Login

वाताहत भाग .. ४

पैश्याच्या मोहामुळे झालेली आयुष्याची वाताहत.
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय : खरा गुन्हेगार
शीर्षक : वाताहत

दुसऱ्या दिवशी समिधा चहा, नाष्टा, मुलांच्या शाळेची तयारी, प्रतिकचा डब्बा सकाळची सर्व कामे गाणं गुणगुणत उत्साहात करत होती.

प्रतिक मात्र संथपणे आपलं आवरत होता. मनावर आलेलं दडपण लपवू शकत नव्हता.

“सगळं नीट होईल. टेन्शन घेऊ नकोस. दडपणाखाली वावरलास तर ऑफिसमध्ये कोणालातरी शंका येईल.” डब्बा प्रतिकच्या हातात देत समिधा म्हणाली.

तिला हसून प्रतिसाद देत, डब्बा बॅगेत ठेवत प्रतिक घराबाहेर पडला.

ठरल्याप्रमाणे अजिंक्य त्याची स्टेशनजवळील कॅफे बाहेर वाट बघत होता.

“हे मिस्टर जगदाळे फ्रॉम आर. के. सन्स” कॅफेत वाट बघत बसलेल्या जगदाळे साहेबांची ओळख करून देत अजिंक्य म्हणाला.

जगदाळ्यांनी फाईल प्रतिक्रकडे सपूर्त केली. थोडा वेळ कामांबाबत चर्चा झाली. कमिशनचे पर्सेंटेज फायनल झाले. मुद्द्याचे बोलणं झाल्यावर पुढ्यातील कॉफी संपवून सगळे आपापल्या मार्गाला लागले.

ऑफिसमध्ये गेल्यावर प्रतिकने फाईल तपासली. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि दुपारी फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सहीसाठी पाठवली.

“तू खात्री करून घेतली आहेस ना. क्वालिटी, क्वांटिटी तपासली आहेस ना. रेट जास्त असला तरी चालेल पण निकृष्ट दर्जाचा माल नको.” श्रीकांत सर फाईलमधील पेपर चाळत म्हणाले.

“ हो, सर मी स्वतः खात्री केली आहे.” प्रतिक आत्मविश्वासाने बोलला.

“आता अजिंक्य नसेल. तो बाहेरगावचे प्रोजेक्ट हँडेल करेल. या लोकल रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा इन्चार्ज तू असशील. जबाबदारीने काम केलेस तर प्रमोशन नक्की.” सरांनी अमिष दाखवत सही करून फाईल प्रतिकच्या हातात दिली.

केबिनच्या बाहेर येताच प्रतिकच्या चेहरा खुलला, दोन दिवसांपासूनचा ताण क्षणार्धात मावळला.

जे काम याआधी तो करत होता तेच त्याने केले होते. आधी फक्त पगार मिळत होता आता त्या बरोबर अँडीशनल मोबदला देशील मिळणार होता.

‘मी उगाच एवढा बाऊ केला’ शीळ घालत ऑफिसच्या बाहेर पडणाऱ्या प्रतिकच्या मनात विचार आला.

“थॅन्क्स अजिंक्य.” भारावून जाऊन त्याने अजिंक्याला फोन लावला.

“बस का यार.” मैत्रीखातर केलं अशा बतावणी अजिंक्य करत असला तरी खात्रीचा माणूस दिल्याचा मोबदला त्याला मिळाला होता.

दोन दिवसांनी कमिशन अमाऊंट बँकेत जमा होता प्रतिकचा आत्मविश्वास अजूनच बळावला. तो सराईतपणे वावरू लागला.

त्याचा उजळलेला चेहरा पाहून ऑफिसमध्ये काय घडलं ते समिधा न सांगताच समजून गेली. तिने लागलीच सेलिब्रेशनची तयारी सुरू केली. ती सगळी त्या दिवशी आलिशान हॉटेलात जेवायला गेली.

पुढच्याच महिन्यात घराच्या इंटिरिअरच काम सुरू झालं. सहा महिन्यांनी होम लोन क्लिअर झालं. पुढच्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समिधाकडे आयफोन आला. टू व्हीलर वरून फिरणारा प्रतिक फोर व्हीलर दिमाखात मिरवू लागला. समिधाच्या अंगावर सोननाणं दिसू लागलं. तीन चार वर्षात समिधा आणि प्रतिकचं रहाणीमान कमालीचं बदललं.

“लॉटरी लागली की काय?” नातेवाईक, मैत्रिणी हसत हसत समिधाला विचारू लागले.

नेहमी पैश्यासाठी रडणारा प्रतिक वरेमाप खर्च करू लागला. मित्रांना पार्ट्या देऊ लागला म्हंटल्यावर ऑफिसमध्ये देखील उलटसुलट चर्चा होऊ लागली.

“तू जो घोटाळा केला आहेस त्याची चर्चा जोरात चालू आहे. तुझ्याबद्दल कुजबुज चालू आहे. बरेच जण तुझ्या मागावर आहेत. कधी कधी आपलाच पैसा जपून वापरावा लागतो. नाहीतर तो समोरच्याच्या डोळ्यात येतो. तुझी बदलेली लाइफस्टाइल सहकाऱ्यांच्या डोळ्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस थांब. व्यवहार जरा जपून कर.” अजिंक्याच्या कानावर काही गोष्टी येताच त्याने प्रतिकला सजग केले.

“अरे म्हणजे जे तुझ्या बाबतीत घडलं तेच माझ्या बाबतीत घडतं आहे. कोणीतरी येईल विचारत तेव्हा मी तू मला जसं घोळात घेतलंस तसं मी ही घेईन.” प्रतिक बेफिकीरपणे म्हणाला.

“इतकं लाईटली घेऊ नकोस मित्रा. वेळीच सावध हो. काहींना पैश्यापेक्षा तत्व प्रिय असतात.” प्रतिकला मोलाचा सल्ला देऊन अजिंक्यने फोन ठेवला.

“काय झालं?” अजिंक्य आणि प्रतिकच्या संभाषणाचा रोख कळल्याने समिधा चिंतीत झाली होती.

“या आधीही असे एक दोनदा आरोप झाले होते त्यावेळी ऑडिटरला व्यवस्थित मॅनेज केले होतं. अंतर्गत तपासात काहीही सिद्ध झाले नव्हतं. या वेळी पण असंच होईल. तू यात पडू नकोस.” प्रतिकने समिधाला खात्रीपूर्वक सांगितले.

त्याच्या बोलण्याने समिधा काहीशी निश्चिंत झाली.

©मृणाल महेश शिंपी.

क्रमशः

प्रतिकचा निष्काळजीपणा पुढे त्याला गोत्यात आणणार का? पाहूया पुढील भागात.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →