Login

वाताहत भाग .. ३

पैश्याच्या मोहामुळे झालेली आयुष्याची वाताहत.
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय : खरा गुन्हेगार
शीर्षक : वाताहत

“अरे एवढा कसला विचार करतो आहेस?” ताटातलं अन्न नुसतंच चिवडत बसलेल्या प्रतिककडे पाहत अजिंक्य म्हणाला.

“इतके वर्ष इमानेइतबारे नोकरी केली. हे असं काही करायला मन धजावत नाही.” प्रतिक भावनाविवश झाला होता.

“कंपनीची फसवणूक कर असे कोण म्हणतंय तुला? आपण फक्त समोरच्या पार्टीचे नाव सुचवायचे. ह्यांच्याकडून मटेरियल घेतलं तर स्वस्त पडेल; कमी किमतीत उच्च दर्जाचा माल मिळेल शिफारस करत फाईल पुढे सरकवायची. डील फायनल होताच कमिशन आपल्या खात्यात जमा.” अजिंक्यने थोडक्यात सगळी प्रोसिजर समजावली.

प्रतिकचा अजूनही निर्णय होत नव्हता.

“पैसा हवा असेल तर वाट वाकडी करावीच लागते. सरळ मार्गाने पैसा मिळत नाही. तू नाही केलंस तर दुसरा कोणीतरी तयार होईल. मी आता ह्या प्रोजेक्टचा भाग नाही. साहेब तुझ्याजागी खात्रीचा माणूस दे म्हणून कधीचे मागे लागले आहेत. माझ्या डोळ्यासमोर तूच होतास. तुझ्याशी या बाबतीत बोलणार होतो, तेव्हड्यात तूच विषय काढलास. नीट विचार कर आणि सांग परत अशी संधी मिळणार नाही. तुझी तयारी असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी तुझी ओळख करून देतो.” अजिंक्य प्रतिकला फोर्स करत होता.

प्रतिकला वाटल होतं अजिंक्य ऑनलाईन गेम खेळत असेल किंवा शेअर बाजारात इन्व्हेस्ट करत असेल. त्याच्याकडे एखादी झटपट रक्कम दुप्पट होणारी योजना असेल. तो अशाप्रकारे कमिशन खात असेल हे त्याच्या गावीही नव्हतं त्यामुळे सरळ मार्गाने चालणारा प्रतिक बावराला होता.

“एक दोन दिवसात सांगतो तुला.” बिल चुकतं करत बडीशेप तोंडांत टाकत प्रतिक उत्तरला. लंच टाईम संपत आल्याने त्या दोघांना विषय आवरता घ्यावा लागला होता.

ऑफिसमधून घरी आल्यावर प्रतिकने समिधाला सगळी हकीकत सविस्तर सांगितली.

“तो असले धंदे करत असेल वाटलंच होतं मला.” समिधा मानेला झटका देत म्हणाली.

“आपण पण तेच करायचं? समोरचा चुकीचा वागतो हे कळत असूनही त्याच मार्गाने जायचं?” प्रतिकने खंत व्यक्त केली.

“काय हरकत आहे? हल्ली सगळेच हे करतात. शून्य गुंतवणकीमध्ये पैसा कमवायचा राजमार्ग आहे हा.” समिधा प्रतिकने अजिंक्याच्या पाऊलवर पाऊल ठेऊन चालावं या मतावर ठाम होती.

प्रतिकची मात्र दोलायमान स्थिती झाली होती. तो कुठल्याच निर्णयापर्यंत पोहोचू शकत नव्हता.

“मला जमेल ना?” प्रतिकच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“न जमायला काय झालं? तो तुला ज्युनिअर असून त्याला जमू शकत मग तुला का नाही. त्याच्यापेक्षा तुला जास्त अनुभव आहे.” समिधा प्रतिकचे मनोबल वाढवत होती.

“आपले खूप प्रॉब्लेेम सुटतील, लोन क्लिअर होईल. मनासारखं इंटिरिअर करता येईल. मुलांच्या भविष्याची तरतूद करता येईल. जरा ऐशोआरमात जगता येईल, गावी पैसे पाठवता येतील.” समिधाच्या डोळ्यासमोर कोऱ्या, करकरीत नोटा नाचत होत्या.

“कायम ह्याच मार्गाने जा कोण म्हणतंय तुला? सध्या पैशाची गरज आहे म्हणून फक्त काही दिवस. एकदा का आपलं कर्ज फिटलं की तू ठामपणे नकार दे समोरच्या पार्टीला.” समिधा शर्थीचे प्रयत्न करत प्रतिकला समजावत होती.

फक्त काही दिवस…ही गोष्ट प्रतिकच्या मनाला पटली. समिधा प्रतिकचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी झाली.

पैशाचा मोह अनावर झाला. “मी तयार आहे” त्याने अजिंक्यला मेसेज केला.

“गुड डिसिजन. उद्या भेटल्यावर पुढच्या तयारीला लागू.” अजिंक्यने लागलीच रिप्लाय केला.

समिधा उज्वल भविष्याची सुखस्वप्न पहात लवकरच गाढ झोपली. तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.

प्रतिकच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. तो छताकडे पाहत निर्विकारपणे पडून राहिला. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य, या विचारात तो रात्रभर तळमळत राहिला; कितीही प्रयत्न केला तरी त्याला झोप येईना.

क्रमशः…

©मृणाल महेश शिंपी

प्रतिक या सगळ्यात गुरफटत जाणार की काही दिवसांतच परतीचा मार्ग स्वीकारणार — हे मात्र येणारा काळच ठरवणार होता.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →