उपरती - भाग - ३(अंतिम)
सुजाताने हे सांगताच सुहासच्या पायाखालची जमीनच सरकली. ही पाच लाख अशी मागते की जसे काही पाच हजार मागतेय. आता त्याने थोडा सावध पवित्रा घेतला आणि म्हणाला,
"सुजाता सध्या एव्हढे पाच लाख शक्य नाही गं. नंतर कधी देईन."
सुहासने असं म्हणताच तिने जे काही नाटक केलं की विचारुच नका. ती तोंडाला येईल ते बोलू लागली,
"तुझं माझ्यावर प्रेमच नाही. एक मुलगी या नात्याने आई बाबांचं स्वप्न पूर्ण करू इच्छिते तर तू नाही म्हणतोस. मला नोकरी पण करू दिली नाहीस. मी कमवत असते तर तुझ्याकडे हात पसरायची गरजच नव्हती. शेवटी काय माझे आई बाबा तुझे कोण लागतात रे. इकडे मी तुझ्या सर्व आवडी निवडी जपते पण तुला माझी किंमतच नाही."
त्या दिवसापासून तिने त्याच्याशी अबोला धरला. आता सुहासला आई बाबांचे बोल आठवायला लागले. त्यांनी जे सांगितलं होतं तशीच आता सुजाता वागत होती. सुहासने पैसे दिले नाहीत म्हणून सुजाताने त्याच्याशी अबोला सुरूच ठेवला. इतकंच काय ती त्याच्यासाठी चहा, जेवण काहीही करत नव्हती. बिचारा सुहास सकाळचा चहा सुद्धा खाली टपरीवर जाऊन पित होता. एकदा त्याला वाटलं की देऊन टाकावे पाच लाख रुपये. आपल्याला शांती तरी मिळेल. पण हे इथेच थांबेल ह्याची शाश्वती काय. उद्या म्हणेल बाबांना कार घेऊया, परवा आणखीन काही. त्यापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लावलेला बारा. दहा बारा दिवसांनी सुहासने सुजाताला स्पष्टच विचारलं,
"तुला माझ्याशी असंच वागायचं आहे का! तसं असेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या घरच्यांना दूर करून तुझ्याशी लग्न केलं कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. परंतु तू सारखे सारखे तुझ्या माहेरच्यांसाठी पैसे मागत राहिलीस तर ते शक्य नाही. अगं उद्या आपल्याला मुलबाळ होईल त्यासाठी थोडी बचत करायला नको का!"
"हो पण जावई म्हणून माझ्या आईबाबांसाठी काही करणं तुझं कर्तव्यच आहे."
"कर्तव्याच्या गोष्टी तू कोणाला सांगतेस. तू सुनेचे कर्तव्य एकही दिवस पार पाडलं नाहीस. तुझ्या घरच्यांना पण मी मदत करेन पण जेव्हा त्यांना खरोखरच एखादी जीवनावश्यक गरज असेल तेव्हा. असं नुसतं चैन करण्यासाठी पैसे मी देणार नाही."
"असं असेल तर मला तुझ्याबरोबर राहण्यात काहीच आनंद नाही."
"मलाच आता तुझ्याबरोबर राहायचं नाही. मी माझ्या आई-वडिलांबरोबर आनंदाने राहीन. आधीच आई बाबांचे ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. तुझ्यामुळे माझ्या आणि मीरामध्ये पण दुरावा आला."
त्याच दिवशी भाड्याच्या घरातली सारी आवराआवर झाल्यावर सुहास थेट आई-बाबांना भेटायला आला. दरवाजाची बेल वाजवल्यावर बाबांनी दार उघडलं त्याला पाहून बाबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.
"अरे सुहास आज सकाळीच ये ये आत ये. मनीषा कोण आलं आहे बघ तरी."
"अरे सुहास एकटाच आलास सुजाता नाही आली तुझ्याबरोबर."
सुहास काही बोलायच्या मनःस्थितीत
नव्हता. त्याने दोघांच्याही पायावर सपशेल लोटांगण घातलं आणि रडवेल्या आवाजात म्हणाला,
नव्हता. त्याने दोघांच्याही पायावर सपशेल लोटांगण घातलं आणि रडवेल्या आवाजात म्हणाला,
"आई-बाबा मला माफ करा मी तुमचं ऐकलं नाही तुमच्याशी खूप वाईट वागलो. तुम्ही जे बोलला होतात तेच झालं. सुजाताने माझ्याशी पैशांसाठीच लग्न केलं आहे. तिला तुमच्या सोबत राहायचं नव्हतं तेव्हाच मला कळायला हवं होतं. मी आता तिला रीतसर घटस्फोट देणार आणि तुमच्या जवळच राहणार आहे. मी आयुष्यभर तुमचा व्यवस्थित सांभाळ करेन. बाबा मला मीराशी पण बोलायचं आहे. आमच्यातलं बहीण भावाचं प्रेमाचं नातं मी तोडलं. ह्यासाठी मी तिची माफी मागेन. आता आपण सगळे पुन्हा पूर्वीसारखेच आनंदाने राहू या. तुम्ही मला माफ कराल ना."
"अरे उठ सुहास. तू आमचा पोटचा पोरगा आहेस. आम्हाला तरी दुसरं कोण आहे रे. चुकतो तोच माणूस. असा पैशाचा हव्यास असलेल्या बायकांमुळे कितीतरी लोकांची अगदी दयनीय अवस्था झालेली मी बघितली आहे. ह्या बायका नाती तोडायला मागे पुढे पाहत नाहीत. नशीब चांगलं की तुला लवकरच उपरती झाली."
