वागणूक भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" काय ती नाटकं ? जशी आम्हांला पोरं झालीच नाहीत. " मंदाताई आपल्या सुनेला शर्वरीला आपल्या बहिणी समोर बोलत होत्या.
" आई अहो, सिझर झालं आहे माझं. अजून पंधरा दिवस नाही झाले. आणि तुम्ही म्हणताय की मावशीसाठी उठून स्वयंपाक बनव. कसं जमेल मला ? जरा तरी दया दाखवा ना. " शर्वरीच्या डोळ्यात पाणी होत.
" हो तर, जसा मी तुझा जाचच करते. रडून दाखवायला. आमच्यावेळी डिलीव्हरीच्या पाचव्या - सहाव्या दिवशी आम्ही कामाला लागायचो. आणि ह्यांची नाटकं बघा. तरी सांगत होते मंगेशला, बिन आईची पोरगी करु नकोस म्हणून. पण याला हीच आवडली. आता हीच मी करत बसायचं का ? घरी पाहुणा रावळा आला तर मी स्वयंपाक घरात उभी राहू का ? ते तुझं काम आहे. " मंदाताई तोडून बोलत होत्या.
" आई मला नीट बसता येत नाहीये. बाळाला नीट पकडून पाजता येत नाहीये. आणि तुम्ही मला अजून त्रास देताय ? नाहीये मला आई, लग्नाआधी माहिती होत ना तुम्हांला ? तुमचा मुलगा नव्हता ऐकत तर मला सांगायचं.' बिन आईच्या मुलीचं नंतर मला करायला जमणार नाही म्हणून. ' मीच नकार दिला असता तुमच्या मुलाला. किमान आज ही अवस्था तरी नसती. " शर्वरीला आज खूप दुःख होत असल्यामुळे ती सुद्धा मनातल बोलत होती.
" आली मोठी माझ्या लेकाला नकार देणारी. चल उठ आणि स्वयंपाकाला लाग. जेवून नंतर मला ताईसोबत खरेदीला जायचं आहे. उठ बाळ झोपलं आहे तोपर्यंत होईल. " मंदाताई आपला हेका सोडत नव्हत्या.
मजबुरी म्हणून का होईना, शर्वरी स्वयंपाक घरात गेली. तिला नीट उभं राहता येत नव्हतं. हात - पाय कापत होते. थरथरत होते. तरी बाळ उठेल, त्याआधी स्वयंपाक तयार करण्यासाठी ती धडपडत होती. जसा जमेल तसा स्वयंपाक केला. आणि बाळाजवळ जाऊन बाजूला झोपली आणि खूप रडली. तिचे सिझरचे टाके खूप दुखू लागले. चक्कर येऊ लागली.
मंदाताई जेवून आपल्या बहिणीसोबत खरेदीसाठी निघून गेल्या. मागे शर्वरी आपल्या बाळाला धरून बसली होती. संध्याकाळी मंगेश घरी आला. शर्वरीळा बघायला आत गेला तर शर्वरी निपचित पडली होती. तिला तसं पाहून मंगेश घाबरला. त्याने ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून सांगितलं, " यांच सिजर झाल आहे, तरी त्यांना हवा तसा आराम मिळत आहे असं वाटत नाहीये. अशक्तपणा सुद्धा खूप आहे. सकस आहार हवा नवीन माताला. काळजी घ्या. नाहीतर नंतर हाताबाहेर गेलं तर आम्ही काही करु शकणार नाही. " डॉक्टर बोलून गेले. मंगेशने शर्वरीला विचारल्यावर शर्वरीने सर्व सांगितलं.
मंगेशला राग तर येत होता पण ' काय बोलणार?'
मंगेशला राग तर येत होता पण ' काय बोलणार?'
घरी आल्यावर मंदाताई हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांना एकत्र येताना पाहून बडबड सुरु केली.
" मला तर म्हणत होती, मला उठायला पाण जमत नाही. नवऱ्यासोबत फिरायला जायला जमत बरं ? "
" मला तर म्हणत होती, मला उठायला पाण जमत नाही. नवऱ्यासोबत फिरायला जायला जमत बरं ? "
" आई, बस्स कर. हॉस्पिटल मधून आलोत आम्ही. तेही तुझ्यामुळे. तिला या अवस्थेत स्वयंपाक करायला लावलास तू. त्यामुळे तिची तब्बेत खराब झाली. तरी तुझी बडबड थांबत नाही. " मंगेश आपल्या आईला ऐकवत होता.
" असं आईला उलट बोलण्यासाठी तुला लहानाचा मोठ केलं होत. माझी सेवा करायची सोडून आता सुनेची सेवा करायची का मी ? ते काही नाही. मला हीच करायला जमणार नाही. हिला हिच्या माहेरी पाठवून दे. त्यांचं ते बघतील. परत एकदा निक्षुन सांगतेय. मी हीच काहीही करणार नाही. " मंदाताई तोऱ्याने बोलून आपल्या बहिणीबरोबर खोलीत निघून गेल्या.
शर्वरीला रडू येत होत. मंगेश तिला धीर देत होता. तिने स्वतःला सावरलं आणि मंगेश स्वयंपाक घरात दूध आणायला गेला असताना आपल्या वडिलांना फोन लावून सर्व सांगितलं.
क्रमश :
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
