Login

वारसदार नवी ओळख भाग १

वारसदार नवी ओळख भाग १
वारसदार - एक नवी ओळख

भाग १

" अविनाश, हे काय लावलंय तुम्ही ? मृण्मयीचं मेडिकलचं ॲडमिशन नक्की झालं होतं, मग तिचे पेपर्स तुम्ही का काढून घेतले ? फक्त मुलालाच परदेशात पाठवायचं हा कुठला न्याय ? "

संध्याबाईंचा आवाज आज पहिल्यांदाच इतक्या चढ्या स्वरात घराबाहेर ऐकू गेला होता.
अविनाशरावांनी शांतपणे चहाचा घोट घेतला आणि वर्तमानपत्रावरून नजर वर केली.

" संध्या , न्याय-अन्यायाची गोष्ट नाहीये ही, तर व्यवहाराची आहे. अमेय माझा मुलगा आहे, उद्या तो माझं नाव पुढे नेणार आहे. वंशाचा दिवा आहे तो ! त्याला अमेरिकेला पाठवणं ही या घराची गुंतवणूक आहे. आणि मृण्मयी ?
उद्या ती दुसऱ्याच्या घरी जाणार. तिच्यावर लाखो रुपये खर्च करून उद्या सासरचे लोक त्याचे फायदे घेणार असतील, तर मी वेडा नाहीये."

मृण्मयी दारात उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यांतून पाणी आलं नाही, तर एक ठिणगी पडली. तिने ठरवलं की वडिलांच्या या गुंतवणुकीच्या गणिताला ती एक दिवस नक्कीच चुकीचं ठरवेल.

अविनाशराव एका सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर होते. शिस्त, तत्त्व आणि मुलाचा हट्ट या तीन गोष्टीं भोवती त्यांचं आयुष्य फिरत होतं. त्यांच्या मते, मुलगी म्हणजे एक कर्तव्य होतं जे पार पाडून तिला सुरक्षित घरी पाठवायचं, पण मुलगा म्हणजे अशी मालमत्ता होती जी म्हातारपणी आधार देईल.

अमेयला अमेरिकेला पाठवण्यासाठी अविनाशरावांनी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावली होती. एवढंच नाही, तर ज्या वडिलोपार्जित जमिनीवर मृण्मयीचाही हक्क होता, ती विकून त्यांनी अंकितचं स्वप्न पूर्ण केलं. मृण्मयीने मात्र निमूटपणे शहरातील एका साध्या कॉलेजमध्ये बी.कॉमला प्रवेश घेतला.

" मृणू, वाईट वाटून घेऊ नकोस ग ! बाबांचे विचार जुने आहेत." संध्याबाई मुलीची समजूत काढताना म्हणाल्या.

मृण्मयी हसली, पण त्या हसण्यात एक निर्धार होता.

"आई, वाईट वाटून घ्यायला आता वेळ नाहीये. बाबांना वाटतंय ना की गुंतवणूक फक्त मुलावर केली जाते ? मी त्यांना दाखवून देईन की ही पणती सुद्धा घराचा अंधार दूर करू शकते."

दिवस जात होते. अमेय अमेरिकेला गेला. सुरुवातीला त्याचे फोन रोज यायचे. अविनाशरावांचा ऊर अभिमानाने भरून यायचा.

" माझा मुलगा अमेरिकेत डॅालर कमवतोय!"

हे सांगताना ते थकयचे नाहीत. नातेवाईकांत त्यांची प्रतिष्ठा वाढली होती.

दुसरीकडे मृण्मयीने कॉलेज सांभाळून एका सी.ए. फर्ममध्ये इंटर्नशिप सुरू केली. तिने स्वतःचा खर्च स्वतः उचलला आणि सी.ए. साठी लागणारी फी पार्टटाईम नोकरी करून जमा केली.

अविनाशरावांना तिचं हे स्वातंत्र्य खटकत होतं, पण ती घराचे पैसे मागत नव्हती, म्हणून ते गप्प होते.
दोन वर्षं उलटली. अमेयचा फोन येण्याचं प्रमाण कमी झालं होतं. तो आता तिथेच सेटल होण्याच्या विचारात होता.

"अमेय , अरे तिकडेच लग्न करणार का तू ? एखादी भारतीय मुलगी बघूया का ? "

अविनाशरावांनी एकदा सहज विचारलं.
तिकडून अमेयचा थंड आवाज आला,

" बाबा, माझं आयुष्य मी ठरवलं आहे. मी इथे एका अमेरिकन मुलीशी लग्न करतोय.कदाचित मी आता कायमचा इथेच राहीन. तुम्ही आणि आईला पेन्शन आहे.तुमचं बघू शकता. गरज असेल मी अधून मधून येत जाईन. "

अविनाशरावांना जणू वीज पडल्यासारखं झालं. ज्या गुंतवणुकीवर त्यांनी जुगार लावला होता, ती गुंतवणूक आता हात सोडून जात होती. पण तरीही त्यांचा अहंकार त्यांना शांत बसू देत नव्हता.

"काही हरकत नाही, मुलगा प्रगती करतोय ना, मग झालं तर ! "

ते स्वतःचीच समजूत काढत राहिले.
मृण्मयीचं लग्न ठरलं. समीर नावाचा मुलगा तिला अनुरूप होता. लग्नाच्या वेळी अविनाशरावांनी खूप साधं लग्न लावून दिलं.

"मृण्मयी, अमेयला खूप खर्च झालाय, त्यामुळे मी तुझ्या लग्नात जास्त खर्च करू शकणार नाही
" हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. मृण्मयीनेही तक्रार केली नाही.

" बाबा, मला तुमची संपत्ती नकोय, फक्त तुमचं प्रेम हवं होतं. ते कदाचित तुमच्याकडे माझ्यासाठी नव्हतंच." असं म्हणून तिने सासरी पाय टाकला.
जाता जाता तिने आपल्या आईच्या हातात एक पाकीट ठेवलं.

"आई, यात काही पैसे आहेत. बाबांची तब्येत आता पूर्वीसारखी राहत नाही. गरज पडली तर वापर."

संध्याबाईंच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांना दिसत होतं की, घराचा दिवा सातासमुद्रापार गेला होता आणि ज्या पणतीला तुच्छ मानलं होतं, ती जाता जाताही आपल्या प्रकाशाची उब देऊन जात होती.

आणखी काही काळ लोटला. अविनाशराव निवृत्त झाले. घरात आता फक्त ते आणि संध्याबाई होते. मोठे पणाच्या गोष्टी संपल्या होत्या. आता घराच्या भिंती आता खायला उठत होत्या.

एक दिवस दुपारी अविनाशराव बागेत फेरफटका मारत असताना अचानक कोसळले. त्यांचा उजवा भाग लुळा पडला होता. संध्याबाईंचा आक्रोश ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. त्यांनी थरथरत्या हाताने अमेयला फोन लावला, पण तिकडून व्हॉइस मेल आला.

शेवटी त्यांनी मृण्मयीला फोन केला. मृण्मयीने फोन उचलला आणि फक्त दोन शब्द ऐकले... "बाबा पडलेत!"

पुढच्या अर्ध्या तासात मृण्मयी आपल्या ऑफिसमधून थेट वडिलांच्या घरी पोहोचली. तिने ॲम्ब्युलन्स बोलावली, स्वतः बाबांना उचलून स्ट्रेचरवर ठेवायला मदत केली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आईला सांभाळले.

डॉक्टरांनी सांगितलं,
"पॅरालिसिसचा झटका आहे. परिस्थिती गंभीर आहे. कोणातरी नातेवाईकाला कळवा आणि पैशांची सोय करा."

मृण्मयीने खंबीरपणे हॉस्पिटलच्या काऊंटरवर आपलं क्रेडिट कार्ड काढलं आणि म्हणाली,

" मी त्यांची मुलगी आहे. मी त्यांचं सगळं बघून घेईन. तुम्ही उपचारांना सुरुवात करा."

अविनाशराव शुद्धीवर नव्हते, पण त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला. कदाचित, त्यांना जाणीव झाली होती की ज्या वारसाची ते वाट पाहत होते, तो वारस अमेरिकेत नव्हता, तर त्यांच्या बेडशेजारी त्यांचा हात धरून बसलेली त्यांची मुलगी होती.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all