घटस्फोटानंतर काय ?
शीर्षक - विसंगती भाग २
श्वेताने शनिवारी विषय तिथेच बंद केला पण रविवारपासून रोज काम झाले की त्या समोरच्या बाल्कनीत बघायची. तो वाळत घातलेला पांढरा टॉप किती सुंदर होता, बाजूची काळी जीन्स आणि ते भारीचे स्लीप वेअर! काय कमी असेल तिला? का मरावं वाटलं असेल?
ऑफिसातून आल्यावरती पुष्पाला हळूच विचारायचं ,"काही कळलं का ग ?काय झालं ?"
ऑफिसातून आल्यावर बाल्कनीत पाहून विचार यायचा, ते घर सील केलं असेल का ? नवऱ्यावर केस झाली असेल का? खरच तो दोषी होता का? की ती मुलगीच संतापी होती? पण इतकं मरण्यासारखं काय झालं असेल?
तिच्या मनातले प्रश्न संपता संपत नव्हते.
इतक्यात पुष्पा आली. "काम झाले आहे मॅडम, येते. काय सारखं त्या बाल्कनीत पाहता हो?"
" अगं,तिकडे पाहिलं की ती बाई आठवते मला. तिने त्या दिवशी कोणाला बोलावलं असतं तर ती वाचली असती की काय असं वाटतं मला. शेवटी ते भाडेकरूच ना. पुन्हा ते घर . . रिकामे करणार, नवीन भाडेकरू येणार . . . म्हणजे हे कळाल्यावर ते घर कोणी भाड्याने घेईल का ?"
" काय मॅडम तुम्ही! जाऊ द्या. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी मॅडम! आमचा नवरा तर कधी कधी कमवत नाही, जर काही दिवस कमावले तर घरी पैसे देत नाही, थोडा बहुत घरात खर्च करतो आणि पिऊन येतो. संध्याकाळी गोंधळ करतो. त्या बाईसारखं मी मरायचं ठरवलं असतं तर माझे लेकरं उघड्यावर पडले नसते का? चार घरी काम करते, माझे तीन पोरं उभे केले. आता हे सगळं श्रीमंतीचे चोचले आहेत. या लोकांना मरण स्वस्त झालं आहे दुसरं काय!" पुष्पा निघून गेली.
श्वेताच्या डोक्यात अजूनही तोच विचार चालू होता. पुष्पा म्हणते तसे असेल तर ही आयुष्याची किती विसंगती आहे, पैसा नसणारी माणसं इतक्या त्रासात संघर्ष करत जगतात , गावातून शहरात येऊन मजुरी करतात आणि पैसा असणारे कुठल्याही क्षणी क्षुल्लक गोष्टीसाठी जीव द्यायला तयार असतात.
मनात आलं, पैसे असेल पण संवाद नसेल का नवरा बायकोत ? तिची कुणी मैत्रिण, शेजारी वगैरे कुणी नसतील का आजूबाजूला की कुठे बोलली असती तर मोकळी झाली असती. ती व्यक्त झाली असती तर काय झालं असतं? हो, तर ती वाचली असती.
आता मात्र या विचाराने ती आतून पार ढवळून निघाली होती.
आता मात्र या विचाराने ती आतून पार ढवळून निघाली होती.
गेल्या पाच सहा वर्षात तिच्या पण आयुष्यात असे प्रसंग आले होते. सोहनशी तिचं कडाक्याचं भांडण झालं होतं , एकदा तर ती रुसून माहेरी निघून गेली होती. . . पण असं नवऱ्याशी भांडण झालं म्हणून बायको जीव कशी देते? हा तिच्या मनातला प्रश्न अनुत्तरीतच राहिला!
आज श्वेता आपल्या बाल्कनीत उभी राहून ती न पाहिलेली सुंदर देखणी तरुणी मरण्यापूर्वी तो शुभ्र पांढरा टॉप आणि ब्लॅक जीन्स मध्ये कशी दिसत असेल याची कल्पना करू लागली. क्रमशः
आज श्वेता आपल्या बाल्कनीत उभी राहून ती न पाहिलेली सुंदर देखणी तरुणी मरण्यापूर्वी तो शुभ्र पांढरा टॉप आणि ब्लॅक जीन्स मध्ये कशी दिसत असेल याची कल्पना करू लागली. क्रमशः
