Login

वैचारिक सुन्नपणा अथवा बधीरपणा

आपण सगळेच विशिष्ट चाकोरीतले विचार करीत असतो........
आपण सगळेच विशिष्ट चाकोरीतले विचार करीत असतो. थोडक्यात आपला विचारांचा असा एक साचा तयार होतो. मग कोणत्याही बदलणाऱ्या परिस्थितीला आपण साच्याच्या विचारांनी तोंड देतो. त्यामुळे बऱ्याच वेळा अपयश किंवा कमी प्रतीचं यश घ्यावं लागतं. त्याच त्याच वर्षानुवर्षांच्या साचेबद्ध विचारांनी आपल्या मनाला, मेंदूला एक प्रकारचा सुन्नपणा अथवा बधिरपणा यायला लागतो. आणि मग आपण एकाच परिस्थितीतील योग्य विचार करणाऱ्या लोकांचा त्यांना मिळणाऱ्या यशा संदर्भात मत्सर किंवा दुस्वास करु लागतो. अर्थातच आपली प्रगती ,अधोगती होत नसली तरी ,थांबलेली असते. किंवा कमी प्रतीची होते. आता हे कसं थांबवायचं? तर एखाद्या बदलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लागणारे विचार लिहून काढावेत. माहिती असलेले सगळे विचार संपले की एखादा चौकटीबाहेरचा विचार सुचतोय का , तो लिहून काढण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याप्रमाणे वागावं म्हणजे तसा ॲप्रोच वापरावा. असं आढळून येईल की यशासाठी हाच विचार योग्य होता. आता असा विचार कसा करावा. तर परिस्थितीतील अनिश्चितता जाणवून घ्यावी. त्यातील भीतीही जाणवून घ्यावी.किंबहुना ती सारखी आणि भरपूर डोक्यात घोळवावी. मग विचार करणं सोडून द्यावं. आणि नंतर नवीन परिस्थितीत सगळया वातावरणाची जाणीव ठेवीत प्रवेश करावा. यशापयशाची पर्वा करु नये.ते परिस्थितीवर सोडून द्यावं. फार क्वचितच अपयश येतं असं आढळेल.

थोडक्यात विचार परिस्थिती प्रमाणे बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. त्यात कसूर करु नये. म्हणजे टोचणी लागणार नाही. म्हणजे नंतर " अरे मी वेगळा मार्ग शोधायला हवा होता " अशी टोचणी लागणार नाही. पुन्हा तीच परिस्थिती समोर येईल याची खात्री नसते. तुकाराम महाराजांनी म्हंटलंय " रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" हे अगदी बरोबर आहे. युद्धाऐवजी आपण परिक्षेचा प्रसंग (म्हणजे एक प्रकारचं संकटच) असा बदल करु या.

" मी अगदी बिनधास्त आहे" ,असं म्हणणारे लोक अपयशाला सहज बळी पडतात. आणि दुसऱ्याला ही अडचणीत आणतात.त्या मानाने भित्रे लोक बरे असतात. भीती वाटणारी माणसं स्वस्थ बसत नाहीत.एक उदाहरण देतो.........

पानिपतच्या लढाईच्या आदल्या दिवशी अब्दालीची मनस्थिती अतिशय वाईट होती. ( विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी पाहा. त्यातलं उदाहरण प्रातिनिधिक म्हणून वापरलं आहे)कारण त्याला याची भीती जाणवली की माझा देश इथून कितीतरी दूर आहे. हरलो तर इथेच गाडला जाईन. माझ्या सैन्याची रचना मला अशीच केली पाहिजे की मला माझ्या सहकाऱ्यांसहीत जिवंत परत जाता आलं पाहिजे. युद्ध जिंको अथवा न जिंको. ...याउलट पेशव्यांची मानसिकता होती. आपण आपल्याच देशात आहोत. आपण शत्रूचं पारिपत्य सहज करु शकू. पण त्यांनी हरलो तर काय होईल हा विचार केला नसावा. त्यातली भीती जाणवून घेतली नसावी . अर्थात इतरही कारणं मग दैवाने आपोआपच जोडली गेली. दैवसुद्धा अशाच बिनधास्त आणि बधिर लोकांचाच घात करतं. म्हणून परिस्थिती प्रमाणे योग्य वास्तववादी विचार करणं आवश्यक आहे.

अरुण कोर्डे
©®9004808486
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →