Login

वहिनी असावी तर अशी भाग १

वहिनी असावी तर अशी
वहिनी असावी तर अशी भाग १

पुजाचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. लग्नानंतरच तिचं पहिलंच रक्षाबंधन होतं. त्यासाठी ती चार दिवस आधीच माहेरी जाणार होती, पण तिच्या माहेरी सुतक पडल्याने तिचं माहेरी जाणं कॅन्सल झालं.

“अहो, केतकी ताई रक्षाबंधनाला कधी येणार आहेत?” पुजाने तिच्या नवऱ्याला रणजीतला विचारले.

“माहीत नाही. आईला माहीत असेल.” रणजीतने मोबाईलमध्ये बघतच उत्तर दिले.

“तुम्ही ताईंना फोन केला नाही का?” पुजाचा पुढील प्रश्न.

“ते डिपार्टमेंट आईच आहे.” रणजीतने उत्तर दिले.

“हे चुकीचे आहे. हा बहीण भावाचा सण आहे. तुम्ही ताईंना घ्यायला जाऊ नका, पण निदान फोन करून तरी घरी येण्याच आमंत्रण द्या.” पुजाने रणजीतला केतकीला फोन करण्यास भाग पाडले.

रणजीतने केतकीला फोन करून घरी येण्याचे आमंत्रण दिले. फोन झाल्यावर रणजीत म्हणाला,

“केतकीने आदल्या दिवशी घ्यायला बोलावलं आहे, पण त्याच दिवशी कंपनीत फॉरेन डेलीगेट्स येणार आहेत. मी रात्री घरी कधी येईल हे मलाच ठाऊक नाहीये.”

“मी ताईंना घ्यायला जाईल. माझा ड्रायव्हिंगचा फायदा कधी होईल.” पुजा हसून म्हणाली.

“हे एकदम बेस्ट होईल बघ.” रणजीत.

केतकी हडपसरला रहायला होती, तर पुजाचे घर चाकणला होते. एकाच शहराच्या दोन टोकाना ते रहायला होते.

“तुझ्या बोलण्याने निदान रणजीतने केतकीला फोन तरी केला, नाहीतर मी कितीतरी वेळेस बोलले पण कधीच ऐकले नाही.” पुजाचा सासूबाईने तिची पाठ थोपटली.

“आई, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आता आम्ही स्वतःहून घ्यायला पाहिजे. किती दिवस तुम्ही ह्या सगळ्याचा ताण घेणार आहात.” पुजा म्हणाली.

“तुला हे सगळं समजत आहे त्यातच मला समाधान आहे बघ.” पुजाच्या सासूबाई.

“आई, केतकी ताई पुण्यातल्या पुण्यात राहतात, पण निमित्त असल्याशिवाय त्या आपल्या घरी येत नाहीत. अस का?” पुजाला प्रश्न पडला होता.

“पुजा, खूप चांगली, घरंदाज माणसं बघून पोरीला तिथं दिलं होतं, पण त्यांची घरंदाज पणाची व्याख्याच वेगळी आहे. तू केतकीच्या घरी जाशील तेव्हा तुला हे कळेलच.” पुजाच्या सासूबाईंनी उत्तर दिले.

“आई, मला सांगा ना. केतकी ताईंच्या घरी नेमकं वातावरण कस आहे? त्यांना कसला त्रास आहे.” पुजा.

पुजाच्या सासूबाईंनी केतकीची व्यथा सांगायला सुरुवात केली,

“केतकीला लग्नानंतर सुद्धा नोकरी करायची होती. लग्नाआधी आम्ही तशी अटच घातली होती. लग्न झाल्यावर घरंदाज घरातील सुना बाहेर जाऊन नोकरी करत नाहीत ह्या रितीवर जोर देऊन केतकीला नोकरी करण्यास नकार दिला.

केतकीला घरात बसण्याची सवय नव्हती. तिला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा, पण तिचं कोणीच ऐकत नव्हते. घरातील कामांची तिला सवय नव्हती, पण तिथं सतत काहीना काही काम करावं लागतंच.

काही ठोस कारण असल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. उठसुठ माहेरी जायचं नाही. आम्हाला दोघांना तिचा त्रास बघवत नाही, म्हणून आम्ही तिच्या घरी जाण टाळतच असतो.”

“मग आई, केतकी ताईंनी डिव्होर्स का घेतला नाही?” पुजा.

“ह्या प्रश्नाचं उत्तर तू तिलाच विचार.”

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →