Login

उपरती....!

उपरती
अहो आई त्या काचेच्या प्लेटला हात नका लावू बरं. चुकून फुटेल एखादी. आम्ही खास सिंगापूरवरून मागवला आहे तो डिनरसेट. हे घ्या स्टीलच्या ताट वाट्या . तुमच्यासाठी मुद्दाम काढून ठेवल्या आहेत.

एसीची सवय नसेल ना बाबा ? थांबा करते बंद. त्या दोन्ही खिडक्यांची दारं उघडी राहू द्या. दुपारनंतर भरपूर हवा सुटते. तेव्हढाच बाहेरचा वारा येईल आत.

आई हे तुमचे आणि बाबांचे कपडे मशीनमधे का टाकलेत ? काढा बरं आधी. त्या मावशी येतील अर्ध्या तासाने. त्यांच्याकडे द्या धुवायला.

बाबा खाली फिरायला जाता तर फक्त फिरून येत जा. विनाकारण याच्याशी त्याच्याशी बोलत नका जाऊ. उगाच कशाला कोणाशी ओळखी करायच्या ?
आणि खेळणाऱ्या मुलांनाही गोळ्या बिस्किटं देत नका जाऊ. इथे शहरांत नाही चालत असं. उगाच खाऊन एखाद्याला काय झालं तर येतील त्याच्या घरचे आपल्याला भांडायला.

हवापालट म्हणून शहरात मुलाकडे महिनाभरासाठी आलेले विलासराव आणि ऊर्मिलाबाईं सुनेच्या सततच्या सूचनांना पार वैतागले होते.
त्यांनी कोणत्याही कामाला किंवा वस्तुला हात लावलेलं सून शिल्पाला आवडत नसे. घरभर फिरणं, बाहेर कुणाशी बोलणं तिला चालत नसे.

उर्मिलाबाईंनी एकदा मुलाच्या म्हणजे सागरच्या आवडीचा स्वयंपाक करायला घेतला तर या किचनमध्ये तुम्हाला जमणार नाही म्हणत शिल्पाने त्यांना बाहेर खोलीत जायला सांगितले.
एकदा तर अचानक शिल्पाने मैत्रिणी आल्या म्हणून दिवसभर त्या दोघांना खोलीच्या बाहेर न येण्याची ताकीदच दिली होती.

घडला प्रकार विलासरावांनी त्या रात्रीच सागरला सांगितला.
अहो बाबा तिला नाही आवडत तर नका हात लावू. नका बोलू कोणाशी. टीव्ही पाहत राहा . पुस्तकं - पेपर वाचा. आणि तसही ती आपल्यापेक्षा मोठ्या घरची आहे त्यामुळे हे स्वाभाविक आहे.
शिल्पासोबत राहून सागरच्याही डोक्यात आधुनिकतेची हवा गेली होती.
आपल्या मुलाच्या तोंडून हे उत्तर ऐकून दुसऱ्या दिवशीच विलासराव आणि उर्मिलाबाई गावाकडे निघून गेले आणि इकडे शिल्पाने सुटकेचा निःश्वास सोडला.

खरंतर माहेरी लाडाकोडात आणि श्रीमंतीत वाढलेल्या शिल्पाने शहरात नोकरीसाठी आलेल्या सागरशी प्रेमविवाह केला.
मुलांची आवड म्हणून दोन्हीकडील मंडळींचा याला होकार होता पण शिल्पाची एक अडचण होती ती म्हणजे तिचं खेडेगावातील सासर.
लग्नाआधीच तिने सागरला मी गावी राहणार नाही अशी अट घातली होती यावर सागरनेही मलाही आता नोकरीसाठी कायम शहरात राहाव लागेल. गावी कमवायची सोय नाही, फक्त आई बाबा भेटायला राहायला आले की त्यांचं बघावं लागेल असे म्हणत तिची अट कबूल केली.
पण शिल्पाला आपल्या सासू सासऱ्यांच कधीतरी घरी येणंही आवडत नसे . त्यांच्या साधेपणाची तिला लाज वाटत असे त्यामुळे तिने त्यांना अशी वागणूक द्यायला सुरुवात केली होती. याउलट माहेरच्या लोकांचा ती चांगलाच पाहुणचार करत असे.

आणि इकडे महिनाभरासाठी जातो असं सांगून दहा दिवसातच शिल्पाच्या वागणुकीला कंटाळून आलेल्या आई वडिलांना पाहून ज्योती म्हणजे विलासराव आणि उर्मिलाबाईंची सासुरवाशीण लेक चिडली.

आई असं कसं तिने तुला हात लावायला मनाई केली ? तुझ्याच मुलाचं घर ना ? तुला चांगलं खडसावता नाही आलं ?
आणि बाबा तुम्ही तरी कसे गप्प बसलात ? माणसांपेक्षा तिला वस्तूंचा एवढा पुळका आहे का ?
आणि त्या सागरलाही काडीची अक्कल नाही . खुशाल आईबापाला सांगतो सहन करा म्हणून .
थांबा. त्या दोघांचाही चांगलाच समाचार घेते मी असं म्हणत ज्योतीने शिल्पाला फोन लावला.

त्यावर विलासरावांनी तिचा फोन ओढून घेत कट केला.
जाऊ दे ज्योती लेकालाच आमच्याबद्दल काय वाटत नाही तर सुनेला काय बोलणार ? तसंही दोघांचं एकमेकांशी पटतं. चांगला संसार चालू आहे त्यात विषय वाढवून भांडणं करून काय फायदा? ही एकच गोष्ट सोडली तर काही त्रास नाही शिल्पाचा.
आणि आम्ही आता तिथे कधीच जाणार नाही. त्यामुळे तोपण प्रश्न मिटला. आता विसर हे शांत हो.
विलासरावांनी लेकीची समजूत काढली.

त्यानंतर अधेमधे सागरचा ख्यालीखुशाली विचारण्यापुरता फोन यायचा तेव्हाच त्याने बातमी दिली की ४ वर्षासाठी कंपनीतर्फे आम्ही परदेशात जात आहोत आणि मग तोही फोन यायचा बंद झाला.

ह्या घटनेला आता २ वर्ष होऊन गेली. दोघांचा सुखी संसार असला तरी मुलगा आपल्याला पार विसरून गेला ह्याच विलासरावांना आणि ऊर्मिलाबाईंना खूप वाईट वाटायचं. इतरांच्या सुना, मुले, नातवंडे पाहून तर ऊर्मिलाबाईंना भरून यायचं मग विलासरावचं त्यांची समजूत काढायचे. लेकीच्या मुलांना जीव लावायचे.

अशातच परदेशी असणाऱ्या शिल्पाला मातृत्वाची चाहूल लागली आणि लगेच तिने ही बातमी आपल्या माहेरी सांगितली. शिवाय आई वडिलांना बाळंतपणासाठी परदेशात यायचं आमंत्रण द्यायला विसरली नाही. कारण पहिलंच बाळंतपण तेही दुसऱ्या देशात असल्यामुळे तिला जवळची माणसं हवी होती. याशिवाय परदेशातील आयांचे भरमसाठ दर देण्यापेक्षा घरच्यांना बोलावणं अधिक सोयीचं होतं.
दुसरीकडे मात्र हीच गोड बातमी सासरी कळवण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही.

पाचवा महिना संपत आला आणि अचानक एकदा तिच्या वडिलांच्या कारचा छोटासा अपघात झाला. पाठीला बराच मार लागल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीने ३-४ महिन्यांची बेडरेस्ट सांगितली. यामुळे तिच्या आईनेही परदेशी यायला नकार कळवला आणि परस्पर सल्लाही दिला -
अगं तुझी सासू कितीही साधी आणि गावंढळ असली तरी बाळाचं अगदी व्यवस्थित करेल बघं. शेवटी होणार बाळ त्यांचाच वारस आहे. मग ते लोकं नाही करणार तर कोण करेल ? उलट ग्रामीण भागातील बायकांना चांगलीच माहिती असते याची. बाळ - बाळंतिणीचं खाणं - पिणं, तेल मालिश वैगेरे त्या चांगलंच करतील. तू त्यांनाच बोलवून घे बरं.

शिल्पाला आधीचे दिवस आठवले. आता कुठल्या तोंडाने सासू सासऱ्यांना बोलवायचं या विचाराने ती हैराण झाली. संध्याकाळी सागर आला तशी तिने त्याला लाडिगोडी लावून सासूबाईंना बोलवून घ्या असा हट्ट केला.

अगं एवढंच ना ? थांब आताच गावी कळवतो. शिवाय आईच्या पासपोर्टची व्यवस्थाही करावी लागेल असे म्हणत सागरने आपल्या वडिलांना फोन केला.
माहेरपणासाठी घरी आलेल्या ज्योतीने नंबर पाहून पटकन फोन उचलला.
बोल सागर आज कशी तुला आठवण आली इथली ?
यावर सागरने तिला तिकडची परिस्थिती सांगितली आणि मी पैसे पाठवतो तोपर्यंत तू लगेच आईच्या पासपोर्टसाठी अर्ज कर अशी विनंती केली .
का रे फक्त आईचाच पासपोर्ट ? बाबा नकोत का सोबत ? अरे हो विसरलेच तुझ्या बायकोला फक्त आईचीच गरज आहे ना . बाबांचं काय काम म्हणा तिथे ? बरं तुझ्या बायकोला चालेल का आईने बाळाला सांभाळलेलं?
कसं आहे ना ती ब्रँडेड वस्तूही इतक्या जपते की आई बाबांचा हात लागलेलाही चालत नाही तिला. त्यात तर हे तिचं पोटचं मुल.

ज्योतीच्या लागोपाठ प्रश्नांनी सागर गडबडला.

ताई असं काय बोलतेस ? अगं होणारं बाळ हे त्यांचही नातवंड आहे. अश्यावेळी त्यांना नाही बोलवायचं का ?

ज्योती - ऐनवेळी तिकडे येऊन तुझ्या बायको आणि बाळाचं करायला तुझी आई काय मोलकरीण आहे का ?
होणाऱ्या बाळाची बातमी तुझ्या सासरी पहिल्या महिन्यातच मिळाली.
तिच्या आईने येणं कॅन्सल केलं म्हणून तुझ्या बायकोला आपल्या सासूची आठवण आली.
नाहीतर बारशाचं तरी कळवलं असतं का आम्हाला ?

ज्योतीताई, माफ करा मला. माझ्याकडून अशी चूक नाही होणार . यापुढे मी त्यांना सन्मानाने वागवेन.
इतका वेळ स्पीकर मोड वर बहिणभावाचा संवाद ऐकणाऱ्या शिल्पाने आपली चूक कबूल केली.

राहू दे शिल्पा, आता कुठे आई-बाबा मुलगा दूर गेल्याचा विरहातून बाहेर पडले आहेत आणि एकदा का नातवंडांचा लळा लागला की मग त्यांच्या विरहातून सावरणं मला मुश्किल होऊन बसेल.
त्यापेक्षा तुम्ही दुसरी सोय करा आणि सुखी रहा.
इथे आई बाबांना बघायला त्यांची लेक आहे अजून .
ठामपणे भूमिका घेत ज्योतीने परस्पर विषय मिटवला.

आणि इथे आपल्या मुलीचं सडेतोड बोलणं ऐकून विलासराव आणि उर्मिलाबाईंचा ऊर अभिमानाने भरून आला तर दुसरीकडे पहिल्यांदाच शिल्पाला माणसंही महत्त्वाची असतात ह्याची उशीरा का होईना उपरती झाली.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →