विषय - घटस्फोटानंतर काय ?
शीर्षक - विसंगती (भाग ३) अंतिम
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुष्पा आली आणि निवांत बसत म्हणाली "श्रीमंत लोकांचं अवघडच काम आहे मॅडम. माझ्या नवऱ्यानं चार सहा महिने काही काम केलं नाही तर माझा भाऊ त्याला सोड चिठ्ठी दे म्हणत होता, मी नाही म्हणलं. त्याला सोडून काय माहेरी जाऊन पडू? देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं, अशी बरी मोकळी सोडून देईन? त्याला काम करू दे नाहीतर नाही. मी कमावते, त्याला पोसते. कुंकाचा आधार आहे तो, त्याला सोडून दिलं तर बिना नवऱ्याची काय म्हणून फिरू मी बाहेर? भरू नका असं ना पण पोरांना सांगायला बाप तर आहे ना? "
"अगं आज काय आल्या आल्या हा विषय घेऊन बसलीस काय झालं का घरी?"
"तुम्ही ते समोरच्या घरातले विचारत होता ना ? ती बाई मेली नाही का मागे गळफास लावून? तिच्याबद्दल कळलं. माझ्या डोक्यातून काय विचार जाईना!" ती नाराजीने म्हणाली.
"काही कळालं का तिच्याबद्दल आणि कसं काय?" श्वेताला ते जाणून घ्यायचं होतं.
" मॅडम त्यांचं लग्न होऊन दोन वर्षे झाली होती पण ही पोरगी खूप तापट स्वभावाची, लादत वाढलेली आणि संशयी होती म्हणे. नवरा कामाचे निमित्याने बाहेर जायचा तर ही सारखे फोन करून त्याचा जीव खायची. हॉटेलवर उतरला तर कुठे आहे दाखव, त्याला व्हिडिओ कॉल करायची. बिचारा कंटाळून जायचा. तर त्या दिवशी वैतागून सकाळी तो तिला म्हणला म्हणे की तू अशी संशय घेणार असली तर मी तुला ते डेवर्स का काय देईन ."
" डिव्होर्स? म्हणजे हा तेच घटस्फोट ?"
" हां घटस्फोट. मग ही बाई चवताळली ना. आधीच खूप संतापी होती ती मग ती आईजवळ फोनवर काही पण बोलायला लागली. तिचा भाऊ पण येतो म्हनला. तिचा फार जीव होता नवऱ्यावर. घटस्फोट घेऊन मी काय करू? घटस्फोटानंतर मी कशी जगू? लेकरू बाळ पण काही नव्हतं. त्याला अद्दल घडवायची म्हणून तिने हे सगळं लिहून तिच्या मैत्रिणीला फोनवर पाठवलं. त्याला भीती घालण्यासाठी तिने गळफास घ्यायचं नाटक केलं पण ते तिच्या अंगाशी आलं हो मॅडम . तुझ्याशी घटस्फोट घेतल्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणून तिने व्हिडिओ कॉल लावून फास घातला होता म्हणे गळ्यात. नवरा तिकडून समजावत होता पण कसली ऐकती?"
आता मात्र श्वेताने कपाळाला हात मारून घेतला. कसा स्वभाव आहे या मुलींचा?
" पुष्पा, तुला कुठून कळलं हे सगळं? इतके सविस्तर."
"काय मॅडम तुम्ही टीव्ही , बीबी बघत नाही का? आज सकाळपासून टीव्हीवर हीच बातमी यायला लागली. अजून काय काय सगळं सांगू लागले ते . . . . तुम्ही लावा बातम्या. काही म्हणा मॅडम, बाई असो का माणूस. पण एकदा लग्न झालं की झालं .घटस्फोटानंतर जगणं अवघड होतं! दुसरं लग्न करता येत नाही का एकटं राहता येत नाही. दुसरा कसा मिळेल काय भरोसा?"
पुष्पा बोलते ते खरे आहे. जीवनाची वास्तविकता आहे, जे गरिबांना कळतं ते श्रीमंतांना कळत नाही की काय? श्वेता या सगळ्या विचारात खूप हरवून गेली पण टीव्हीवर पुन्हा ही बातमी लावून पाहण्याची इच्छा झाली नाही.
पुष्पा उठून मजेत कामात लागून गेली. गरीब आणि श्रीमंत स्त्री मध्ये किती फरक आहे.
श्वेता पुन्हा पुन्हा या विषयाचा विचार करू लागली. खरंच जीवनात किती विसंगती आहे.
श्वेता पुन्हा पुन्हा या विषयाचा विचार करू लागली. खरंच जीवनात किती विसंगती आहे.
समाप्त
*©® स्वाती बालूरकर, सखी*
दिनांक ३१.०३.२०२६
*©® स्वाती बालूरकर, सखी*
दिनांक ३१.०३.२०२६
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
