Login

वाताहत भाग .. २

पैश्याच्या मोहामुळे झालेली आयुष्याची वाताहत.
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय : खरा गुन्हेगार
शीर्षक : वाताहत

“विचारलं का अजिंक्याला? काय म्हणाला तो? सांगितली का एखादी इन्व्हेस्टमेंट स्कीम?” प्रतिक ऑफिसमधून आल्या आल्या समिधाने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

“तुला धीर आहे की नाही. अशा गोष्टी वेळ, काळ बघून निवांतपणे बोलायच्या असतात. घाईघाईत अशी कामं करून चालत नाही. आज मी प्रचंड बिझी होतो, अजिंक्यही कामात होता. आमची भेट झाली नाही.” प्रतिक समिधावर चिडला.

“तुझ्याकडून एक काम धड होणार नाही. आज विचारतो, उद्या विचारतो करत आठवडा घालवला. मी बोलू का पूजाशी?” समिधा वैतागून म्हणाली.

“पैसा पुरत नाही, भागत नाही अशी कटकट करण्यापेक्षा तू नोकरी का शोधत नाहीस? पूजाशी बोलायचे असेल तर जॉब बद्दल विचार. नुसता रिल्स बघत टाईमपास करण्यापेक्षा वेळचा सदुपयोग कर.” रोजच्या कटकटीला कंटाळलेल्या प्रतिकचा आवाज वाढला होता.

“माझ्या जॉबचं काय काढलंस नवीन? जॉब केला तर मुलांची गैरसोय होईल, त्यांना कुठे ठेऊ? मुलांची आबाळ होऊ नये म्हणून मी पूर्णवेळ घरीच रहायचं ठरवलंय ना आपण?” प्रतिकच्या बोलण्याने समिधा नाराज झाली.

“आता लगेच नाही. जून पासून दोघांच्या शाळा दुपारी होतील त्यावेळी तू काही तरी करू शकतेस. नोकरी नसेल करायची तर ट्यूशन्स घे.”

“म्हणे ट्यूशन्स घे! काहीही काय?” समिधाला आपल्या दोन मुलांचा अभ्यास घेताना घाम फुटत होता त्यामुळे तिने ट्यूशन्सचा पर्याय फेटाळून लावला.

कधीच नोकरी केली नसल्याने समिधाकडे अनुभव नव्हता. अनुभव नसल्याने कमी पगाराच्या नोकरीच्या संधी चालून येत होत्या. तिकडे नोकरी करणे तिला कमीपणाचे वाटत होते. ज्वेलर्स शॉप, सुपर मार्केटमध्ये काउंटर स्टाफ म्हणून नोकरी केली तर लोक काय म्हणतील? माहेरी आपलं हसं होईल, नातेवाईकांत बऱ्याच बढाया मारून ठेवल्या असल्याने समिधाला भीती वाटत होती.

कष्ट करायची समिधाची तयारी नव्हती; तिला इजी मनी हवा होता.

“मला सल्ले देण्यापेक्षा तू काही तरी हातपाय हलव. जरा डोळे उघडून आजूबाजूला बघ. तुझे मित्र कुठल्याकुठे गेलेत. तू मात्र आहेस तिथेच आहेस.” समिधाने प्रतिकची कानउघडणी केली.

‘एखादा साइड बिझनेस करायचा म्हटलं म्हणजे भांडवल नको का? आणि नाही चालला व्यवसाय तर लाखाचे बारा हजार होतील ते वेगळंच. खरं तर समिधाने हात आखडता घेतला, थोडी काटकसर करून बचतीचा मार्ग अवलंबला तर आहे त्या उत्पन्नात व्यवस्थित भागेल. चार पैसे गाठीशी राहतील पण समिधाला समजावणार कोण? ’ प्रतिक विचारांच्या गर्तेत हरवला होता. समिधाच्या मागण्या पूर्ण करता करता तो थकून गेला होता.

“आपण अजिंक्य आणि पूजाला या रविवारी घरी जेवायला बोलवूया का? बरेच दिवसात भेट झाली नाही. ते घरी आले तर निवांत बोलता येईल. पूजाला फोन करते.” अचानक गप्प झालेल्या प्रतिककडे पहात समिधा म्हणाली.

“घाई करू नकोस, मी बोलतो त्याच्याशी. अजूनही एक दोन ठिकाणी चौकशी करतो.” प्रतिकने सबुरीचा सल्ला दिला आणि कूस बदलत विषय संपवला.

‘ह्याच्या कडून काहीच होणार नाही. मलाच काहीतरी करावे लागेल’ प्रतिकने झोपेचे सोंग घेतल्याने समिधाला नाईलाजाने गप्प बसावे लागले.

अजिंक्याशी कसे बोलावे या विचारात असतानाच प्रतिककडे आयती संधी चालून आली. अजिंक्यने डब्बा आणला नव्हता.

“चल आपण एकत्र लंच करू, कॅन्टीनमध्ये खाण्यापेक्षा बाहेर जाऊ. मी पण टिफीन आणला नाही आहे.” प्रतिक अजिंक्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला जबरदस्तीने बाहेर घेऊन गेला.

“महागाई किती वाढली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, होमलोनचे हप्ते भरण्यातच माझा सगळा करण सगळा पगार खर्च होतो. हातात काहीच राहत नाही. तू कसं काय जमवूून आणतोस सगळे? कुठे गुंतवणूक करतोस ते सांग? मला जरा सल्ला दे.” जेवण करता करता प्रतिकने मुद्दाला हात घातला.

“पैसा भरपूर आहे, रिस्क पण तेवढीच आहे, तयार असशील तर बोल. पण माझं नाव कुठे यायला नको. तशीही माझी लवकरच बदली होणार आहे. नवी मुंबई, पनवेल साईटवर मला जावं लागणार आहे. समोरची पार्टी एका खात्रीशीर माणसाच्या शोधात आहे. तुझे नाव सुचवतो त्यांना.” अजिंक्य ठामपणे प्रतिकच्या नजरेला नजर देत म्हणाला.

“काम काय आहे? कामच स्वरूप?” अजिंक्यच्या बोलण्याने प्रतिक गोंधळून गेला.

अजिंक्य इकडेतिकडे बघत प्रतिक्रच्या कानात हळूच कजबुजला. त्याच बोलणे ऐकून एसी हॉटेलमध्ये असूनही प्रतिकला दरदरून घाम फुटला.

अजिंक्य प्रतिकला लाच घ्यायला सुचवत होता.

समोर अमाप पैसा दिसत होता त्याकडे जाणारा मार्ग मात्र सद्सद्विवेकबुद्धीला पटत नव्हता.

प्रतिक पूर्णपणे हादरला होता. द्विधा मनस्थितीत सापडला होता.

क्रमशः

©मृणाल महेश शिंपी.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →