Login

विचार करा आणि मार्ग शोधा

साधारणपणे ९० टक्के माणसं ही सामान्य असतात.......
साधारणपणे ९० टक्के माणसं सामान्य असतात. त्यातील ८० टक्के सामान्य माणसांचं आयुष्य हे सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करण्यात आणि तिचा सामना करण्यातच जातो. त्यामुळे तो आजूबाजूचा परिसर फारसा पाहत नाही व त्यातील सूख भोगू शकत नाही. त्यामुळे मरणाची वेळ जवळ येते तेव्हा पश्चात्ताप करण्याची वेळ येते. परंतू यापैकी १० टक्के माणसं मात्र आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून सभोवतालच्या निसर्गाचा व त्यातील सुखांचा आस्वाद घेताना दिसतात.तेव्हा अगदी गरज असेल तेव्हाच विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर माणसाला योग्य तो वेळ मिळून तोही सूख भोगू शकतो. त्यासाठी त्याला आवश्यक परिस्थितीची निवड करायला शिकलं पाहिजे. त्यासाठी प्रथम अवास्तव अपेक्षा आयुष्याकडून ठेवणं कमी करावं लागेल.

भावनांचा विचार मर्यादित केला व वास्तवाचा म्हणजेच व्यवहाराचा विचार केला तर हे शक्य होईल.त्यामुळे विचार करा आणि मार्ग शोधा ही नीती जास्त वापरु नये. तसंच आपण संसारी माणूस म्हणून जन्माला आलो असून उगाचच, भक्तिमार्ग , अध्यात्म यांच्या मागे लागू नये.ऐहिक सूख मिळवण्याचा प्रयत्न करावा.अध्यात्माचे

मोठमोठे आकडे पाहण्यात काहीच अर्थ नाही. याचा अर्थ नेहमी स्वार्थच साधावा असं नाही. जमेल तेवढी मदत दुसऱ्याला ही करायला हवी. त्यासाठी धर्मशास्त्राची मदत घ्यायची गरज नाही. आपण जर सामान्य आहोत तर इतर सामान्य माणसांबद्दल आपल्याला दया असायला हवी.स्वत:ला उगाचच मोठे समजू नये. माझ्यात असलेले गूण इतरांमध्ये ही सापडतील, यांची जाणीव ठेवावी.एकूण सर्वांचेच जीवन सुरळीत व्हावं यासाठी झटलं पाहिजे. एखाद्या आदर्शासारखे होण्याचा प्रयत्न करु नये. कारण तो आदर्श म्हणून जन्माला आलेला असतो.या जगात आपलं अस्तित्व सुखमय व्हावं म्हणून जरुर प्रयत्न करावा. मग आपल्याला प्रसिद्धी मिळो अथवा न मिळो. दुसऱ्याला मिळालेले लाभ आपल्याला मिळालेच पाहिजेत असा आग्रह धरु नये. त्यासाठी तो कोणती किंमत देत असेल हे आपल्याला माहीत नाही. आणि जगात प्रत्येक कर्माची किंमत द्यावीच लागते हेही लक्षात ठेवावं.

अरुण कोर्डे

©®9004808486

थोडं सौजन्य हवं
"""""""""""""""""""""

वर्तमानपत्रात हॅंडबिलांच्या स्वरूपात जाहिराती सापडणं,ही नवीन गोष्ट नाही. ही पद्धत साधारणपणे १९७० मधे चालू झाली असावी. कारण आमच्या कडे वर्तमानपत्र साधारण १९६४/६५ साली यायला लागलं. काही का असेना पेपरातील या जाहिराती मी न वाचता चोळामोळा करून आत्ता आत्तापर्यंत फेकीत असे. बऱ्याच वेळा न वाचताच टरकावूनही फेकीत असे.कदाचित बरेच लोक असं करीत असतील. परंतू एक दिवस असा उजाडला. अतिशय उत्तम पेपरावर छापलेली रंगीत जाहिरात मी टरकवायला घेतली आणि काहीतरी वाटून मी ती व्यवस्थित घडी घालून,पण न वाचताच फेकली. त्यावेळी माझ्या मनात आलेला विचार फार महत्त्वाचा ठरला. विचार असा की कोणीतरी आपलं डोकं वापरून जाहिरातीचा मसुदा तयार केला असेल. कोणीतरी उत्तम व आकर्षक छपाईचे कष्ट घेतले असतील. कोणीतरी हे सगळं करून देणाऱ्याला पैसे अथवा पगार दिला असेल.मग त्यांच्या मेहनतीची थोडीतरी किंमत ठेवून घडी घालून तरी ती जाहिरात का टाकू नये ? माझं विचारचक्र चालू झालं. मी जाहिरात कशी फेकली,हे पाहायला कोणीही येणार नव्हतं. पण माझी संवेदनशीलता जागी झाली.
मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत असे निष्ठुर पणे वागतो. नुसते वागतच नाही तर काही वेळा काही गोष्टींवर त्वरीत न आवडणारी प्रतिक्रियाही देतो.स्वत:ला वादात ओढूनही घेतो.
थोडं आपण सौजन्याने वागलो तर काय बिघडणार आहे ? मला वाटतं बऱ्याच लहानसहान व्यवहारांच्या बाबतीतही आपण असेच निर्दयपणे वागतो.फार काय एखाद्याने आपल्यासाठी काही केलं कोणतीही सेवा दिली तरी आपली प्रतिक्रिया मनातूनही आणि जनातही खूप वेळ अशीच असते. " त्यात काय आपण पैसे देतोय" काही वेळा तर अशी सेवा अगदी हळुवारपणे व कमी पैशातही दिलेली असते. पण माणुसकीचा वाराही लागू न देता आपण काहीतरी शेरा मारुन मोकळे होतो. तोंडावर नाहीतर मागे तरी. आमच्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत का हा प्रश्न मला तरी पडतो.

अरुण कोर्डे
©®
९००४८०८४८६
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →