सासूबाईची वही - भाग -1
अंजली ऑफिसमधून घरी आली तेव्हा घड्याळात साडेआठ वाजले होते, दार उघडताचं तिला स्वयंपाकघरातून फोडणीचा खमंग वास आला.
अंजलीच्या सासूबाई किचनमध्ये कामं करत होत्या, त्यांनी मागे वळून विचारले,
"अंजली, आलीस? हातपाय धू, जेवायला बसुया आपण, मी वरण, भात,भाजी केलीय.
अंजलीला अपराधी वाटले, लग्नाला सहा महिने झाले होते, ती एका मोठ्या कंपनीत एच आर म्हणून काम करत होती.
अंजली सकाळी आठला घराबाहेर पडायची, ती संध्याकाळी कधी सात तर कधी नऊला घरी यायची, स्वयंपाकाचा, किचनचा सगळा भार सासूबाईचं उचलत होत्या.
अंजलीचा नवरा रोहित म्हणायचा, असुदेतं गं अंजु, आई प्रेमाने करतेय नां सगळं,अगं आईला काही प्रॉब्लेम नाहीये, ती हौसेनेच करते."
अंजली त्याला म्हणायची, मी उशिरा येते अरे, आईचं सगळा स्वयंपाक करून ठेवतात."
अंजलीला जाणवत होतं, कधीतरी शेजारचं कोणी आलं की सासूबाई मुद्दाम म्हणायच्या, "आमची सून नोकरी करते ना, तिला वेळच नसतो." त्यात तक्रार नव्हती, पण एक बोचरी सल होती.
एके रविवारी सकाळी अंजलीने उत्साहाने म्हटले, "आई, आज पुरणपोळी करूया का? मला शिकायचीये."
सुशीलाबाई हसल्या आणी बोलल्या... "अगं पुरणपोळी सोपी नाही, पहिलं साधं वरण भात तर शिक." तू लग्नाआधी पण नोकरींमुळे जास्त काही शिकू शकली नाहीसं हे मला माहित आहे, त्यामुळे हळूहळू शिक तू.
अंजली म्हणाली, "मी युट्युबवर बघून करेन, तुम्ही फक्त सोबत उभ्या राहा."
पीठ मळताना, पुरण शिजवताना सगळा गोंधळ झाला.
पुरण पातळ झाले, पोळी फाटली.
रोहित हळूच म्हणाला, "अंजली, राहू दे ना. आई करेल."
अंजलीचा बांध फुटला, ती रडून म्हणू लागली.
"म्हणजे मी काहीच करू शकत नाही का? कधी जमणार मला स्वयंपाक.
सुशीलाबाई काहीच बोलल्या नाहीत, त्यांनी फक्त तिच्या हातातली कणकेची परात घेतली आणि म्हणाल्या, "पोळी फाटली म्हणून कोणी वाईट ठरतं नसतं, अंजली तू थकली असशील, जा, चहा घे."
रात्री अंजली खूप रडत होती, रोहित म्हणाला, "तू आईला ओळखतच नाहीयेसं अजून."
दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली ऑफिसला जायला निघाली, तर टेबलवर एक लाल कापडाची, जुनी, पिवळी पडलेली वही ठेवलेली होती.
आत एक चिठ्ठी होती.
अंजली,ही वहीे , तुला उपयोगी पडेल असे वाटले म्हणून तुला देते आहे ....आई
अंजलीने वही बॅगेत टाकली आणी ऑफिसला जायला निघाली, ट्रेनमध्ये बसल्यावर तिने ती वही उघडली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अंजलीला सासूबाईनीं दिलेल्या वहीत असं कांय लिहिलेलं असतं. )
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
