Login

वाताहत भाग .. ५ अंतिम भाग

पैश्याच्या मोहामुळे आयुष्याची झालेली वाताहत
जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय : खरा गुन्हेगार
शीर्षक : वाताहत

“अरे काय बोलतो आहेस? झोपेत आहेस का?” एके दिवशी सकाळी प्रतिक आपल्या साईट सुपरवायझरवर ओरडत होता.

“सर, मी साईटवरच आहे. वॉचमनने फोन केल्यावर लगेच इकडे आलो. खात्री करून घेतली मगच तुम्हाला फोन केला. गुलमोहर सोसायटीचा मागचा स्लॅब कोसळल्याची माहिती तो प्रतिकला देत होता. त्याला साईटवर तात्काळ पोहोचायला सांगत होता.

निकृष्ट दर्जाचा माल वापरल्यामुळे गुलमोहर सोसायटीचा पहिल्या मजल्याचा भाग कोसळला होता. पहाटेच्या वेळीं सदर घटना घडली असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. वॉचमनही पुढच्या बाजूला शेकोटीजवळ बसला असल्याने त्यालाही कुठल्याही प्रकारची इजा झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांची कारवाई टळली; मात्र कंपनीच्या अंतर्गत चौकशीचा ससेमिरा प्रतिकच्या मागे लागला. यावेळी बाहेरच्या ऑडिट टीमला बोलावण्यात आले होते. प्रत्येक बिल आणि व्यवहाराची बारकाईने तपासणी सुरू झाली.

“ही घटना दिवसा, कामगार काम करत असताना घडली असती तर…? नशिबाने त्यावेळी कोणी साईटवर नव्हतं म्हणून आपण वाचलो. तुम्हाला बजावून देखील तुम्ही निकृष्ट दर्जाचा माल वापरला.” श्रीकांत सर संतापाने म्हणाले.

“सर, मी स्वतः खात्री करून ऑर्डर दिली केली होती.” प्रतिक खाली बघून बोलत होता. साहेबांच्या नजरेला नजर द्यायची हिंमत त्याच्यात नव्हती.

“पण रिपोर्ट तर काही वेगळंच सांगत आहेत.” एच. आर. मॅनेजर ऑडिट रिपोर्ट प्रतिकच्या समोर जोरात आपटत म्हणाले.

सुरवातीला प्रतिक क्वॉलिटी, क्वांटिटी जातीने स्वतः चेक करत होता. “सर इतके वर्ष सोबत काम करत आहोत. कधी खोट आली का मालात? मालाची प्रत्येक बॅच तपासात बसलात तर काम कसं व्हायचं? एवढा विश्वास नाही का आमच्यावर.” जगदाळेंच्या गोड बोलण्याला तो भुलला होता. जगदाळेंवर टाकलेल्या या आंधळ्या विश्वासाने आज त्याचा घात केला होता.

“सोसायटीतील रहिवासी चिडले आहेत, रहायला आलो नाही तर ही तऱ्हा, आम्ही रहायला आल्यावर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार? जाब विचारात आहेत. त्या विभागत आपले अजून दोन तीन रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहेत. सगळेच भांबावले आहेत. तुमच्यामुळे नाव खराब झालं जी.एम. कन्स्ट्रक्शनच.” प्रतिकच्या हातात निलंबन पत्र देत श्रीकांत सर म्हणाले.

“सर या सगळ्याची सुरवात अजिंक्यने केली. त्यानेच मला यात अडकवले.” प्रतिक धीर एकवटून म्हणाला.

“काहीही काय बोलताय तुम्ही? त्याचा काय संबंध. पाच वर्षापूर्वी अजिंक्य देशमुखांची बदली झाली विसरलात का? स्वतःच्या चूक दुसऱ्यावर ढकलू नका.” श्रीकांत सरांनी प्रतिकला खडसावले.

खाली मान घालून ऑफिसबाहेर पडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही. ॲडीशनल इन्कमचा मोह त्याला चांगलाच महागात पडला होता.

“तू मला यात अडकवलंस. खरा गुन्हेगार तर तू आहेस.” ऑफिसबाहेर पडताच प्रतिकने अजिंक्यला फोन लावला.

“माझा काय संबंध? झटपट पैसा कमवायचा मार्ग शोधत तू माझ्याकडे आला होतास, मी तुझ्याकडे नाही. मी तुला आधीच सर्तक केलं होतं पण तू कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतास.” अजिंक्यने स्पष्ट केलं.

पुरावा नसल्याने प्रतिक अजिंक्यच काहीच वाकडं करू शकला नाही.

“समिधा माझी नोकरी गेली. जगावंसच वाटत नाही.” प्रतिक पूर्णपणे खचून म्हणाला.

“काहीही काय बोलतेस? मुलांकडे बघ. आपल्या चुकांची शिक्षा त्यांना कशाला? जग तुला गुन्हेगार समजत असलं तरी खरी गुन्हेगार मी आहे, मी तुला या सगळ्यासाठी प्रवृत्त केलं. माझ्यामुळे आपल्या आयुष्याची वाताहत झाली.” प्रतिकचा हात हाती घेत समिधा म्हणाली.

“चूक माझीही आहे. मला देखील पैश्याच्या मोह झाला.” प्रतिकनेही आपली चूक मान्य केली.

आलेल्या अनुभवातून बोध घेत, प्रतिक आणि समिधाने नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. पैशाच्या मोहापेक्षा प्रामाणिकपणा आणि विश्वास अधिक महत्त्वाचा आहे, हे त्यांना उमगले.

चुका मान्य करून त्यातून शिकत त्यांनी जे आहे त्यात समाधान मानत साधं पण सन्मानाने जगण्याचा निर्धार केला.

समाप्त.

©मृणाल महेश शिंपी.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →