त पानं पलटण्याचा मंद आवाज आणि बाहेर पडणाऱ्या हलक्या पावसाचा आवाज ऐकू येत होता.


लायब्ररीमध्ये काही स्टुडंट्स बसून अभ्यास करत होते, कुणी लॅपटॉपमध्ये नोट्स बनवत होतं तर कुणी पूर्णपणे पुस्तकात हरवलेलं होतं.


त्याची नजर मात्र सतत कोणाला तरी शोधत होती.


तो हळूहळू रॅक्सच्या मधून पुढे गेला,
स्टडी सेक्शन, रेफरन्स सेक्शन पार करत शेवटी नोव्हेल सेक्शनजवळ आला.


आणि तिथे…

खिडकीजवळच्या कोपऱ्यात ती बसलेली दिसली.

निरवी...

सिम्पल स्लीव्हलेस टी-शर्ट, केसांचा हलकासा मेसी बन आणि काही चुकार केसांच्या बटा तिच्या शांत चेहऱ्यावर अलगद येत होत्या.


कानात एअरफोन्स लावलेले… डोळे मिटलेले,
आणि हाताची बोटं मंद गाण्याच्या तालावर हवेत हलकी हलत होती. ती पूर्णपणे त्या गाण्यात हरवली होती.


खिडकीतून येणारा थंड वारा तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांशी खेळत होता… बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी तिच्या मागे दिसत होत्या.


काही क्षण आरव तसाच उभा राहून तिच्याकडे बघत राहिला.


त्याच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं स्माईल आलं.


“ही खरंच वेगळी आहे…” त्याच्या मनात विचार आला.
तो काही न बोलता शांतपणे तिच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला.


त्याने दीर्घ श्वास घेतला आणि काही क्षण तसाच तिच्याकडे बघत राहिला…


तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. जणू बाहेरचा पाऊस, लायब्ररीची शांतता आणि तिचं छोटंसं जग — सगळं एकमेकांत मिसळून गेलं होतं.


आरव नकळत हलकंसं हसला.


तो काही सेकंद तसाच शांत बसून तिच्याकडे बघत राहिला आणि मग टेबलवर हलकंसं बोट टकटक केलं.


क्षणात निरवीने डोळे उघडले.


समोर आरव बसलेला दिसताच ती अक्षरशः दचकली.

तिने पटकन एअरफोन्स काढले, सरळ बसली आणि घाईघाईने केस कानामागे केले.


“तु… तू कधी आलास?” ती हलक्या आवाजात म्हणाली.


“आत्ताच…” आरव शांतपणे म्हणाला.
“मॅडम तर वेगळ्याच दुनियेत होत्या.”


तसं निरवीने पटकन नजर खाली केली.

“सॉरी… मला कळलंच नाही.” ती हळू आवाजात म्हणाली.


“अरे रिलॅक्स…” तो हलकंसं हसत म्हणाला,
“इतकी घाबरतेस का?”


“घाबरत नाही…” ती लगेच म्हणाली,
पण तिच्या हातातलं पेन सतत फिरत होतं.


क्षणभर दोघांमध्ये अवघडलेपण शांतता पसरली.

निरवीला काय बोलावं हेच समजत नव्हतं. आरव मात्र निवांत तिच्याकडे बघत बसला होता.


“उम्म… बस ना…” ती स्वतःच बोलून गेली आणि पुढच्याच क्षणी तिला कळलं की तो आधीपासूनच बसला आहे.


तसं आरवच्या ओठांवर हसू आलं.


“थॅन्क्स ...परवानगी दिल्याबद्दल.” तो मुद्दाम म्हणाला.


तशी निरवी अजूनच अवघडली.



“म्हणजे… माझा तसा अर्थ नव्हता.” ती गडबडून म्हणाली.


“माहितीय.” तो हसत म्हणाला.


तिने पटकन समोरचं पुस्तक बंद केलं.


“इंग्लिश नोव्हेल?” त्याने पुस्तक उचलत विचारलं.


“हम्म… आवडतात मला.” ती शांतपणे म्हणाली.


“इंटरेस्टिंग…” तो पुस्तकाची कव्हर बघत म्हणाला.
“मला तर दोन पानं वाचली की झोप येते.”


तसं निरवीच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.


“प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं ना?” ती पटकन विषयावर येत म्हणाली आणि आपल्या बॅगमधून डायरी काढली.


“हम्म…” आरव खुर्चीत जरा पुढे झुकत म्हणाला.


त्याने आजूबाजूला नजर फिरवली,
सगळीकडे शांतता होती… कुणी पुस्तकात डोकं खुपसून बसलं होतं, तर कुणी लॅपटॉपवर टायपिंग करत होतं.


“इथे डिस्कशन करायचं?” तो हलक्या आवाजात म्हणाला.


“हो… काही प्रॉब्लेम आहे का?” निरवी सहज म्हणाली.


“मला काही प्रॉब्लेम नाही…” आरव मिश्किलपणे म्हणाला,
“पण आपल्या डिस्कशनमुळे बाकीच्यांना प्रॉब्लेम नको.”


तिने आजूबाजूला एक नजर टाकली… खरंच, दोघं जरा जरी मोठ्याने बोलले तरी पूर्ण लायब्ररी त्यांच्याकडे बघेल अशी परिस्थिती होती.


“हम्म…” तिने मान हलवली.
“मग कुठे करायचं डिस्कशन?”



“कुठे म्हणजे…” आरव खुर्चीतून उठत म्हणाला,
“आपल्या कॉलेजचं एवढं मोठं कॅन्टीन आहे.”


तो हलकंसं हसला.


“मस्त चहा, काहीतरी खायला… आणि आरामात प्रोजेक्ट डिस्कशन.”


“ओके…” निरवीने शांतपणे होकारार्थी मान डोलावली.


तिने पटकन आपलं पुस्तक बंद केलं आणि सामान आवरायला सुरुवात केली.


फोन, डायरी, पाण्याची बाटली तिने हातात घेतली… बाकी पुस्तकं आणि नोट्स टेबलवर नीट एका बाजूला ठेवले.


आरव तिच्याकडे बघत शांत उभा होता.


ती घाईघाईत सामान आवरत होती आणि मध्ये मध्ये नकळत त्याच्याकडे नजर जात होती.


“ रिलॅक्स …” तो हलकंसं हसत म्हणाला,
“मी पळून नाही जात.”


तशी निरवी अजूनच अवघडली.


“मी… मी फक्त पटकन आवरत होते.”ती नजर खाली ठेवून म्हणाली.


“माहितीय.” तो मिश्किलपणे म्हणाला.


तिने काही न बोलता बाटली उचलून त्याच्या बाजूला उभी राहिली...
आणि मग दोघंही शांतपणे लायब्ररीच्या बाहेर चालू लागले.



क्रमशः

कसा वाटला भाग ते नक्की सांगा,
कथेच्या पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि समीक्षा द्यायला विसरू नका.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →