Login

अन्नाची किंमत..!

अन्नाची किंमत
प्रमिला, तुझ्या सुनेच्या हाताला भारी चव आहे हा . काय मस्त केली आहे भरली वांगी. मसाल्यांच्या चवीत वांगी चांगलीच मुरली आहेत. या बाबतीत मात्र नशीब काढलेस हा तू .

तू ही सुरू झालीस का ताई आता ? अगं ह्याला काय चव म्हणतात का ? ह्या मधे ओलं खोबरं तर घातलंच नाही तिने.
तिला किती वेळा सांगितलं तरी अजून धडं जमत नाही. थांब येऊदे तिला चांगलंच खडसावते बघं.

आपल्या जिद्दी बहिणीला काहीही सांगून समजावून उपयोग नाही असे म्हणून ताई निघून गेल्या.

हे काय गौरी , तुला किती वेळा सांगायचं ह्या असल्या फक्त मसाल्याच्या आणि शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या आवडत नाहीत मला. तरीही मुद्दाम करतेस ना तू ? ते काही नाही मला आताच्या आता खोबऱ्याच्या वाटणातली उसळ करून दे.
समोर वाढलेले ताट दूर करून प्रमिलाबाईंनी गौरीला आदेश दिला.

प्रमिला काय गं हे वागणं तुझं? गौरीने किती चांगली भाजी केली आहे. कशाला उगाच ताट दूर सारून अन्नाचा अपमान करतेस .
सासऱ्यांनी कधी नव्हे ते सुनेची बाजू सांभाळली. ते पाहून प्रमिलाबाईंनी डोळ्याला पदर लावला.

आई कधीतरी गौरीला समजून घे. लग्नाला चारचं महिने झालेत फक्त. ती करेल हळूहळू. आजवर तिला ज्या गोष्टींची सवय होती ती लगेच कशी सुटेल? प्रवीणने आईला समजावत भाजी चपातीचा एक घास पुढे केला.

त्यासरशी प्रमिलाबाईंनी त्याच्या हातातला घास थांबवत जाहीर केले, आजपासून माझ्यापुरता माझा स्वयंपाक मी करेल. त्यात गौरीने लुडबुड केलेली मला चालणार नाही.

यावर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
खरंतर प्रमिलाबाईंच्या ह्या किरकिरीला सगळेच वैतागले होते. कितीही चांगला स्वयंपाक केला तरीही त्या काहीना काही खोट काढत आणि गौरीला स्वतःसाठी दुसरं करायला सांगत.

चार महिन्यांपूर्वी प्रविणशी तिचा प्रेमविवाह झाला होता आणि काही दिवसातच तिने सर्वांना आपलेसे केले होते.
पण इतर नातेवाईकांनी तिचं केलेलं कौतुक प्रमिलाबाईंना खुपतं होतं.
याला कारण म्हणजे त्यांना आपल्या भावाची मुलगी सून म्हणून करायची होती पण मुलाच्या निर्णयापुढे त्यांचे काहीही चालले नाही.
त्या गौरीची काहीना काही चूक काढायची संधी शोधत. पण गौरी सकाळी चहा नाश्ता स्वयंपाक वैगेरे आटोपून नोकरीला जायची . संध्याकाळी आल्यावरही इतर कामं तसेच जेवणं वैगेरे बघायची म्हणून त्यांना नावं ठेवायला संधी मिळत नव्हती.

हळूहळू घरचे आणि येणारे पाहुणेमंडळी तिच्या स्वयंपाकाची स्तुती करू लागले तेव्हा त्यांनी हाच मुद्दा उचलून धरला. मला हे आवडतं नाही , हे असं करत नाहीत,यात हे जिन्नस टाकत नाहीत म्हणून तिला परत सूचना देऊन पुन्हा स्वतःपुरता स्वयंपाक करायला लावत.
म्हणूनच आज जेव्हा त्यांनी एकटीपुरता स्वयंपाक करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना कोणीच अडवले नाही.

