Login

वेगळं राहा (भाग:-१)

सगळं काही सुरळीत चालू असताना आई शारद मुलांना वेगळं राहा म्हणून का सांगते ? जाणून घ्या या कथेत..

शीर्षक:- वेगळं राहा

भाग:-१

"आई, तू आम्हाला बोलवलंस?" मोठा मुलगा सुमेशने आई शारदाला विचारले.

"काय झालं, आई? सगळ्यांना एकसाथ का बोलवलंस तू?" मधला मुलगा विजयने तिला विचारले.

"हा आई, मलाही हाच प्रश्न पडलाय. सगळं ठीक आहे ना? काय बोलायचे आहे तुला?" तिसरा मुलगा संतोषने विचारले.

"आई, सगळे जमले आहेत तर पटकन सांग ना आता काय झालंय?" शारदाची शेंडेफळ पुष्पानेही विचारले.

"हम्म, सगळं सांगते. जरा धीर धरा. बसा खाली." शारदा सगळ्यांकडे एक नजर टाकत म्हणाली.

"तुमच्या बायकांनाही येऊ द्या आणि पुष्पा, जावईबापूनांही बोलवं पटकन." शारदा आपल्या तिन्ही मुलांकडे आणि मुलगी पुष्पाकडे पाहत खाली चटईवर बसत म्हणाली.

सुमेशची बायको शोभा, विजयची बायको शशिकला, संतोषची बायको सुमन व  पुष्पाचा नवरा सुनिल सगळं एक एक करून आले आणि तिच्यासमोर बसले.

"काय झालं, आत्या असं अचानक सगळ्यांना का बोलवत तुम्ही? सगळं ठीक आहे ना?" शोभाने काळजीने तिला विचारले.

"हो, सगळं ठीक आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्र बोलावून घेतले." शारदा सर्वांकडे एक थंड नजर फिरवत म्हणाली.

तिच्या नजरेत ठामपणा बरोबरच एक करारीपणाही दिसत होता.

तिच्या त्या थंड नजरेने सर्वांनाच कापरं भरलं.

"तुम्हा चारही मुलांना लहानाचं मोठं केलं, परिस्थिती नसतानाही तुम्हाला शिकवलं, तुम्हीही तुमच्या परीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिलात, माझ्या कष्टाचे चीज झाले याचा आनंद आहे मला. त्यात तुम्ही तिघेही निर्व्यसनी, संस्कारी आहात. याचाही समाधान आहे." शारदा आनंदाने सर्वांकडे पाहत म्हणाली.

"हो आई, यात तुझे कष्ट आणि तुझे संस्कार खूप महत्वाचे आहेत. बाबा नसतानाही तू ज्या धाडसाने उभी राहिलीस, शून्यातून विश्व निर्माण केलेस, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तू एक आदर्श व्यक्तिमत्व आहेस. तुझ्याकडूनच सगळं शिकलो आम्ही." सुमेश तिच्याजवळ सरकून बसत तिचा हात हातात घेत कातर स्वरात म्हणाला.

त्याच्या बोलण्यावर बाकी तिघांनी माना हालवल्या.

"हम्म, तुम्हाला माझ्या कष्टांची जाण आहे यातच सगळं आलं. आता मेन मुद्द्यावर येऊ. तुम्हा सगळ्यांची लग्न झाली आहेत. सध्या तरी सगळं काही सुरळीत छान चालू आहे, हे चांगलंच आहे. आजपर्यंत तुम्ही चौघे एकमेकांना समजून घेत खेळीमेळीने राहत आहात. शेवटपर्यंत असेच राहावं  असे मला वाटते. पण.." शारदा बोलता बोलता मध्येच थांबली.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसू लागले. सुना आणि जावईही कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे पाहू लागले.

"पण काय, आई?" सुमेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने आवंढा गिळत विचारले.

"तुम्ही वेगळं राहा." शारदाने शब्दरूपी बॉम्ब टाकला.

क्रमशः-

सगळं चांगलं असताना शारदा का मुलांना वेगळं राहा म्हणून सांगतेय? जाणून घ्या पुढच्या भागात..

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →