Login

वारसा पत्रांचा भाग १

वारसा पत्रांचा भाग १
वारसा पत्रांचा

भाग १

" ईशा, अगं किती वेळा सांगायचं तुला ? हे प्लास्टिकचे डबे फेकून देऊ नकोस. त्या डब्याना धुवून ठेवल् तर त्यात मसाले भरता येतात. आणि ही दुधाची पिशवी... अशी मधून का कापलीस ? नीट वरून कापायची म्हणजे ती धुवून वाळवून पुन्हा वापरता येते."

ईशाच्या कानात आजही सासूबाईंचे, म्हणजे विमलकाकूंचे ते शब्द जसेच्या तसे गुंजत होते. ईशाने वैतागून आरशासमोर उभे राहून आपले महागडे इअररिंग्स काढले. रागाने बेडवर फेकले.

" शिट्! मम्मा पण ना... प्रत्येक गोष्टीत एवढी कंजूसी का करायच्या कोणास ठाऊक ? पुण्यात एवढा मोठा फ्लॅट आहे.घरात दोन-दोन गाड्या आहेत, मुलगा आयटीमध्ये मोठ्या पदावर आहे, पण यांची ती मध्यम वर्गीय गरिबीची विचार सरणी काही जात नाही."

विमलकाकू जाऊन आता सहा महिने झाले होते. अनिकेतचे वडीलही आधीच गेले होते. आता ईशा आणि अनिकेत या प्रशस्त घरात राहत होते. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे ईशाने घराची आणि विशेषतः सासूबाईंच्या खोलीची साफसफाई करायचे ठरवले होते.

ती सासूबाईंच्या खोलीत शिरली. एक विशिष्ट वास होता त्या खोलीला चंदनाचा, सुकलेल्या फुलांचा आणि कपाटात ठेवलेल्या जुन्या नेसत्या साड्यांचा. ईशाने कपाट उघडले. सगळं कसं नीटनेटके! अगदी साड्यांच्या घड्याही मोजून-मापून घातल्यासारख्या.

"शिस्त म्हणजे मम्मा.. " ईशा स्वतःशीच पुटपुटली. पण ती शिस्त ईशाला नेहमीच जाचक वाटत आली होती. लग्नानंतरच्या पाच वर्षांत ईशाचे आणि सासूबाईंचे खटके फक्त या काटकसरीवरूनच उडायचे.

"मम्मा, हे जुने पडदे फेकून द्या आता. नवीन घेऊया," ईशा एकदा म्हणाली होती.

त्यावर विमलकाकू शांतपणे म्हणाल्या होत्या,
"अगं ईशा, रंग उडालाय फक्त, फाटले कुठे आहेत ? याचे छान पायपुसणे होतील बघ."

ईशाने तेव्हा कपाळावर हात मारून घेतला होता. तिला वाटायचं, हे मिडल क्लास मेंटॅलिटीचं लक्षण आहे.
साफसफाई करता करता ईशाचे लक्ष बेडच्या खाली असलेल्या एका लोखंडी ट्रंककडे गेले. ती ट्रंक ओढताना ईशाची बरीच दमछाक झाली. जुनं, गंजलेलं टाळं. ईशाने कपाटाच्या कोपऱ्यात शोधलं, तर एका लहान डब्यात तिला त्या ट्रंकची किल्ली सापडली. तिने टाळं उघडलं
एक कर्रर्र असा आवाज झाला, जणू तो जुना काळ ओरडून स्वतःचं अस्तित्व सांगत होता.

ट्रंक उघडताच ईशाच्या नाकात जुन्या कागदांचा आणि कसर लागलेल्या लाकडाचा वास शिरला. वर काही कापडी पिशव्या होत्या, ज्या विमलकाकूंनी जुन्या साड्यांपासून स्वतः शिवल्या होत्या. त्याखाली काही पितळी भांडी आणि सगळ्यात खाली एक पांढऱ्या रुमालात गुंडाळलेला कागदांचा पुडका.

ईशाने कुतूहलाने तो पुडका हातात घेतला. त्यावर एक सुतळी बांधलेली होती. ती सुतळी सोडवताना ईशाचे हात का कोण जाणे पण थोडेशे थरथरत होते. आतमध्ये भारतीय डाकची पिवळी पडलेली इनलँड लेटर्स आणि काही निळी पोस्टकार्ड्स होती. १९५०, १९५२, १९५८... अशा सालांचे शिक्के त्यावर अस्पष्ट दिसत होते.

ईशाने पहिले पत्र उघडले. वळणदार पण थोडे थरथरणारे अक्षर. ते पत्र विमलकाकूंच्या वडिलांनी, म्हणजे कोकणातील एका छोट्या वस्तीत राहणाऱ्या तात्यांनी लिहिले होते.

" प्रति,
लाडकी लेक विमल हिला अनेक आशीर्वाद...

विमल, तुझे पत्र मिळाले. वाचून समाधान झाले. तू सासरी सुखात आहेस हे ऐकून हायसे वाटले. पण पत्रात तू लिहीलंस की पुण्यात महागाई खूप आहे, चिंता करू नकोस गं ! इकडे यावेळेस भात शेतीचे उत्पन्न पावसाने पूर्णपणे नेले. पदरात काहीच पडले नाही. घराचे छप्पर गेल्या वादळात उडाले होते, ते नीट करण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढले आहे. तुझे आई-वडील आहोत आम्ही, तुला सांगू नये पण परिस्थिती कठीण आहे. या वर्षी दिवाळीला तुला घरी बोलवू शकणार नाही, रेल्वेचे भाडे परवडणारे नाही..."

ईशा वाचता वाचता थांबली. तिने कधीच विचार केला नव्हता की सासूबाईंची माहेरची परिस्थिती इतकी बेताची असेल. तिने दुसरे पत्र उघडले. हे पत्र १९६० सालातील होते.

" विमल, गण्या तुझा धाकटा भाऊ आता मॅट्रिक झालाय. त्याला पुढे शिकायची खूप ओढ आहे. पण गावात कॉलेज नाही. त्याला पुण्यात पाठवावे म्हणतोय. जावईबापूंना विचारशील का ? तो तुमच्या घरात एखाद्या घरात कोपऱ्यात कुठेतरी अडवा होईल. जेवणाचे म्हणशील तर तो खूप सोशिक आहे, चटणी-भाकरीवर सुद्धा दिवस काढेल. फक्त त्याचे शिक्षण थांबू नये एवढीच इच्छा. कर्ज डोक्यावर वाढले आहे, शेत विकायची पाळी आली आहे..."

ईशाच्या डोळ्यासमोर गण्या काका आले. आज पुण्यातले मोठे प्रथितयश स्ट्रक्चरल इंजिनिअर! त्यांच्या आलिशान बंगल्यात ते राहतात. पण त्यांच्या या यशाचा पाया विमलकाकूंनी आपल्या सासरी सोसलेल्या ओढाताणीत होता, हे ईशाला पहिल्यांदाच उमजत होते.

ईशाने पुढचे पत्र वाचायला घेतले. ते विमलकाकूंनी आपल्या वडिलांना पाठवलेल्या पत्राचा मसुदा असावा बहुधा.

" तात्या, गण्याला नक्की पाठवा. मी साहेबांशी  बोलले आहे. घराचा खर्च मी कमी करेन. माझ्या साडीचे पैसे उरवून मी त्याच्या पुस्तकांची सोय करेन. तुम्ही काळजी करू नका. मी इथे दुधाच्या पासून ते भाज्यांच्या देठांपर्यंत कशाचाही अपव्यय होऊ देत नाही. वाचवलेला प्रत्येक पैसा गण्याच्या भविष्यासाठी कामी येईल..."

ईशाच्या डोळ्यातून टपक्कन एक आसू त्या पिवळ्या कागदावर पडले. तिला आठवले, मागच्या महिन्यात तिने दोन हजार रुपयांची ड्रेस मटेरियलची पिशवी जुनी झाली म्हणून कचऱ्यात टाकून दिली होती. विमलकाकू तेव्हा फक्त तिच्याकडे बघत राहिल्या होत्या, काही बोलल्या नव्हत्या. आज त्या मौनाचा अर्थ ईशाला कळत होता.

त्यांच्यासाठी काटकसर हा स्वभाव नव्हता, तर ते एक मिशन होतं. आपल्या कुटुंबाला, भावाला आणि मुलाला गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आवडी निवडी मारून जे साठवणुकीचे व्रत घेतले होते, त्याला ईशा आजवर कंजूसी समजत होती.

"मम्मा... आय एम सो सॉरी," ईशा पुटपुटली.

तिने पत्रांचा तो ढिगारा आपल्या छातीशी धरला. त्या धुळीने माखलेल्या कागदांमध्ये तिला सासूबाईंचा तो कणखर चेहरा दिसत होता, जो परिस्थितीशी दोन हात करत असतानाही कधी थकला नव्हता. पण अजून एक पत्र खाली होतं, ज्यावर तात्यांनी लिहिलं होतं..

" विमल, एक गुपित तुला सांगायचं आहे, जे कुणालाही सांगू नकोस..."

ईशाचे कुतूहल शिगेला पोहोचले. त्या पत्रात असं काय गुपित होतं ज्याने विमलकाकूंच्या आयुष्याची दिशा बदलली होती ? हे जाणून घेण्यासाठी तिने पुढचे पत्र उघडले.

© ® वेदा

क्रमश:...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →