विठूरायाची आषाढी वारी सुरू होती. आभाळात हलके हलके ढग जमा होत होते पण पाऊस काही नव्हता. उन्हाच्या झळांनी वातावरण तापलेलं होतं पण पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या पालखीचा उत्साह मात्र कुठेही कमी झाला नव्हता. टाळांचा नाद, मृदंगाची थाप, अभंगांचा गजर आणि “ज्ञानोबा तुकाराम”चा जयघोष यांत सगळा आसमंत जणू भक्तीने भारून गेला होता. माऊलींची पालखी हळूहळू पुढे सरकत होती आणि तिच्यामागोमाग असंख्य दिंड्या पायी चालत होत्या.
अशाच एका दिंडीत तुषार नावाचा एक तरुण वारकरी होता. अंगात पांढराशुभ्र झब्बा, गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर मोठा चंदनी टिळा आणि त्यावर अलगद लावलेला बुक्का असा सगळा त्याचा साज होता. दिसायलाही तुषार अगदी देखणा होता. वरवर पाहता तो भक्तिमय आणि वारीत रंगलेला वाटत होता पण त्या साऱ्या थाटामागे त्याच्या हातात सतत चमकणारा महागडा मोबाईल होता. त्यानं चेहऱ्यावर भक्तीचा आव आणलेला असला तरी त्याचे डोळे मात्र वारंवार स्क्रीनवरच खिळलेले असत.
पालखीच्या प्रस्थानापासून तो दिंडीत वावरत होता पण प्रत्यक्षात तो वारीत नव्हताच. तो सतत वारीचे रील्स बनवत होता. दिवसभर त्याचं लक्ष फोनवरचं असायचं. आजूबाजूला काय चालले आहे, कोण कोण अभंग म्हणत आहे, कोणाच्या चेहऱ्यावर किती थकवा आहे, कोणाच्या डोळ्यांत किती श्रद्धा आहे? यापैकी काहीच त्याला नीट जाणवत नव्हते. त्याच्या जगात फक्त कॅमेरा, कॅप्शन आणि व्ह्यूज होते.
दर थोड्यावेळानी तो मोबाईलवर टाईप करत होता आणि प्रत्येक व्हिडिओखाली मोठ्या आत्मविश्वासाने लिहीत होता,
“विठ्ठलाची वारी… ती चालणं म्हणजे माझं अहोभाग्य!”
“विठ्ठल रखुमाई माझी आई, माझं पहिलं प्रेम!”
“वारकरी सेवा हीच खरी विठूभक्ती!”
त्यानं लिहिलेले शब्द सुंदर होते पण त्या शब्दांमागची भावना मात्र कोरडी होती. व्हिडिओ टाकला की तो लगेच मोबाईलमध्ये व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स पाहत बसे. एखाद्या क्षणी एखादा अभंग त्याच्या कानावर पडायचा पण तो मनात उतरायच्या आधीच स्क्रीनच्या प्रकाशात विरून जायचा.
“विठ्ठलाची वारी… ती चालणं म्हणजे माझं अहोभाग्य!”
“विठ्ठल रखुमाई माझी आई, माझं पहिलं प्रेम!”
“वारकरी सेवा हीच खरी विठूभक्ती!”
त्यानं लिहिलेले शब्द सुंदर होते पण त्या शब्दांमागची भावना मात्र कोरडी होती. व्हिडिओ टाकला की तो लगेच मोबाईलमध्ये व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स पाहत बसे. एखाद्या क्षणी एखादा अभंग त्याच्या कानावर पडायचा पण तो मनात उतरायच्या आधीच स्क्रीनच्या प्रकाशात विरून जायचा.
त्याच्या आजूबाजूला वारकरी भजन करत होते. कुणी विठूरायाचे नामस्मरण करत होते, कुणी थकलेल्या पावलांना विठूच्या गजराच्या तालावर पुढे नेत होते पण त्या भक्तिसागरात तुषार मात्र एकटा निर्जन बेटासारखा उभा होता. दिसायला त्याचं सागरातला एक पण मनाने त्यापासून खूप दूर.
त्या दिंडीत एक वयस्कर वारकरी काका होते. खूप अनुभवी, शांत आणि चेहऱ्यावर भक्तीचा गहिरा प्रकाश घेऊन चालणारे. सगळे त्यांना तात्याकाका म्हणत. तात्याकाकांनी तुषारला अनेकदा भजनात सामील करण्याचा प्रयत्न केला. कधी प्रेमाने खुणावले, कधी हसून बोलावले, कधी टाळ हातात देऊन जवळ घेतले पण तुषारचे लक्षच नसायचे. काकांना ते जाणवले. त्यांनी काही वेळा प्रयत्न केला पण शेवटी त्यांनीही त्याचा नाद सोडला. त्यांच्या चेहऱ्यावर तुषारसाठी फक्त एक शांत हळहळ होती.
वारी सुरूच होती. पावलागणिक पंढरी जवळ येत होती. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. कुणी फुगड्या घालत होते, कुणी टाळमृदंगाच्या तालावर नाचत होते, कुणी डोळे मिटून विठूनामात हरवून गेले होते. रस्ता कापताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता तर एक विलक्षण समाधान होतं. जणू प्रत्येक पाऊल त्यांना पंढरीकडे नाही तर स्वतःच्या अंतरंगाकडे नेत होतं.
अशातच चालता चालता तात्याकाकांच्या नजरेस रस्त्याच्या कडेला हतबलपणे बसलेले एक वृद्ध वारकरी आजोबा पडले. त्यांच्या चेहऱ्यावर उन्हाचा झालेला त्रास स्पष्ट दिसत होता. पायातील चप्पल तुटली होती. एक चप्पल पूर्णपणे फाटून गेली होती तर दुसरी हातात धरून ते ती दुरुस्त करता येते का ते बसले होते.
वर डोक्यावर सूर्य आग ओकत होता. रस्ता उन्हाने चांगलाच तापला होता. अनवाणी चालणे म्हणजे जणू जळत्या कोळशांवर पाय ठेवण्यासारखेच. त्या आजोबांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. ते बसल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होते पण पायाला झालेल्या जखमांमुळे त्यांना नीट उठता येईना. बरेच अंतर अनवाणी चालल्यामुळे त्यांच्या पायाला फोड आले होते. प्रत्येक हालचालीसोबत त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लहर उमटत होती. काही जणांनी हे पाहिले पण मदत न करता ते पुढे निघून गेले. कुणाच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती पण त्यांच्या पावलांत आजोबांची थांबण्याची ताकद नव्हती.
त्या वारकरी आजोबांची अशी अवस्था तुषारच्या नजरेस पडली. क्षणभर त्याच्या मनात हलले पण लगेचच त्याच्या डोक्यात दुसरा विचार चमकून गेला. त्याने पुढचा मागचा कसलाही विचार न करता सरळ खिशातून मोबाईल काढला.
आणि मनात विचार केला, “ह्या थकलेल्या वारकरी आजोबांचा सीन भारी आहे. त्यांना मदत करतो आणि ट्रायपॉडवर मोबाईल सेट करतो. मदत करतानाची रीलही होईल आणि प्रसिद्धीही मिळेल."
आणि मनात विचार केला, “ह्या थकलेल्या वारकरी आजोबांचा सीन भारी आहे. त्यांना मदत करतो आणि ट्रायपॉडवर मोबाईल सेट करतो. मदत करतानाची रीलही होईल आणि प्रसिद्धीही मिळेल."
त्याच्च्या त्या विचारात माणुसकीपेक्षा प्रसिद्धीचा मोह अधिक होता. तो त्या आजोबांकडे गेला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर सहानुभूतीचा अभिनय तर होता पण मनात कॅमेरा सेट करण्याची तयारी सुरू होती. तो तिथे पोहोचून मोबाईल सुरू करणार इतक्यात एका गोष्टीने त्याचे लक्ष वेधून घेतले.
तात्याकाका स्वतः त्या आजोबांजवळ बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही गाजावाजा नव्हता. कुठलाही बडेजाव नव्हता. फक्त होती शांत, निःशब्द करुणा. त्यांनी जवळच्या बाटलीतले पाणी आजोबांना प्यायला दिले. आजोबांच्या ओठांवर पाण्याचा पहिला थेंब पडताच त्यांच्या शरीरात जणू जीव परत आला. मग जरा वेळानं तात्याकाकांनी आपल्या पायातील चप्पल काढली आणि ती त्या आजोबांच्या पायात घातली.
तो क्षण इतका साधा होता पण तुषारच्या मनाला लागला. पायातली चप्पल पाहून आजोबांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी काकांकडे पाहिले. त्या नजरेत कृतज्ञता होती. एका अनोळखी माणसाकडून मिळालेल्या प्रेमाने भरून आलेलं मन होतं.
“अहो दादा, तुमची चप्पल मला दिलीत मग तुम्ही आता वारीत कसे चालणार हो? अजून पंढरी लांब आहे!” आजोबा कातर आवाजात म्हणाले.
आजोबांचे बोलणे ऐकून तात्याकाका मनापासून हसले. त्या हसण्यात थकवा नव्हता, अहंकार नव्हता, फक्त विठ्ठलावरचा अढळ विश्वास होता.
“मी पंढरीला चाललोय बाबा… आपल्या विठूच्या दर्शनाला! तो काही मला अनवाणी ठेवणार नाही. त्याला सगळ्यांची काळजी आहे!”
तात्याकाकांचे शब्द साधेचं होते पण त्यात भक्तीचा अर्थ लपलेला होता. ते शब्द ऐकून आजोबांच्या डोळ्यांत पाणी आले. ते काकांच्या हाताचा आधार घेत उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेपेक्षा कृतज्ञतेचे तेज अधिक दिसत होते. काही क्षणांतच आजोबा वारकऱ्यांच्या भक्तिसमुद्रात मिसळून गेले आणि दिसेनासे झाले.
आता तात्याकाका मात्र त्या तापलेल्या डांबरी रस्त्यावर अनवाणी चालत होते. त्यांच्या पावलांखालचा रस्ता तापलेला होता पण त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची साधी खूणही नव्हती. उलट त्यांच्या डोळ्यांत एक शांत समाधान होतं. जणू त्यांनी काहीतरी मोठं बक्षिसे मिळवलं होतं. ते पाहून तुषार त्यांच्या मागे गेला.
“तात्या… अहो तात्याकाकाsss…”
त्याने काकांना हाक मारून थांबवले. धावत त्यांच्या जवळ पोहोचून तो म्हणाला,
“काका, अहो मी पाहिलं तुम्ही त्या आजोबांना तुमच्या पायातील चप्पल काढून दिलीत आणि आता स्वतः मात्र अनवाणी चालताय. ह्या सगळ्या घटनेची तुम्ही रील का नाही काढली? सोशल नेटवर्कवर टाकली असती रील तर खूप लाईक्स आले असते माहिती आहे का? आणि नंतर लोक तुम्हाला ओळखूसुद्धा लागले असते. लोकांना कळलं असतं तुम्ही एका सर्वसामान्य वारकऱ्यासाठी काय केलं. स्टार झाला असतात काका तुम्ही स्टार!”
“काका, अहो मी पाहिलं तुम्ही त्या आजोबांना तुमच्या पायातील चप्पल काढून दिलीत आणि आता स्वतः मात्र अनवाणी चालताय. ह्या सगळ्या घटनेची तुम्ही रील का नाही काढली? सोशल नेटवर्कवर टाकली असती रील तर खूप लाईक्स आले असते माहिती आहे का? आणि नंतर लोक तुम्हाला ओळखूसुद्धा लागले असते. लोकांना कळलं असतं तुम्ही एका सर्वसामान्य वारकऱ्यासाठी काय केलं. स्टार झाला असतात काका तुम्ही स्टार!”
तुषारचं बोलणं ऐकून तात्याकाका जागीच थांबले. त्यांनी तुषारकडे शांतपणे पाहिलं आणि हळू आवाजात ते म्हणाले,
“बाळा, जे लोकांना कळावं म्हणून केलं जातं ते दान नव्हेच. त्याचं बक्षीस लोक देतात आणि जे दान ह्या हातानं दिल्यावर दुसऱ्या हातालाही कळू नये इतक्या गोपनीयतेनं केलं जातं त्याचं बक्षीस खुद्द भगवंत देतो.”
“बाळा, जे लोकांना कळावं म्हणून केलं जातं ते दान नव्हेच. त्याचं बक्षीस लोक देतात आणि जे दान ह्या हातानं दिल्यावर दुसऱ्या हातालाही कळू नये इतक्या गोपनीयतेनं केलं जातं त्याचं बक्षीस खुद्द भगवंत देतो.”
काकांचं ते बोलणं तुषारच्या मनावर बिंबलं गेलं. त्या शब्दांनी त्याच्या आत काहीतरी तुटलं. त्याच्या डोळ्यांत पाणी दाटलं. आतापर्यंत तो जे काही करत होता, त्यात भक्तीचा आव होता पण आत्मा नव्हता. त्याला पहिल्यांदाचं स्वतः आणि भगवंतातली पोकळी जाणवली. काही क्षण तिथंच तो गप्प उभा राहिला. काही वेळानं त्याने स्वतःच्या पायातील चप्पल काढली. ती अदबीनं तात्याकाकांसमोर ठेवली.
“तात्याकाका, ही घ्या माझी चप्पल. या घाला.”
तात्याकाका हसले. त्या हसण्यात माया होती, समाधान होतं आणि एका नव्या वारकऱ्याचा जन्म पाहिल्याचा आनंदही होता.
“नको बाळा. तू घाल. तुला त्रास होईल उन्हाचा." ते नम्रपणे म्हणाले.
पण तुषारच्या डोळ्यांत आता केवळ पश्चात्ताप नव्हता तर परिवर्तनाची ज्योतही पेटलेली होती. त्याचा आवाज कातर झाला.
“नको बाळा. तू घाल. तुला त्रास होईल उन्हाचा." ते नम्रपणे म्हणाले.
पण तुषारच्या डोळ्यांत आता केवळ पश्चात्ताप नव्हता तर परिवर्तनाची ज्योतही पेटलेली होती. त्याचा आवाज कातर झाला.
“काका, खरं सांगू का? आजपर्यंत मी फक्त वारीचे, वारकऱ्यांचे आणि विठ्ठलाचे फोटो काढत होतो पण आज पहिल्यांदाच मला माणसाच्या रूपात विठ्ठल दिसला. वारीचा खरा अर्थ उमगला. आतापासून पुढे मी वारीला फक्त आत्मिक समाधान अनुभवायला येणार. शोबाजी बंद!”
हे शब्द उच्चारताना त्याच्या मनाला एक वेगळाच हलकापणा आला. जणू आतापर्यंत त्याने वाहिलेला दिखाव्याचा भार खाली उतरला होता. तात्यांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्या स्पर्शात आशीर्वाद होता आणि नव्या वाटेवरचा आश्वासक हातही होता.
विठ्ठलाच्या नामघोषात दिंडी पुढे निघाली. टाळ, मृदंगाची धून कानाला सुखावत होती. आकाशातला सूर्य आता थोडा कलला होता. रस्त्यावरचा ताप कमी होत होता पण तुषारच्या मनात मात्र एक नवा प्रकाश उजळला होता.
त्या दिवशी वारीत एक नव्यानं वारकरी झालेला विठूभक्त अनवाणी चालत होता आणि दुसरा विठ्ठलाच्या भक्तीत मुरलेला जुना सखा वारकरी विठूभक्तीत समरसून पंढरीची वाट चालत होता…
त्या क्षणी वारी फक्त पंढरपूरकडे जाणारी यात्रा राहिली नव्हती. तर ती तुषारसाठी स्वतःकडे परत येण्याची वाट ठरली होती. परसेवेने उजळलेली, भक्तीने भारलेली, आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालेली.
.....सायली पराड कुलकर्णी
शॉर्टफिल्म स्पर्धा जुलै 2026.
पात्र:
आजोबा (वय ऐशीच्या घरात)
तात्याकाका (वय पंचाहत्तरच्या घरात)
तुषार ( पंचविशीच्या घरात)
इतर वारकरी.
पात्र:
आजोबा (वय ऐशीच्या घरात)
तात्याकाका (वय पंचाहत्तरच्या घरात)
तुषार ( पंचविशीच्या घरात)
इतर वारकरी.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
