जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय : खरा गुन्हेगार
शीर्षक : वाताहत
विषय : खरा गुन्हेगार
शीर्षक : वाताहत
“अजिंक्यने पूजाला व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून नवीन आयफोन घेऊन दिला.” समिधाने तोंड वाकडं करत प्रतिकला म्हणाली..
“अरे वा! छान!” प्रतिकच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
“कौतुक कसले करताय.” समिधा चिडून म्हणाली.
“मग काय करू? तुझ्या सारखा त्रागा करू? घेतला आयफोन तर घेऊ देत. आपल्याला काय करायचे आहे?” प्रतीक चिडून म्हणाला.
“गेल्या वर्षी स्वतःच घर त्यानंतर लगेच गाडी, दिवाळीत अंदमान ट्रिप, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन गोव्यात आणि आता आयफोन. मी म्हणते परवडत तरी कसं?” समिधाने शंका उपस्थित केली.
“न परवडण्यासारखे काय आहे त्यात? ते दोघे कमवतात आणि फोन काय ईएमआय वर घेतला असेल.”
“पूजा एका डेंटिस्टकडे रिसेप्शनिट आहे, तीही अर्धवेळ. तिला असा कितीसा पगार असणार?” समिधा त्रासिक स्वरात म्हणाली.
“नक्की कशाचा त्रास होतोय तुला? काय चालू आहे तुझ्या डोक्यात. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळू नये.” प्रतीक समजावणीच्या सुरात म्हणाला.
प्रतिक आणि अजिंक्य एकाच कंपनीत कामाला होते. दोघांना पगारही साधारण सारखाच होता. अजिंक्य प्रतिकला ज्युनिअर असून गेल्या दीड दोन वर्षात त्याच्या लाइफस्टाईलमध्ये कमालीचा फरक पडला होता. राहणीमानाचा, खर्चाचा आलेख उंचावला होता.
पगार जवळपास सेम असून जे अजिंक्य आणि पूजा अफोर्ड करू शकतात ते आपण का करू शकत नाही, याचा समिधाला त्रास होत होता.
ऑफिस स्टाफच्या फॅमिली गेट टू गेदरच्या वेळी पूजा आणि समिधाची ओळख झाली होती. फोन नंबरची देवाणघेवाण झाली. दोघी एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करू लागल्या. पूजाला कुठे गेलो, काय खरेदी केली छोट्यात छोटी गोष्ट पोस्ट करायची सवय होती त्यामुळे प्रत्यक्षात भेट होत नसली तरी अजिंक्य, पूजाच्या आयुष्यात काय चालले आहे याची बित्तंबातमी समिधाला कळत होती.
तसं समिधा आणि प्रतिकच्या संसारात सुद्धा कशाची कमी नव्हती. तीन खोल्यांचं स्वतःच सर्व सोयीसुविधांनी युक्त घर होतं. टू-व्हीलर होती. एक मुलगा, एक मुलगी परिपूर्ण कुटुंब होतं. प्रतिकच्या वडिलांना पेन्शन होती त्यामुळे आईबाबा त्याच्यावर अवलंबून नव्हते, गावी नियमित पैसे पाठवावे लागत नव्हते. एकंदरीत प्रतिकच्या पगारात त्याचं व्यवस्थित भागत होतं.
आहे त्यात समाधान मानावं ही समिधाची वृत्ती नव्हती. सतत समोरच्याची तुलना करायची, त्यांच्याकडे असलेली गोष्ट आपल्याकडे नाही म्हणत चिडचिड करायची तिला सवय होती.
मागच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन गिफ्ट फ्रॉम हबी पूजाने स्टोरी टाकली. ते पाहून समिधाची मूळ जळावू वृत्ती उफाळून आली. तिने प्रतिककडे कटकट करायला सुरवात केली.
“तुझा फोन चांगला आहे की कशाला हवा तुला आयफोन? वर्षभर तरी हाच वापर. हा खराब झाला की घेऊ तुला पण आयफोन” प्रतिक वैतागून म्हणाला.
“प्रश्न नुसत्या आयफोनचा नाही आहे.”
“मग कशाचा आहे?” समिधाच्या बोलण्याने प्रतिक पुरता गोंधळून गेला.
“सतत आपलं लंच, डिनर, खरेदी, आउटिंग जमतं तरी कसं? हा मूळ मुद्दा आहे.”
“ती दोघं अजून सडेफटिंग आहेत. मुलांची जबाबदारी नाही म्हणून जमतं सगळं. आपल्याला मुलांच्या शाळा, अभ्यासाच्या शेड्युल नुसार प्लॅन करावे लागतात. ऊठसूठ बाहेर जाता येत नाही. मे महिन्यात आपणही जाऊ कुठेतरी.” चिडलेल्या समिधाला समजावत प्रतिक म्हणाला.
“प्रश्न वेळेचा नाही तर पैशाचा आहे. एवढे पैसे आणतात कुठून?”
“कुठून का आणेना! आपल्याकडे मागत नाहीत झालं तर मग.” प्रतिकने विषय आवरता घेत मोबाईल हातात घेतला.
“मला वाटतं अजिंक्य एखादा साईड बिझनेस करत असेल. त्यातून जास्तीचे पैसे मिळत असतील किंवा कुठल्या तरी जास्त व्याजदर मिळणाऱ्या, झटपट रक्कम दुप्पट होणाऱ्या स्कीममध्ये पैसे गुंतवले असतील. एकदा विचार ना तुझ्या मित्राला. आपण पण त्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करू.” समिधा स्पष्टपणे बोलली.
समिधाच्या बोलण्याने प्रतिक विचारात पडला.
कडक इस्त्रीचे महागातले कपडे, ब्रँडेड शूज, गॉगल्स, अजिंक्यचे क्लासी रहाणीमान त्याच्या डोळ्यासमोर आले. जास्तीचे पैसे मिळाले तर कोणाला नको असतील? प्रतिकच्या डोक्यात
ॲडीशनल इन्कमचा किडा वळवळू लागला.
ॲडीशनल इन्कमचा किडा वळवळू लागला.
क्रमशः
