उपरती - भाग - २
"हो पण माझा निर्णय झाला आहे. आम्ही रजिस्टर लग्न करणार आहोत."
"बरोबर आहे त्यांनी पाहिलं आपला एवढा मोठा थ्री बीएचके फ्लॅट आहे, तुझं सगळं व्यवस्थित आहे आणि सध्या मीरा पण इकडे नाही."
"बाबा असं काही नाही लग्न झाल्यावर आम्ही शेजारच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने जागा घेऊन राहणार आहोत."
"अरे काय बोलतोस आपण सगळे एकत्र राहण्यासाठी म्हणून एवढा मोठा फ्लॅट घेतला त्याचे एवढे मोठे हप्ते कोण देणार."
"लोनचा अर्धा हप्ता मी देईन आणि अर्धे पैसे तुम्ही मीराकडून घ्या ती आता कमवायला लागणार आहे."
मकरंद आणि मनीषा पुरते हतबल झाले होते. सुहास असा वागेल असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सुहासचं लग्न होण्याआधी एकदा त्याला समजावून पहावं म्हणून त्यांनी सुहासला बोलावलं.
"हे बघ सुहास आता तू वेगळं राहायचं म्हणतोस पण या एवढ्या मोठ्या घरात आम्हाला करमणार नाही रे. मीरा परदेशात आहे पण तू इथे असून पण आमच्यापासून वेगळा राहणार हे आम्हाला सहन नाही होत. तुला सुजाताशी लग्न करायचे कर पण तुम्ही दोघे इथे रहा ना."
"बाबा सुजाताला पहिल्यापासूनच स्वतंत्र संसार करण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती मला लग्नाआधीच हे सारं बोलली आहे."
"सुहास आता तू तिच्या प्रेमात आंधळा झाला आहेस पण एक ना एक दिवस तुला तिचं खरं रूप लक्षात येईल. त्यावेळी पश्चाताप करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा काही मार्ग असणार नाही. तू जेव्हा स्वतः अनुभव घेशील आणि जर तुला तुझी चूक उमगली तर तू केव्हाही परत इथे येऊ शकतोस. आम्ही तुझे आई बाबा आहोत. तू कसाही वागलास तरी आमचे तुला आशीर्वादच आहेत."
दोन महिन्यांनी सुहासचे लग्न झालं आणि तो आणि सुजाता शेजारच्याच बिल्डिंगमध्ये वेगळे राहू लागले. लग्नानंतर हनिमूनहून आल्यानंतर सुहास एक दिवस एकटाच घरी आला,
"बाबा आता आमचा नवीन संसार आहे. सगळंच नवीन खरेदी करणं आम्हाला आत्ता शक्य नाही त्यामुळे आपल्या घरात मी ज्या नवीन वस्तू घेतल्या आहेत त्या तिथे घेऊन जाईन. तशी पण तुम्हाला काय त्याची गरज राहणार नाही." मनीषा म्हणाली,
"सुहास तुला जे काही न्यायचं असेल ते तू खुशाल घेऊन जा. तुमचा दोघांचा सुखी संसार होऊ दे हीच आमची इच्छा आहे."
सुहासने निर्लज्जा सारख्या बऱ्याच वस्तू नेल्या. एखाद्याची मती फिरते म्हणतात ती अशी. सुहास आणि सुजाताचा राजा राणीचा नवीन संसार सुरू झाला. दोघेही खूप आनंदात होते. नव्या नवलाईचे दिवस संपले. एक दिवस सकाळीच सुजाता सुहासला म्हणाली,
"ऐक ना सुहास. दोन दिवसांनी आपल्या सुषमाचा वाढदिवस आहे. मी न तिला गेल्या वर्षी कबूल केलं होतं की पुढच्या वाढदिवसाला तुला सुंदर सोन्याचे कानातले घेऊन देईन. जरा मला वीस पंचवीस हजार रुपये दे म्हणजे मी आजच आणून ठेवेन."
"बस इतकंच ना! हे बघ मी आताच तुझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करतो. आणखीन काही आज्ञा आहे का राणी सरकार. बंदा हाजिर है."
नाटकी आविर्भावात सुहास म्हणाला.
नाटकी आविर्भावात सुहास म्हणाला.
"नाही रे तू खरंच इतका समजूतदार आहेस की बाकी काहीच नको."
असेच दिवस जात होते. मकरंद आणि मनीषा आला दिवस ढकलत होते. मीराला जेव्हा सुहास बद्दल कळलं तेव्हा तिने त्याला कॉल करून खूप काही सुनावलं. त्यावेळी सुहास तिला म्हणाला,
"मीरा तुला मला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. तू बाबांना आधीच लुबाडून बसली आहेस. इतकंच तुला आई बाबांबद्दल वाटतंय तर दर महिन्याला पैसे पाठव. जास्त शहाणपणा करू नकोस."
मीरा खरोखर थोडे का होईना पैसे पाठवत होती. असेच वरचेवर काही न काही निमित्ताने सुजाता सुहासकडे पैसे मागत होती. एक दिवस तिने कहरच केला. सुहास ऑफिसमधून आल्यावर चहा घेत असताना लाडात येऊन म्हणाली,
"सुहास तुला माहित आहे का माझ्या आई बाबांची छोटीशी युरोप टूर करण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे अगदी त्यांचें ते स्वप्नच आहे म्हण ना! परंतु पैशाअभावी ते शक्य होत नाही. आज मी घरी गेले होते तेव्हा बाबांनी हे मला सांगितलं. मी त्यांना म्हटलं काळजी कशाला करता. सुहास करेल तुमची टूर स्पॉन्सर. मी काय म्हणते अगदी सगळे पैसे तू देऊ नकोस. तू पाच लाख दे बाकी मी माझ्या सव्हिंग मधून मॅनेज करेन."
(प्रेमात आंधळा सुहास सुजाताची मागणी पूर्ण करेल का पाहूया पुढील भागात)