दुसरीकडे प्रमिलाबाईंना वाटलं की गौरी मला स्वयंपाक करू देणार नाही. मी सांगेल तसंच करेल. शिवाय नवरा आणि मुलगा तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगतील. पण असं काहीच घडलं नाही.
उलट गौरी प्रमिलाबाईंशी फक्त कामापुरतं बोलू लागली . सकाळ संध्याकाळ तिघांचा फक्त ती स्वयंपाक करत असे.

या गोष्टीला आता २ महिने होऊन गेले. एकटीपुरता स्वयंपाक करण्याचा प्रमिला बाईंना कंटाळा येऊ लागला. कुठून ही स्वयंपाक करायची जबाबदारी आपण घेतली असे त्यांना वाटू लागले. त्यातही गौरीला आज माझ्यासाठीही कर असं सांगता येईना.

यावर उपाय म्हणून त्या आता सकाळी एकदाच जास्त जेवण बनवून उरलेले फ्रीज मध्ये ठेवून संध्याकाळी गरम करून खाऊ लागल्या. हळूहळू २ दिवसाचं जेवणही गरम करून खाणं त्यांनी सुरू केलं आणि परिणामी आजारी पडल्या.

डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना १० दिवस ऍडमिट केले होते. नवरा तसेच प्रवीण आणि गौरी येऊन भेटून जात होते . येताना त्यांना लागणारी फळं, औषधं आणायचे पण त्या वाट पाहत होत्या घरून येणाऱ्या जेवणाच्या डब्याची.
आता तो येणार तरी कसा ? कारण त्यांनीच गौरीला मनाई केली होती ना.
या १० दिवसात हॉस्पिटलचं बेचव जेवणं त्यांच्या घशाखाली उतरत नव्हते. तोंडाची पार चव गेली होती.
शेजारी ऍडमिट असणारा पेशंट जेव्हा घरून आलेला डब्बा उघडायचा तेव्हा मोठ्या मुश्किलीने त्या दुसरीकडे नजर वळवायच्या.
एके दिवशी न राहवून त्यांनी मुलाला सांगितलेच की मला हे बेचव जेवण जात नाही . गौरीला आताच्या आता मेथीची भाजी आणि भाकरी पाठवायला सांग.

कशाला आई तुला तर आवडत नाही ना तिच्या हातचं? उगाच ती बिचारी तुझ्यासाठी आवडीने करेल आणि तू इथे हॉस्पिटलमध्येही भाजीला नावं ठेवशील . त्यापेक्षा नकोच ते . तुला इथलं जेवण आवडलं नाही ना मग ही फळं खा . उद्या घरी जाऊ तेव्हा बनव तुझ्या हाताने.
यावर प्रमिलाबाई निरुत्तर झाल्या.

दुसऱ्या दिवशी नवरा आणि मुलगा त्यांना घरी घेऊन आले तेव्हा संपूर्ण घरात मेथीच्या भाजीचा आणि दुसरीकडे शेकणाऱ्या भाकरीचा सुवास दरवळत होता. आतून गौरी भाजी भाकरीचं ताट वाढून घेऊन आली. प्रमिलाबाईंना जेवायला बसवत प्रेमाने म्हणाली , आजच्या दिवस फक्त माझ्या हातचं खाऊन घ्या. वाटल्यास उद्यापासून पुन्हा तुम्ही तुमचा स्वयंपाक करा.
गौरीच्या या बोलण्याने प्रमिलाबाईंना आपल्या कृत्याची लाज वाटू लागली.
आपली चूक स्वीकारत त्यांनी तिची माफी मागितली आणि पुन्हा कधीच कोणत्या अन्नाला नावं ठेवणार नाही याची शपथ घेतली.

शेवटी गौरीच्या स्वयंपाकाची किंमत त्यांना समजली होती.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →